Tuesday 16 March, 2010

प्रेरणादायी कार्यक्रम





शिवसेना आमदार डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या नायकांचा जीवनप्रवास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या त्रिमिती बाराखडी दिल से या संस्थेच्या सहकार्याने १९ व २० मार्च असे दोन दिवस ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विद्यार्थी आणि पालकांच्या हितासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दोन दिवसांमध्ये परिसंवाद, मुलाखत, कार्यशाळा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी, लेखिका डॉ. विजया वाड, अभिनेता आदेश बांदेकर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर, राजीव तांबे, मिलिंद गुणाजी, डॉ. शिवारे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, त्यांना आयुष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा मिळावी या हेतूने आयोजित हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

शनिवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे ‘स्वप्नांना देऊ नवी दिशा’ या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ६.३० ते रात्री ८ दरम्यान ‘मुलांचे प्रश्न आणि पालक’ या विषयारील परिसंवादात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी आणि लेखिका डॉ. विजया वाड सहभागी होणार असून पालकाच्या भूमिकेत अभिनेता आदेश बांदेकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अस्मिता पांडे करणार आहेत. रात्री ८ ते ९.४५ या वेळेत अभिमान गीत ही आनंदयात्रा या कार्यक्रमांतर्गत संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांच्याशी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर संवाद साधतील.

दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २० मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता दीनानाथ नाटय़गृहातच स्वागत समारंभ होईल. त्यानंतर ६.३० वाजता ‘चाकोरीबोहरील करिअरच्या संधी आणि प्रगतीच्या नव्या वाटा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. राजीव तांबे आणि डॉ. शिवारे सहभागी होतील.  त्यानंतर रात्री ८ वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रकट मुलाखत अभिनेता मिलिंद गुणाजी घेणार आहेत. प्रवेशिका तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी उल्हास कोटकर - ९८२१०३३७३६ किंवा कौस्तुभ दहीभाते - ९३२२१३८५६३ अथवा विजय मुळीक यांच्याशी मो. क्र. ९८६९५३४४११ वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 





0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails