Monday 17 October, 2011

असा मी असामी..!

दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग 2...
   





स्टिव्ह जॉब्सच्या  जीवनाबद्दल सर्वानाच अतोनात कुतूहल वाटत असे. अनेक लहानमोठय़ा मुलाखतींमधून जॉब्सचे अंतरंग उलगडले होते. त्याच्या सहाय्याने तयार केलेला स्टिव्हचा जीवनवृत्तांत 
पाच वर्षांचा असताना मी सॅन फ्रान्सिस्कोहून सिलिकॉन व्हॅलीमध्ये आलो.
सिलीकॉन व्हॅली अप्रतिम सुंदर होती. जणू स्वर्गच. उल्हसित करणारी स्वच्छ हवा असल्याने अगदी दूरवरचेही स्पष्ट दिसत असे. निसर्ग सुंदर होता आणि आजूबाजूला अभियंत्यांचे विश्व होते. त्यांच्या संगतीतच मी वाढलो..

ह्य़ूलेट-पॅकार्डमध्ये मी १२व्या वर्षी पहिला संगणक पाहिला. दर मंगळवारी आमची संगणकाशी भेट असे. दहा जण होतो. मंगळवारी रात्री आम्हाला लेक्चर दिले जाई आणि नंतर संगणक हाताळायला मिळे. एकदा कंपनीने नवा डेस्क टॉपही दाखवला व त्यावर कामही करू दिले. मला तो खूपच आवडला होता.. मात्र त्याची क्षमता लक्षात आली होती असे नव्हे. तो छान दिसत होता हे आठवते..

अ‍ॅपल ही नशीबाची देणगी होती. आम्ही सर्वजण योग्य वेळी, योग्य ठिकाणी एकत्र आलो हा दैवयोग होता. तांत्रिकदृष्टय़ा सरस निर्मिती करायची आणि काहीतरी नवी कल्पना प्रत्यक्षात आणायची हा आमचा ध्यास होता. नवनिर्मितीला माणसांना आपली वाटली पाहिजे याकडे आमचे लक्ष असे..

स्टिव्ह नंतर मॅकेंतोषच्या निर्मितीमध्ये गुंतला. मॅक हे अ‍ॅपलचे फ्युचर आहे असे त्याचे त्यावेळी म्हणणे होते. पेप्सी कोलाचा वरिष्ठ व्यवस्थापक जॉन स्कली याला स्टीव्हने अ‍ॅपलमध्ये बोलविले. त्यावेळच्या त्याच्या उद्गारांची आठवण आजही सर्वाना होते, कारण त्यामध्ये स्टीव्हची प्रेरणा समजते. स्टीव्ह स्कलीला म्हणाला.
आयुष्यभर सारखेचे पाणी विकत राहणार की माझ्याबरोबर काम करून जग बदलणार?’

मॅकेंतोष संगणकाचे आगमन हा एक सोहळा होता. टीव्हीचा उत्तम उपयोग स्टीव्हने करून घेतला. त्यावेळपासूनच कल्पक सादरीकरण करून नवीन उत्पादने बाजारात आणण्याचा खेळ स्टिव्हने सुरू केला. स्टिव्हचे सादरीकरण हा मेगा इव्हेंट ठरत असे. पहिल्या सादरीकरणात मॅकेंतोष संगणकच लोकांना सांगतो..
मला वडिलांच्या जागी असलेल्या व्यक्तीची मी तुम्हाला अभिमानाने ओळख करून देतो. त्यांचे नाव आहे.   स्टिव्ह जॉब्स.

प्लेबॉय मासिकाला १९८५साली दिलेल्या मुलाखतीत स्टिव्हने संगणकाचे केलेले वर्णन त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देते.

संगणक हे विलक्षण साधन आहे. ते लिहिण्यासाठी उपयोगी ठरेल. कम्युनिकेशन सेंटर म्हणून त्याचा वापर करता येईल. सुपरकॅलक्युलेटर, प्लॅनर असे वापर तर सहज शक्य आहेत. इतकेच नाही तर कलासाधनेसाठीही तो उपयोगी पडेल. हे सर्वच एकाच यंत्रात शक्य आहे. सॉफ्टवेअर बनवून आदेश दिले की काम होऊन जाईल. अन्य कोणत्याच उपकरणात अशी क्षमता नाही. पुढील काळात त्याचे आणखी किती उपयोग होतील हे सांगता येत नाही. संगणक आपले आयुष्य सुखकर करू लागला आहेच. कंटाळवाणी कामे त्याच्यावर सोपविली की झाले. पण पुढे तो आणखीही खूप काही करू लागेल. संगणकामुळे माणूस जगाशी जोडला जाईल. नेटवर्किंगमधून. यासाठीच त्याला संगणक विकत घ्यावासा वाटेल. अगदी दूरध्वनीसारखी त्याची आवश्यकता निर्माण होईल

तुमची रुची काय दर्जाची आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. माणसाने बनविलेल्या सर्वोत्तम गोष्टी पाहायच्या, समजून घ्यायच्या आणि मग आपण करीत असलेल्या निर्मितीमध्ये ती समज ओतायची. पिकासो म्हणत असे, की चांगले कलाकार कॉपी करतात तर ग्रेट कलाकार चोरी करतात.. ग्रेट आयडिया चोरायला आम्हाला काही वाटत नाही. मॅकेंतोष यशस्वी का झाला याचे एक कारण मी सांगतो. संगीतकार, कवी, प्राणीशास्त्रज्ञ, इतिहासकार, अन्य कलाकार अशा सर्वानी तो बनविला. कलावंत असण्याबरोबरच ते संगणक अभियंते होते हे त्यांचे विशेष..

पेप्सीमधून स्कलीला स्टिव्हने अ‍ॅपलमध्ये आणले, पण लवकरच दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. परिणामी स्टीव्हला अ‍ॅपल सोडावी लागली. त्याला अ‍ॅपलमधून बाहेर पडावे लागले. पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. तेव्हा तो ३० वर्षांचा होता.

यशस्वी होण्याचे ओझे अचानक डोक्यावरून उतरले. नव्याने सुरुवात करताना मन हलके होते. मोकळे होते. मी मोकळेपणाचा आनंद घेऊ लागलो. कशाबद्दल खात्री नव्हती आणि त्यामुळे जबाबदारीही नव्हती. यशस्वी होण्याचे ओझे उतरल्यानंतर मी सर्जनशीलतेच्या प्रांतात मोकळेपणे विहार करू लागलो.

स्टिव्हने नेक्स्ट कंप्युटर्स स्थापन केली. या कंपनीने बनविलेली सिस्टीम अतिशय अद्यावत होती व महागडीही होती. हा संगणक उत्तम होता, पण तो बाजारात टिकू शकला नाही. त्यावेळी स्टीव्ह म्हणाला.

असे चढउतार येतातच. अपेक्षा नसलेले परिणाम प्रत्येक निर्णयातून येतच असतात. सर्वात गंजके तंत्रज्ञान हे टेलिव्हिजनचे आहे. पण त्याला तुफान बाजारपेठ मिळते हेही सत्य आहे आणि टीव्ही हे एक उत्तम उत्पादन आहे हेही खरे.

स्टार ट्रेक या यशस्वी मालिकेतील काही दृश्ये निर्माण करणारी ग्राफिक्स ग्रुप ही कंपनी स्टीव्हने १९८६साली विकत घेतली. यासाठी त्याने पाच दशलक्ष डॉलर्स मोजले. वीस वर्षांनंतर डिस्नेने याच कंपनीसाठी स्टीव्हला ७.४ अब्ज डॉलर्स मोजले. पिक्सर या नावाने ही कंपनी त्यावेळी ओळखली जात होती. ग्राफिक्सकडे असलेल्या मूळ तंत्रज्ञानातच उपयुक्त बदल करीत स्टीव्हने कंपनीचे बाजारपेठेतील मूल्य वाढवित नेले.

आपल्याला काय हवे हे लोकांना बहुतेकवेळा माहीत नसते.. आपण ते त्यांना दाखवायचे असते..या स्टिव्हच्या उद्गारात त्याच्या यशाचे रहस्य कळून येते.

अकरा वर्षांनंतर अ‍ॅपलने स्टिव्हची नेक्स्ट विकत घेतली व स्टिव्हला सन्मानाने सीईओ पदावर बसविले. त्यावेळी अ‍ॅपल अडचणीत होती. स्टिव्हने अनेक प्रकल्प बंद केले. अनेकांना बेकार केले. त्यावेळी स्टिव्ह दिसला तरी कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडे. काय काम करता अशी हा सहज चौकशी करील आणि लगेच कामावरून काढूनही टाकील अशी धास्ती अभियंत्यांना होती. मात्र स्टिव्हने घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळेच अ‍ॅपल संकटातून तरली आणि पुढे बाजारपेठेत उत्तुंग स्थानावर पोहोचली. त्या दिवसांबद्दल स्टिव्ह म्हणतो.

तुम्ही समस्या सोडविण्यास घेता तेव्हा समोर आलेले पहिले उत्तर हे अधिक गोंधळात टाकणारे असते. बहुतेक लोक याच टप्प्यावर हार मानतात. पण तुम्ही अधिक शोध घेत राहिलात आणि समस्येशी सतत खेळत राहिलात, त्या समस्येचे अंतरंग खोलात जाऊन शोधत राहिलात तर एक वेळ अशी येते की अचानक मार्ग सापडतो. साधे, सुंदर उत्तर आपल्या हातात असते..

तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वेगवेगळ्या शक्यता ओळखून त्यांना एकमेकांशी जोडणे हे स्टिव्हचे आणखी एक वैशिष्टय़. २००१मध्ये तो म्हणाला होता..
निरनिराळ्या वस्तुंना एकमेकांशी जोडणे यातच सर्जनशीलता लपलेली असते. हे तुम्ही कसे केलेत असे एखाद्या कल्पक व्यक्तीला विचाराल तर तो शरमिंदा होतो. कारण ती गोष्ट त्याच्या हातून अचानक घडलेली असते. ती त्याला अचानक दिसलेली असते. इतरांच्या लक्षात ती फार नंतर येते..

२००१नंतर अ‍ॅपलने नव्या उत्पादनांचा धडाका लावला. नेक्स्टमधील तंत्रज्ञान मॅकला जोडून नवी सिस्टीम बाजारात आली. अ‍ॅपल स्टोअर्स उभी राहिली. त्यापाठोपाठ आय पॉड आला, मग आय टय़ून आले. ही मालिका सुरू राहिली. गंमत म्हणून प्रथम ही उत्पादने सुरू झाली, पण पाहतापाहता त्यातून एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली. संगणकीय तंत्रज्ञानाचा भला थोरला वारसा स्टिव्ह जॉब्सने पुढल्या पिढीकडे सुपूर्त केला आणि तो काळाच्या पडद्याआड निघून गेला..

(लोकसत्ता मधून साभार :शुक्रवार७ ऑक्टोबर २०११)

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails