Wednesday 23 November, 2011

..तर भारतातही स्टिव्ह जॉब्ज तयार होतील : साबीर भाटिया



altआपल्या मुलाने इंजिनीअर आणि गेल्या काही वर्षांंत तर खासकरून सॉफ्टेवअर इंजिनीअर किंवा वैद्यक शाखेत जावून डॉक्टर व्हावे, असे भारतातील बहुतांश पालकांना वाटते. खरेतर याच सुरक्षित मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे.. तसे झाले तर भारतातही स्टिव्ह जॉब्ज निर्माण होतील. खरेतर भारतीय मुलांमध्ये ती क्षमता आहे. पण पालकांनी मानसिकता बदलायला हवी.. असे सुस्पष्ट प्रतिपादन ‘हॉटमेल’चे जनक साबीर भाटिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.

जॅक्स्टर या नव्या कंपनीच्या माध्यमातून साबीर भाटियांनी एसएमएस क्रांतीची घोषणा मुंबईत केली. त्यानंतर नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनाऱ्यावर मोकळ्या वातावरणात खास ‘लोकसत्ता’शी गप्पा मारताना ते बोलत होते. ते म्हणाले की, स्टिव्ह जॉब्ज स्वतला कलावंत म्हणवत होते. आणि त्यांना तसेच संबोधलेले आवडत असे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी नेहमीच्या सुरक्षित मानसिकतेतून बाहरे पडावे लागते. पारंपरिक बाबी नाकाराव्या लागतात आणि धोका पत्करावा लागतो. हा धोका अपयशाचा तर असतोच पण त्याचबरोबर तो लोकांकडून, बाजारपेठेकडून नाकारले जाण्याचाही असतो. त्यामुळे खंगून न जाता पुन्हा नव्याने उभे राहावे लागते. ते पराभव, ते अपयश हेच माणसाला खूप काही शिकवून जाते.

 मला देखील अनेक जण विचारतात की, हॉटमेलच्या क्रांतीनंतर दुसरी क्रांती तुम्ही का लगेच आणली नाहीत. अशी कोणतीही क्रांती ‘लगेच’ होत नसते. त्यासाठी त्या मागे अथक प्रयत्न, मेहनत असावी लागते. अनेकदा त्या मागे अपयशाचे डोंगरही असतात. हॉटेमेल नंतर अनेक कंपन्या सुरू केल्या आणि मग त्या बंदही कराव्या लागल्या. पण आता जॅक्स्टरने नवीन क्रांती आणली आहे. अर्थात त्या मागे १५ वर्षांची मेहनत आणि त्यातून घेतलेले धडे आहेत.

भारतीय मुलांकडे पाहातो त्यावेळेस असे लक्षात येते की, त्यांच्यातील अनेकांकडे स्टिव्ह जॉब्ज होण्यासाठी लागणारी कल्पकता- सृजनशीलता आहे, असे सांगून भाटिया म्हणाले की, मात्र आपण त्यांना फक्त इंजिनीअिरग किंवा मेडिकलच्या साच्यातून काढण्याचा प्रयत्न करतो आणि मग वेगळे काही करण्याची त्यांची मानसिकता आणि सृजनशीलता छाटून टाकतो. मग स्टिव्ह जॉब्ज कसे तयार होणार? असा सवालही त्यांनी केला. त्यासाठी मुलांना त्यांच्या मनातील सर्व चांगल्या बाबी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि लहान पणापासूनच धोका पत्करण्याची मानसिकता त्यांच्या मनात रुजवली पाहिजे, असेही साबीर भाटिया म्हणाले. 


(लोकसत्ता मधून साभार)

2 comments:

sharayu said...

आकाश संगणकाची निर्मिती स्टीव्ह जॉब्सच्या निर्मितीपेक्षा कमी प्रतीची नाही असे मला वाटते.

Narendra prabhu said...

शरयु, आपले म्हणणे मान्य, पण आकाश ची निर्मिती डाटाविंड या लंडनस्थित युरोपीयन कंपनीने केली आहे.

Post a Comment

Related Posts with Thumbnails