तरुणाई पुढची आव्हाने
काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द तरुणाईत नेहमीच असते, पण त्याला योग्य दिशा दावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतात, अन्यथा ही उर्जा वाया जाण्याचाच जास्त संभव असतो. शाळा कॉलेजं हे तर या उर्जेचे स्त्रोतच. पण हल्ली मैदानी खेळ, स्काऊट-गाईड, एन्.सी.सी. याच प्रमाण/महत्व कमी झालेलं दिसतय. (हे विषय फक्त जास्तीचे मार्क मिळवण्याचे उपचार झालेत.) श्री. ची.मो.पंडित यांचा एक लेख नुकताच लोकसता मध्ये वाचायला मिळाला. वाचून विचार करण्या सारखा हा लेख स्वप्नपंखच्या वाचकांसाठी.
१९६०-६२ चा काळ- सेनेटर हम्फ्री यांनी परिश्रमपूर्वक एक योजना आखली. नाव होते Peace Corps. उद्देश होता की अमेरिकेतील उत्साही तरुणतरुणींची निवड करून, त्यांना प्रशिक्षण देऊन जगभर मदतकार्यासाठी पाठवायचे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकन संस्कृतीची जगभर ओळख करून द्यायची. निवडीचे निकष अतिशय कठोर असत व आठवडय़ाला ५५-६० तास प्रशिक्षण चाले. ज्या देशात जायचं तिथली संस्कृतीही अभ्यासावी लागे. राष्ट्राध्यक्ष केनडी यांनी ती योजना स्वीकारली व अमलात आणली. भारतातही हे ‘पीस कोअर’चे स्वयंसेवक येत. काही स्वयंसेवक एक वर्षांने परत गेले. काही मदतकार्यात रमून गेले. मोठय़ा कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या तरुणांचा लाभ घेतला. आजही पीस कोअरमध्ये भरती होण्यासाठी तरुणतरुणी रांगा लावतात.अगदी अलिकडे एप्रिल २००९ मध्ये ‘एडवर्ड केनेडी सव्र्ह अमेरिका अॅक्ट’ नावाचे बिल त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्नी स्वीकारले. बिलाचे नाव आहे Generations Invigorating Voluntarism and Education- थोडक्यात GIVE (नव्या पिढीला स्वेच्छा सेवाकार्य आणि प्रशिक्षण यासाठी प्रोत्साहन देणे) ‘राष्ट्रीय नागरी कम्युनिटी कोअर’, ‘अमेरिकेच्या सेवेत स्वयंसेवक’, ‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक सेवा कोअर’ अशा अनेक योजनांचा त्यात अंतर्भाव आहे. या सर्व योजना १८ ते २४ वयोगटातील तरुणतरुणींसाठी आहेत.
० दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे तरुण आघाडीवर निघून गेल्यावर शेतीला मनुष्यबळ कमी पडायला लागले. इंग्लंडने ‘भूसेना’ (Land Army) नावाची योजना जाहीर केली. जे युद्धावर गेले नव्हते असे तरुणतरुणी, मध्यमवयीन लोक उत्साहाने त्यात भरती झाले. गटागटाने जाऊन नांगरणी, वखरणी, पेरणीसारखी कामे, कापणी, झोडणी, मळणी करून देणे अशी कामे झाली. आजही भूसेना कार्यरत आहे. जॉन स्टुअर्ट कॉलीस नावाच्या कवी आणि भौतिकशास्त्रज्ञाने पाच वर्षे शेतावर व दोन वर्षे फळबागा आणि जंगलखात्यात काम केले. The Worm forgives the plough नावाचे एक अप्रतिम पुस्तक त्यांनी या अनुभवांवर लिहिले.
० स्वित्र्झलडमध्ये खडे सैन्य नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला एक वर्षांचा सक्तीच्या सैनिकी शिक्षणाचा अभ्यास पुरा करावा लागतो. शिवाय दर पाच वर्षांनी तीन महिन्यांचा उजळणी, अभ्यास करावा लागतो-अद्ययावत होण्यासाठी. यातून कोणालाही सूट मिळत नाही. मी जर्मनीत शिकत असताना स्वित्र्झलडचे एक प्राध्यापक (४५-५० वयाचे) सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत एक वर्षांसाठी आले होते. मध्येच ते तीन महिन्यांसाठी या उजळणी अभ्यासासाठी जाऊन आले. ही सर्व व्यवस्था इतकी उत्तम आहे की ६-८ तासांच्या पूर्वसूचनेवरून सबंध स्वित्र्झलड रणसंग्रामासाठी सुसज्ज होऊ शकते.
० जर्मनीत नागरी सेवा कायद्यांतर्गत (zivildienst) सर्व तरुणतरुणींना ११ महिने काही ना काही सामाजिक कार्यात सेवा द्यावी लागते. अपंग, निराधारांची सेवा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अत्यवस्थ रुग्णांचा आश्रम, मतिमंद प्रौढांचे आश्रम इत्यादी सर्व सरकारी, निमसरकारी संस्थांमार्फत चालविले जातात. तेथे काम करता येते. निर्वासित, स्थलांतरित यांना जर्मन भाषा शिकविणे, त्यांना मदत करून स्वत:च्या पायावर उभे करणे अशीही कामे असतात. हॉस्पिटल्स, म्युझियम्स, टूरिझम अशा ठिकाणीही कामे करता येतात. या सर्व कामांमुळे समाजाचे, आर्थिक प्रश्नांचे एक वेगळेच भान तरुणाईला होते. नोकरीला लागण्यापूर्वी ही एकूण ११ महिन्यांची सेवा कायद्याने बंधनकारक आहे!
० पाश्चात्य देशातील तरुणाईला दिले जाणारे प्रोत्साहन, सामाजिक- आर्थिक परिस्थितीचे भान देणे, त्यांच्या पुढे नवनवीन आव्हाने उभी करणे, त्यांच्या कर्तृत्वाला, पुरुषार्थाला साद घालणे यावरून आपल्यालाही खूप काही शिकण्यासारखे आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे सर्व देश लोकशाहीच्या चौकटीतच काम करत आहेत.
० स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे एक जाहीर चर्चा झाली. सक्तीचे लष्करी शिक्षण असावे की नसावे, याविषयी. लष्करी शिक्षण म्हणजे नाझीझम- हिटलर आणि अहिंसा, सत्याग्रह म्हणजे शांतता असा भावनिक निर्णय होऊन सक्तीच्या लष्करी शिक्षणाला नकार देण्यात आला. तरीदेखील एन.सी.सी. होती आणि १९५५-६० सालाच्या सुमारास आम्ही कॉलेजमध्ये असताना एन. सी. सी.त खूप रस घेत असू. मी विमानभेदी तोफखान्यात दोन वर्षे भरती झालो. देवळालीचे दोन कॅम्प्स आनंदाने अनुभवले. हल्ली एन.सी.सी.त फारसा कुणी रस घेत नाहीत, असे ऐकतो.
त्याही आधी शाळेत असताना बालवीर-वीरबाला पथके असत. वयाच्या नवव्या वर्षी मी कॅम्पवर तीन दगडांची चूल लावून पहिला स्वयंपाक- पिठलं भात- केला. रोज काहीतरी सत्कृत्य करण्याची चढाओढ असे. आज शेजारच्या आजीला दूध आणून दिले, आज एका अंध मुलाला हात धरून रस्ता ओलांडून दिला अशा नोंदी वहीत करायला कोण आनंद, अभिमान वाटायचा! त्याचदरम्यान राष्ट्रसेवा दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचेही संस्कार होत होते. आता तेही सौम्य झालेत किंवा संपलेत.
सुशिक्षित मध्यम वर्गाच्या, नागरी समाजाच्या वृत्तीच पार बदललेल्या आहेत. डॉक्टर झाल्यावर एक वर्ष शहर सोडून अंतर्भागात, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा द्यावी अशी अट आहे. या योजनेचे काय झाले? काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांचा मुलगा आय.आय.टी. पवईला शिकत होता. त्याला नियमाप्रमाणे तीन-चार महिने प्रत्यक्ष बांधकामावर राहून अनुभव घेणे अनिवार्य होते. माझ्या ओळखीपाळखीने काही सोय होऊ शकेल का, असे त्यांनी विचारले. मी त्यांना मुलालाच माझ्याकडे पाठवायला सांगून वेळ दिली. तर ते गृहस्थ मुलाला घेऊन स्वत: आले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मुलाशी तीन-चार प्रकल्पांविषयी बोलणे सुरू करून त्याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर गृहस्थ मध्येच म्हणाले, ‘अहो ही सर्व कामे फार कष्टप्रद असणार ना? उन्हातान्हात राबायचं. खरं तर मी इतके पैसे कमावतो की नातवंडांचीपण सोय केली आहे. काम न करताच तुमच्या ओळखीने दाखला नाही का मिळणार.?’ मला संताप आला. मी त्यांना बाहेर जायला सांगितले. मुलाला म्हणालो, ‘वडिलांचा बाब्या झाला नसशील तर थांब. छान मस्त काम शोधू’, बिचारा वडिलांचे बोट धरून खाली मान घालून निघून गेला.
वरील पाश्र्वभूमीवर एक योजना मनात येते. ती येथे सूत्रक्रमाने मांडत आहे. त्यावर जाहीर चर्चा अपेक्षित आहे.
० नाव- अजून ठरलेले नाही.
० कोणासाठी- १८ ते २१ वयोगटातील तरुणतरुणींसाठी
० शैक्षणिक पात्रता- १२वी पास
० अभ्यासक्रम- १ वर्ष
० पहिले तीन महिने- लष्करी शिक्षण- काही एक. कमीत कमी कामाची शिस्त आवश्यक आहे.
० पुढील चार महिने- एका शेतकरी कुटुंबात राहून नांगरणी, पेरणी, वखरणीपासून ते पिके कापून, झोडपून पोत्यात भरून घरी आणण्यापर्यंत सर्व कामांत सहभाग.
० त्यानंतर तीन महिने- आपत्ती व्यवस्थापन, फर्स्ट एड इत्यादींचे प्रशिक्षण. त्यात Industrial Basic Training (पाबळ)चा समावेश.
० शेवटचे २ महिने- विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे खालील कोणत्याही विषयाचे प्रशिक्षण. एकूण १२ महिने.
० Red Cross & First Aid; General Ward Service in Hospital; Health, Dietics, Immunization.
० Garden & Nursery training, Preparing Compost & good soil, Plant propagation (seed treatment, Grafting) soil conservation and watershed development.
० Community development, Participation & Organisation. Literacy Campaign, Non conventional domestic energy use (Solar, Biogas, Smokeless Chulhas..) Accounting for voluntary organizations.
या सर्वाचा मूळ उद्देश तरुण पिढीला देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे भान करून देणे असा आहे. तज्ज्ञ निर्माण करण्याचा नव्हे. हा अभ्यासक्रम पुरा केलेल्यांना पुढील औपचारिक शिक्षणात आणि नोकरीत प्राधान्यक्रम द्यावा.
असे हे एक वर्ष ‘वाया’ का घालवायचे असा विचार कोणी करेल. एका पालकाने उत्तमरीत्या १२वी झालेल्या आपल्या मुलीला एक वर्ष भारतातल्या निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांत पाठवून अनुभव घेऊ दिला. त्यानंतर विचार करून त्या मुलीने आपला अभ्यासक्रम ठरविला! वर्ष वाया नाही गेले!
LET US INVEST IN YOUTH!
0 comments:
Post a Comment