Wednesday, 30 November, 2011

ए फॉर अ‍ॅपल






आपला उद्योग हा कलाविष्कारच आहे आणि आपले उत्पादन ही कलाकृती आहे, असे स्टीव जॉब्स याचे मत आहे आणि आतापर्यंतची त्याची वाटचाल त्याच्या मताची पुष्टी करते. जॉब्सने अ‍ॅपल ही कंपनी काढली त्याला जेमतेम ३५ वर्षे झाली. या कंपनीचे कोणतेही उत्पादन प्रचलित या शब्दात बसत नाही. काळाचा वेध घेणारी तंत्रदृष्टी, तंत्रप्रतिभा आणि भविष्याला आकार देण्याची जिद्द असली की काय करता येते, याचे अ‍ॅपलचे प्रत्येक उत्पादन हे उदाहरण आहे. ग्राहकाच्या व्यवहारात आपल्या उत्पादनाची गरज निर्माण करणे हे मार्केटिंगचे कौशल्य मानले जाते. त्या अर्थाने जॉब्स हा या क्षणी जगातला सगळय़ात कल्पक मार्केटिंग मॅनेजर म्हणायला हवा. ज्या वेगाने त्याने आपल्या उत्पादनांव्दारे साऱ्या बाजारपेठेलाच आकार दिला, त्याला तोड नाही. जॉब्स बाजारात उतरायच्या आधीही संगणक होते आणि मोबाइल फोनही होते. पण या दोन्हींची मूलभूत व्याख्याच त्याने बदलली आणि आपली उत्पादने जवळपास ७५ देशांतल्या उच्चभ्रूंच्या चर्चेचा विषय करून दाखवली. वस्तुत: अ‍ॅपलचे मॅकिंतोश संगणक ज्या वेळी आले, त्यावेळी मायक्रोसॉफ्टस्ने बाजारपेठ जवळपास काबीज केल्यासारखीच स्थिती होती. बिल गेट्सचा उदय व्हायच्या आधी संगणक डॉस या कंटाळवाण्या प्रणालीवर चालत असत. एक साधी आज्ञा देण्यासाठी त्यावेळी ढीगभर बटणे आणि शब्द जुळवावे लागायचे. आणि परत आपण जे करत आहोत ते दृश्य स्वरूपात कसे असेल याचाही अंदाज डॉसच्या काळात नव्हता. ही परिस्थिती बदलली बिल गेट्स याने. साध्या बटणदाब्या कॅमेऱ्यांनी जी क्रांती केली ती संगणकाच्या क्षेत्रात गेट्स याने केली. हॉटशॉट टाइपचे कॅमेरे आल्यावर प्रत्येकालाच छायाचित्रकार झाल्यासारखे वाटू लागले आणि गेट्सच्या विंडोजमुळे अर्धशिक्षितालाही संगणक वापराचा आनंद घेता आला. त्या अर्थाने गेट्स याचे उत्पादन आणि औद्योगिक विचारधारा ही जनसामान्यांसाठी होती. तिच्यात होती फक्त सोय. पण सोय आणि सौंदर्य फार काळ सुखाने नांदत नाहीत. सोय सौंदर्याला मारक ठरते. तसेच बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट यांचे झाले. या पाश्र्वभूमीवर जॉब्स अ‍ॅपल घेऊन बाजारात उतरला. त्याचे मॅकिंतोश या नावचे संगणक दिसायला पीसीसारखेच  होते. पण त्याची कार्यशैली विंडोजपेक्षा कमालीची वेगळी होती. कमीत कमी बटणांचा वापर, ग्राहकाला चुकायची संधीच न देणारी गोळीबंद बांधणी, हे जॉब्सच्या उत्पादनांचे वैशिष्टय़ त्यावेळी पहिल्यांदा वापरणाऱ्यांच्या लक्षात आले. त्या वेळी संगणकात माहिती साठवण्यासाठी आणि ती इकडून तिकडे नेण्या-आणण्यासाठी चपटय़ा, काळय़ा अशा फ्लॉपीज् वापराव्या लागायच्या. विंडोजचा वापर करणाऱ्या पीसीवर त्याच्यासाठी बटणे असायची आणि त्याच्या आधारेच फ्लॉपीज् काढता वा घालता यायच्या. जॉब्सच्या मॅकने या बटणांना रजा दिली. संगणकाच्या पडद्यावरच फ्लॉपीज् काढण्या-घालण्यासाठी आदेश द्यावा लागायचा. वरकरणी ही बाब छोटीशी वाटत असली तरी या साध्या सुधारणेमुळे संगणकातील अनेक समस्या त्यावेळी टळल्या होत्या. आज डेस्कटॉप कुटुंबातील संगणक अनेकांना नकोसे वाटतात. याचे कारण त्यांना जागा फार लागते. संगणकाचा पडदा, स्मरणयंत्रणा आणि आदेशप्रणालीसाठी ते उभे खोके आणि कळफलक अशी किमान तीन गोष्टींसाठी डेस्कटॉप घ्यायचा तर सोय करावी लागते. अ‍ॅपलच्या मॅकने ही अडचण ओळखून आपल्या संगणकात आमूलाग्र बदल केला. त्याच्या मॅकने हार्ड डिस्क नावाचे खोकेच गायब केले आणि कळफलकाला पहिल्यांदा संगणकापासून सोडवले. या दोन बदलांमुळे संगणक इतका सोयीचा झाला की विचारता सोय नाही. कारण तो वापरण्यासाठी टेबलखुर्चीतच बसायची अट दूर झाली. पण हे झाले आहेत त्या उत्पादनांतील सुधारणांबाबत. पण खरा द्रष्टा हा प्रचलित व्यवस्थेला धक्का देऊन नवनिर्मिती करीत असतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे द्रष्टेपण जॉब्सच्या बाबत दिसले ते त्याच्या आयपॉड या उत्पादनाने. गाण्या-बजावण्याच्या क्षेत्रात एके काळी छोटेखानी ट्रान्झिस्टरने जी क्रांती केली असेल त्याचे पुढचे पाऊल या आयपॉडने टाकले. आपल्याला आवडती गाणी आपल्याबरोबर नेता यावीत ही कोणत्याही संगीतप्रेमींची गरज असते. ट्रान्झिस्टरने ती सोय काही प्रमाणात करून दिली आहे. पण रेडिओमध्ये कोणत्या गाण्यानंतर काय लागेल हे सांगता येत नाही. रेल्वे, विमान आदी प्रवासात रेडिओच्या ध्वनिलहरी सापडतीलच असे नाही. आयपॉडने हे दोन्ही टाळले. यातील महत्त्वाचा भाग असा की, आयपॉडला मोठे स्पीकर देण्याचे टाळून कुठेही, कोणाच्याही सोयी-गैरसोयींचा विचार न करता गाण्या- बजावण्याच्या भारतीय सवयीने ध्वनिप्रदूषणात भर घालायची संधीही त्याने दिली नाही. शिवाय याच आयपॉडला छोटा पडदा देऊन जॉब्सच्या आयपॉडने सिनेमा आदी पाहण्याचा आनंद बरोबर घेऊन हिंडायची संधी दिली. त्याच्या आयफोन या मोबाइल उपकरणानेही या खेळाचे नियम नव्याने लिहायची वेळ प्रतिस्पर्धी कंपन्यांवर आणली. दरम्यानच्या काळात त्याचे जुन्या शालेय पाटय़ांसारखे दिसणारे आयपॉड नावाचे उपकरण बाजारात आलेच होते. त्याने संगणकाला एखाद्या वहीच्या आकारात आणले आणि कमालीचे सोयीचे करून टाकले. त्या वहीच्या पडद्यावरच कळफलक वगैरेंची सोय देऊन त्याने आळशांसाठी संगणक न वापरण्याचे कारणच समूळ नष्ट करून टाकले. तर या जॉब्सने बुधवारी आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा केली. आतापर्यंतच्या अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांना एका समान सॉफ्टवेअरमध्ये गुंतवू शकेल आणि कोठूनही या उपकरणांच्या संपर्कात राहता येऊ शकेल, अशी सोय असलेली आयक्लाउड नावाची नवी प्रणाली त्याने उपलब्ध करून दिली. अ‍ॅपलचा जन्म १९७६ सालचा. यानंतरच्या काळात अन्य कोणत्याही कंपनीप्रमाणे या कंपनीलाही आपली भाग्यरेखा पुसली जाते की काय, असे वाटण्याइतके कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. स्टीवचा सुरुवातीचा भागीदार स्टीव्ह वोझ्निअ‍ॅक हाही वेगळा झाला. वाढता तोटा कंपनीला रसातळाला घेऊन गेला तरी जॉब्सचा आत्मविश्वास कायम होता. त्यात त्यालाही दुर्धर कर्करोगाने गाठले. पण त्याचा आत्मविश्वास इतका दुर्दम्य की, त्यातूनही त्याने नवनव्या उत्पादनांवर काम करणे सुरूच ठेवले. प्रत्येक नवीन उत्पादन हे आपण स्वत: जातीने जगापुढे सादर करायचा करार कर्करोगही मोडू शकलेला नाही. तीन महिन्यांपूर्वी त्याचे आयुष्य आता जेमतेम सहा आठवडेच राहिले आहे, अशा बातम्या आल्या होत्या. त्या स्टीवने तूर्तास तरी खोटय़ा ठरवल्या. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्टीव जॉब्स हा एक पंथ बनला आहे. दरवर्षी आता हा नवीन काय देणार याची उत्सुकता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असतेच असते. त्याच्याविषयी इतकी कमालीची उत्सुकता आहे की आणखी दीड-दोन वर्षांनी येणार असलेल्या आयस्टीव : द बुक ऑफ जॉब्सनावाच्या त्याच्या पहिल्या अधिकृत चरित्राने अ‍ॅमेझॉन आदी पुस्तकविक्रेत्या वेबसाइटवर आताच नोंदणीचे सर्व विक्रम मोडले आहेत. अल्बर्ट आइन्स्टाइन आणि बेंजामिन फ्रँकलीन यांची गाजलेली चरित्रे लिहिणारा वाल्टर आयझॉकसन हाच त्याचेही चरित्र लिहिणार आहे. अ‍ॅपलच्या यशामुळे अधोरेखित होते ती अशा प्रकारच्या जॉब्सना उत्तेजन देणारी अमेरिका नावाची व्यवस्था. चुकल्यानंतरही चुका करणाऱ्याच्या प्रयत्नांना दाद देणारी आणि पुन्हा उभारी देणारी अशी व्यवस्था जगाच्या पाठीवर अन्यत्र नाही. ती तयार झाली आहे ती स्थलांतरितांच्या योगदानातून. एखाद्या भाषेला मोठे व्हायचे असेल तर अन्य भाषांतील शब्दांना सामावून घेत घेत विस्तार करावा लागतो. तसेच समाजाचेही आहे. विस्ताराची इच्छा असल्यास अन्यांना सामावून घेण्यास विरोध करून चालत नाही. ऑस्ट्रेलिया, अनेक युरोपीय देश मी आणि माझे असे करीत बसले. असे अनेक स्टीव जॉब्स अमेरिकेत अखंड जन्मत असतात, ते या वृत्तीमुळे. आपल्याला यातून शिकण्यासारखे आहे. जॉब्स आता  कर्करोगाने कृश झाला आहे. थकला आहे. थडग्यात   जाताना जगातला सर्वात श्रीमंत माणूस गेला, असे माझ्याबाबत कोणी म्हणावे यात मला आकर्षण नाही. मला इच्छा आहे ती याने काहीतरी सुंदर करून दाखवले, अशा प्रतिक्रियेची, असे   बौद्धधर्म स्वीकारलेला स्टीव म्हणतो. त्याचे काम इतके मोठे की, पुढच्या पिढीस ए फॉर अ‍ॅपलम्हणजे नव्या युगातील या बौद्धाचे अ‍ॅपल’    असेच वाटेल.

(लोकसत्ता मधून साभार)


Wednesday, 23 November, 2011

..तर भारतातही स्टिव्ह जॉब्ज तयार होतील : साबीर भाटिया



altआपल्या मुलाने इंजिनीअर आणि गेल्या काही वर्षांंत तर खासकरून सॉफ्टेवअर इंजिनीअर किंवा वैद्यक शाखेत जावून डॉक्टर व्हावे, असे भारतातील बहुतांश पालकांना वाटते. खरेतर याच सुरक्षित मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे.. तसे झाले तर भारतातही स्टिव्ह जॉब्ज निर्माण होतील. खरेतर भारतीय मुलांमध्ये ती क्षमता आहे. पण पालकांनी मानसिकता बदलायला हवी.. असे सुस्पष्ट प्रतिपादन ‘हॉटमेल’चे जनक साबीर भाटिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.

जॅक्स्टर या नव्या कंपनीच्या माध्यमातून साबीर भाटियांनी एसएमएस क्रांतीची घोषणा मुंबईत केली. त्यानंतर नरिमन पॉइंटच्या समुद्रकिनाऱ्यावर मोकळ्या वातावरणात खास ‘लोकसत्ता’शी गप्पा मारताना ते बोलत होते. ते म्हणाले की, स्टिव्ह जॉब्ज स्वतला कलावंत म्हणवत होते. आणि त्यांना तसेच संबोधलेले आवडत असे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी नेहमीच्या सुरक्षित मानसिकतेतून बाहरे पडावे लागते. पारंपरिक बाबी नाकाराव्या लागतात आणि धोका पत्करावा लागतो. हा धोका अपयशाचा तर असतोच पण त्याचबरोबर तो लोकांकडून, बाजारपेठेकडून नाकारले जाण्याचाही असतो. त्यामुळे खंगून न जाता पुन्हा नव्याने उभे राहावे लागते. ते पराभव, ते अपयश हेच माणसाला खूप काही शिकवून जाते.

 मला देखील अनेक जण विचारतात की, हॉटमेलच्या क्रांतीनंतर दुसरी क्रांती तुम्ही का लगेच आणली नाहीत. अशी कोणतीही क्रांती ‘लगेच’ होत नसते. त्यासाठी त्या मागे अथक प्रयत्न, मेहनत असावी लागते. अनेकदा त्या मागे अपयशाचे डोंगरही असतात. हॉटेमेल नंतर अनेक कंपन्या सुरू केल्या आणि मग त्या बंदही कराव्या लागल्या. पण आता जॅक्स्टरने नवीन क्रांती आणली आहे. अर्थात त्या मागे १५ वर्षांची मेहनत आणि त्यातून घेतलेले धडे आहेत.

भारतीय मुलांकडे पाहातो त्यावेळेस असे लक्षात येते की, त्यांच्यातील अनेकांकडे स्टिव्ह जॉब्ज होण्यासाठी लागणारी कल्पकता- सृजनशीलता आहे, असे सांगून भाटिया म्हणाले की, मात्र आपण त्यांना फक्त इंजिनीअिरग किंवा मेडिकलच्या साच्यातून काढण्याचा प्रयत्न करतो आणि मग वेगळे काही करण्याची त्यांची मानसिकता आणि सृजनशीलता छाटून टाकतो. मग स्टिव्ह जॉब्ज कसे तयार होणार? असा सवालही त्यांनी केला. त्यासाठी मुलांना त्यांच्या मनातील सर्व चांगल्या बाबी करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे आणि लहान पणापासूनच धोका पत्करण्याची मानसिकता त्यांच्या मनात रुजवली पाहिजे, असेही साबीर भाटिया म्हणाले. 


(लोकसत्ता मधून साभार)

Monday, 21 November, 2011

त्यांनी माणसांना जवळ आणण्याचे काम केले



दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग: ८. 





स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेल्या उपकरणांनी माणसांना जवळ आणण्याचे काम केले, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जॉब्स यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. स्टीव्ह जॉब्सनं तयार केलेली अनेक उपकरणं बहुतेक लोकांच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडची होती. त्याच्या नेतृत्त्वाखाली तयार झालेली अ‍ॅपलची कोणतीही उपकरणं ही आयटी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीच्या उपकरणांपेक्षा वरचढ ठरली आहेत. ही उपकरणं मानवासाठी वरदान तर आहेत,
असेही टाटा यांनी म्हटले आहे. 

वाहिन्यांवर झळकणाऱ्या एका उत्पादनाच्या जाहिरातीत विविध यशस्वी लोक प्रश्न करतात, ‘हॅव आय मेड इट लार्ज?’ स्टिव्हच्या आयुष्याबाबत सांगायचे तर ही हॅड रिअली मेड लाईफ व्हेरी व्हेरी लार्ज!त्याचबरोबर आता अस्वस्थता आणि चिंता आहे ती या माणसाच्या मृत्यूनंतर एकूणच माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नावीन्याचा वेग कायम राहणार का याचीच!
..
ही आहे स्टिव्ह जॉब्ज्स या अवलियाच्या मृत्यूनंतर पुण्यातील त्याच्या असंख्य चाहत्यांकडून व्यक्त झालेली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया! 

माहिती-तंत्रज्ञानातील नावीन्याचा आणि कल्पकतेचा महागुरू असलेल्या स्टिव्हच्या मृत्यूची बातमी कळण्यासाठी त्याच्या चाहत्यांना वृत्तवाहिन्यांवर किंवा इतर प्रसिद्धीमाध्यमांवर अवलंबून राहावे लागले नाही, तर स्टिव्हनेच उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानामुळे त्यांच्या हातात असलेल्या मोबाईल फोनवरच ती ऑनलाइनसमजली. त्याच्या मृत्यूनंतर आयटी क्षेत्रातील नावीन्याचे काय होणार, याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली.

टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील अधिकारी आणि स्टिव्हच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारा त्याचा निस्सीम चाहता असलेले प्रकाश डुंबरे, स्टिव्हनंतर आपण त्याच्या डोक्यातून येणाऱ्या संभाव्य कल्पकतेला मुकणार, अशी खंत व्यक्त करतात. स्टिव्हने मोबाईलमध्ये कॅमेरा, संगीत आणि कॉम्प्युटरसुद्धा आणला. इतरांनी त्याचेच अनुकरण केले. त्यामुळे त्याच्या डोक्यात दडलेल्या असंख्य कल्पना व नावीन्याला आपण मुकणार, हे निश्चित! त्याच्यामुळे अ‍ॅपलचं काय होणार ही चिंता आहेच. त्याच्याही पलीकडे दर दोन-चार महिन्याला बाजारात नवी कल्पक उत्पादने येण्याची गरज असलेल्या आयटी क्षेत्राचे काय होणार आणि आता ही उत्पादने कोण आणणार, याची चिंता वाटते. अनेक जण कल्पक असतात, पण याची झेप प्रचंड होती.. ही हॅड रीअली मेड लाईफ व्हेरी व्हेरी लार्ज!डुंबरे सांगतात.
पुण्यातील एका आयटी फर्मचे संचालक अभिजित वाकळे यांच्या मते, ‘संपूर्ण आयटी क्षेत्रासाठी हे मोठे नुकसान आहे. मी गेल्या २० वर्षांपासून त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. नावीन्याचा विचार केला तर आता या संस्कृतीत प्रचंड बदल झाले आहेत. नावीन्य घडवून आणणारा तो मोठा उत्प्रेरक होता. अनेकांनी या क्षेत्रात नावीन्य आणले, पण स्टिव्हने त्यात क्रांती केली. एकाच कंपनीत एवढे नावीन्य पाहायला मिळणे कल्पनेच्या पलीकडचे आहे. ते स्टिव्हने दाखवून दिले. एकूणच तंत्रज्ञानाच्या आघाडीवर काही काळ तरी मंदी येईल,’ अशी प्रतिक्रिया वाकळे यांनी व्यक्त केली.

मोबियनया आयटी कंपनीचे मालक अजित गोखले सांगतात की, थेट पुण्याबद्दल बोलायचे तर विविध मोबाईल अॅप्लिकेशनविकसित करणाऱ्या डझनाहून अधिक लहान-मोठय़ा कंपन्या पुण्यात आहेत. त्यात मुख्य वाटा आय-पॅड, आय-मॅक्स, आय-फोन अशा अ‍ॅपलच्या उत्पादनांचा होता. स्टिव्हच्या जाण्याने त्यांच्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय एकूणच अ‍ॅपल आणि या क्षेत्रासाठी काय परिणाम होणार, हे समजून घेण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षे वाट पाहावी लागेल.   

माझा मित्र गेला
आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या एकदा हरवल्या की, पुन्हा कधीच मिळत नाहीत. स्टिव्हच्या निधनामुळे त्याच्या मैत्रीला मी आज पारखा झालो आहे. तो एक उत्तम मित्र, उद्योजक, संशोधक तर होताच, पण त्याचबरोबर तो पती आणि पिता म्हणूनही अतिशय कर्तव्यदक्ष होता. त्याच्याकडे असलेली कल्पनाशक्ती तर भन्नाट होती. इतर लोक चाचपडत असताना याच कल्पनाशक्तीच्या जोरावर तो सर्वाच्या पुढे असायचा. आमची मैत्री हायस्कूलपासूनची आहे. कॉलेजनंतर एकत्र काम करताना त्याच्यातला संशोधक मी खूप जवळून पाहिला आहे. कोणालाही आदर वाटावा, असा होता स्टीव्ह. त्याच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
स्टिव्ह वोझ्नियाक (सहसंस्थापक, अ‍ॅपल)

तो सगळ्यांसाठीच एक ऊर्जास्रोत होता
*
स्टीव्ह नसलेल्या जगातही राहावं लागेल, याची कधी कल्पनाच केली नव्हती. तो आम्हा सगळ्यांसाठीच एक ऊर्जास्रोत होता. आयुष्यातील बाकी सगळी कामं आणि महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवून मनातला आतला आवाज ऐकून त्याप्रमाणे मी पुढे जगणार आहे. स्टीव्ह जॉब्ससाठी हीच मोठी श्रद्धांजली ठरेल. -    आनंद महिंद्रा

* स्टीव्ह जॉब्स हा काळाच्या चार पावलं पुढे राहून काम करणारा उद्योजक, संशोधक होता. त्याने चौकटीतल्या सर्वच गोष्टींना आव्हान देत स्वतची नवीन विस्तृत चौकट तयार केली. केवळ नवनवी उपकरणं तयार करण्यावर भर न देता कला आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा तो पहिला उद्योजक म्हणायला हवा. त्याच्या कोणत्याही उपकरणात ही गोष्ट ठळकपणे आढळते. अशी चौकट मोडून काहीतरी वेगळं करणाऱ्या उद्योजक आणि संशोधकांसाठी स्टीव्ह हा नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
लक्ष्मी नारायणन (उपाध्यक्ष, कॉग्निझंट)

* जगातील सर्वात दुखद दिवस. स्टिव्ह जॉब्जने उत्पादन वापरणाऱ्यांच्याच्या मनात प्रवेश करून त्याचे परिमाणच पार बदलून टाकले. ही क्रांतीकारी घटना होती. आपले उत्पादन वापर करणाऱ्यांसाठी सुलभ असले पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटायचे. आयपॉड, आयफोन आणि आयपॅड प्रत्येकाचे वापरकर्ते वेगवेगळे आहेत. पण त्याच्या सुलभीकरणाचे तंत्र एकच आहे. केवळ एका अंगठय़ाचा किंवा एका बोटाचा वापर करून सारे काही करता येते, ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मोठी क्रांतीच होती. या विचाराने जगात आता अनेक क्रांतीकारी बदल आणले आहेत. त्याचे ते जनक होते. त्यांचे जाणे हा संपूर्ण जगासाठीचा मोठा दुखद दिवस आहे.
दीपक घैसास (आयटी व जैवतंत्रज्ञान उद्योजक)

* या शतकातील महान संशोधक आणि शास्त्रज्ञ हरपला -    विजय मल्ल्या 
(लोकसत्ता मधून साभार)



Friday, 18 November, 2011

जग बदलणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या १० कलाकृती



दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग: ७





पर्सनल कम्प्यूटरच्या युगाला चालना देणाऱ्या आणि संगीत, चित्रपट व  मोबाईल फोनमध्ये युझर फ्रेण्डलीक्रांती घडविणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या  नावावर एकूण ३१७ उत्पादनांचे पेटंट आहे. आयपॉड आणि त्याच्याशी संबंधित ८५ उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. लॅपटॉप,आयपॅड, आयपॉडपासून अ‍ॅपल टीव्हीपर्यंत जॉब्स यांच्या पोतडीतून अतिसुलभ आणि वेगवान उत्पादने तयार होत राहिली आहेत. तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल करणारी जॉब्स यांची ही टॉप १० उत्पादने

अ‍ॅपल  टू (१९७७)
१९७७ सालच्या जून महिन्यात अ‍ॅपल टु ने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली क्रांती घडवली. स्टीव्ह जॉब्स आणि  स्टीव्ह वोझ्नियाक यांनी डिझाईन केलेल्या अ‍ॅपल टू ने संगणीकय तंत्रज्ञानाचे सारे चित्रच बदलून टाकले. यानंतर संगणकीय तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली परंतु, अ‍ॅपलचा महिमा कोणालाही मोडीत काढता आला नाही. १-एमएचझेड प्रोसेसर, ४ केबी रॅम, ऑडिओ कॅसेट इंटरफेस आणि डाटा स्टोअरेज, ५.२५ इंचाची फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ही तंत्रज्ञानाची नवी रुपे अ‍ॅपल टु मुळे जगाने पाहिली. यातून अ‍ॅपल टु म्हणजे मास मार्केट पीसी अशी ओळख निर्माण झाली.  

लिसा (१९८३)
अ‍ॅपलचे १९८३ साली आलेले लिसा कंप्युटर हे उत्पादन अपयशी उत्पादनांच्या यादीत गेले. यावर १० हजार अमेरिकन डॉलर्स किंमतीचे लेबल लावण्यात आले होते. नव्या प्रणालीतील कंप्युटिंग सुविधा असलेला लिसा कंप्युटर दुर्दैवाने अपयशी उत्पादनांच्या मालिकेत नोंदला गेला. ग्राफिकल युजर इंटरफेस आधारित असलेला हा पहिलाच मल्टिटास्किंग कंप्युटर होता. स्टीव्ह जॉब्स या तंत्रज्ञानाच्या जादुगाराने घडवलेली ही किमया होती.

मॅकिंतोष  (१९८४)
मूळ मॅकिंतोष कंप्युटरची झलक ऑर्वेल्सच्या चित्रपटांमध्ये १९८४ साली पाहण्यास मिळाली होती. मॅकिन्टोश हा तांत्रिक फेररचना करण्यात आलेला पीसी होता आणि ग्राफिकल युजर इंटरफेस आणि माऊसच्या अशी दोन्ही सुविधा असलेले उत्पादन व्यावसायिक पातळीवर प्रचंड यशस्वी राहिले. १९९०च्या दशकात याचे महत्त्व काही काळ कमी झाले होते परंतु, नंतरच्या काळात याच्या विक्रीने प्रचंड जोर पकडला.

आयमॅक (१९९७)
स्टीव्ह जॉब्स १९९७ साली अ‍ॅपल कंपनीत परतल्यानंतर पहिल्या पिढीचे आय मॅकचे डिझाईन तयार केले. जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाच्या संगमातून घडवलेल्या आय मॅकने अ‍ॅपल कंपनीला उच्चभ्रू आणि सुशिक्षित ग्राहकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवून दिले. डिझायनर जोनाथन आयव्हे आणि स्टीव्ह जॉब्स यांच्या प्रयत्नातून आय मॅकची घडण झाली होती.

आयपॉड (२००१)
आयपॉड एमपी ३ प्लेयर २००१ साली बाजारपेठेत धडकला तेव्हा संगीताच्या दुनियेत नवी क्रांती घडल्याचे मानले गेले. वॉकमन त्या काळात प्रचंड पाप्युलर झाला होता परंतु, वॉकमनपेक्षा वेगळे काही पोर्टेबल संगीत उपकरण असू शकते, याची चुणूक अ‍ॅपलच्या आयपॉडने दाखवली

आय टय़ून्स (२००१)
एमपी ३ प्लेयरची क्रांतिकारी निर्मिती करून स्टीव्ह जॉब्सचे समाधान झाले नव्हते. लोकांसाठी त्याला एक नवे उत्पादन द्यायचे होते. आय टय़ून्स ही त्याचीच झलक होती. म्युझिक फाईल्स वाजवण्यासाठी आय टय़ून्सच्या निमित्ताने सुरुवात झाली परंतु, कालौघात पृथ्वीतलावरील सर्वात मोठे म्युझिक स्टोर्सम्हणून आय टय़ून्सची दखल घेतली गेली. हा जगातील सर्वात लोकप्रिय म्युझिक प्लेयर म्हणून गणला जात आहे.

मॅक बुक प्रो  (२००६)
जानेवारी २००६ मध्ये मॅकबुक प्रो लाँच करण्यात आला. पॉवर बुक जी ४ पासून प्रेरणा घेतलेल्या मॅकबुक प्रो च्या डिझाईनमध्ये पीॅवर पीसी चिप्स ऐवजी इंटेल कोअर दुहेरी प्रोसेसर्स बसवण्यात आले होते.  अ‍ॅपलच्या मशिन्समधील अनेकविध सुविधा आणि तंत्रज्ञानाचे हे सर्वाक सुरेल मिश्रण होते. हा लॅपटॉप जगातील सवरेत्कृष्ट क्सालिसल लॅपटॉप म्हणून आजही गणला जातो.

आयफोन  (२००७)
गेल्या मंगळवारी लाँच करण्यात आलेल्या आयफोन ४ एसच्या वेळी काही निरीक्षक निराश झाले. पहिल्या आयफोनने स्मार्टफोन लँडस्केपची व्याख्या बदलली हे खरे असले तरी आयफोन ४ एसमधील तंत्रज्ञान त्यापेक्षा खूप वेगळे असल्याचे निरीक्षकांचे मत नाही. स्टीव्ह जॉब्सच्या समर्पणाने साध्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे ३.५ इंचाचा टच स्क्रीन आय फोन दिला. परंतु, या प्रॉडक्टने बेस्ट सेलिंगचा उच्चांक नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मॅकबुक एअर (२००८)
पहिल्या मॅकबुक एअरला प्रारंभीच्या कालखंडात एवढे महत्त्व नव्हते जेवढे आजच्या युगात आले आहे. स्टीव्ह जॉब्सचे विचार त्या पलीकडचे होते. अ‍ॅपलने २००८च्या सुरुवातीला मॅकबुक एअ लाँच केला. लॅपटॉप आणि पर्सनल कंप्युटरची आणखी क्रांती स्टीव्ह जॉब्सच्या नावे नोंदली गेली.

आयपॅड (२०१०)
जानेवारी २०१० मध्ये आय पॅडचे लाँचिंग झाले त्यावेळी स्टीव्ह जॉब्सच्या तंत्रज्ञानाची किमया नव नव्या शोधांसाठी भुकेली असल्याचे सिद्ध झाले. टॅबलेट कंप्युटिंगची एक फेरी त्याने पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात या उत्पादनाने लोकांच्या मनाची पकड घेतली नाही. मात्र, साध्या आयओएस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमची भर घालून जॉब्सने अ‍ॅपलच्या व्हरायटीजचा प्रत्यय दिला.

(लोकसत्ता मधून साभार)

Related Posts with Thumbnails