मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी यांचं तो विश्वकोष हे एक स्वप्नच होतं, कोषाचे सोळा खंड त्यांच्या काळातच तयार झाले. पण ते जाडजूड खंड हाताळणं कठीण काम होतं (शिवाय किंमत हा मुद्दा होताच). आता ते सोळा आणि नंतर तयार झालेला सतरावा खंड इंटरनेटवर मोफत उपलब्ध होत आहे. त्या विषयी:
'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्लोपीडिया अ ते ज्ञ पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच. पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासनाच्या वतीने, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) या विश्वकोश ग्रंथांचा ६ सीडींचा (४५० ग्रॅम वजनाचा) संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) या नोंदींची, १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेली) २०,१८२ पाने समाविष्ट आहेत. जी संगणकावर कधीही बघता येतात. यासाठी संगणक तज्ज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.
घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडैकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला, तो आता ऐतिहासिक दस्तावेज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस मराठी विश्वकोशाचा पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्लिक करा, सर्व माहिती उपलब्ध! 'तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार', हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात (डिसेंबर, २०१२ पर्यंत) संपूर्ण १ ते १८ खंड सीडैकच्या सहकार्याने युनिकोड माध्यमातून विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय, हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. अरुंधती खंडकर, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्छा दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी जगास मोफत अर्पण झाला आहे. 'घराघरात विश्वकोश' या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in किंवा www.marathivishvakosh.in असा आहे.