Showing posts with label तरुणाई पुढची आव्हाने. Show all posts
Showing posts with label तरुणाई पुढची आव्हाने. Show all posts

Tuesday, 31 January 2012

अ‍ॅपलचे गुलाम


फक्त आणि फक्त श्रीमंतीच्या मागे लागल्याने आजूबाजूच्या परिस्थितीचं भानही हरवून बसल्यावर काय होतं आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या तंत्रज्ञानामुळे जीवनही किती अशाश्वत बनलय त्याचा डोळ्यात अंजन घालणारा  लोकसत्ता मधील लेख खास स्वप्नपंखच्या वाचकांसाठी.    

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, ३१ जानेवारी २०१२



altजागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या रेटय़ापुढे कुशल कामगारदेखील निरुपयोगी ठरू लागले आहेत. तीस वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरणी कामगारांना जे अनुभवले ते वास्तव सध्या अमेरिकेतील अभियंत्यांच्या वाटय़ाला आले आहे.. एरिक सारागोझा रोमांचित अवस्थेत अ‍ॅपलच्या आवारात शिरला होता. खूप मेहनत करून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्यासाठी बराच खर्च आला होता. कर्ज डोक्यावर होते. सात-आठ वर्षांचा नोकरीचा अनुभव गाठीशी धरून तो अ‍ॅपलमध्ये आला. हा त्याचा ‘ड्रीम जॉब’ होता. स्टीव्ह जॉब्सच्या अ‍ॅपल कंपनीचे त्यावेळी नाव झाले नसले तरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनीचा दबदबा होता. कल्पकतेला अभियांत्रिकी कौशल्याची जोड देत अजोड यंत्रकृती अ‍ॅपलमध्ये तयार होऊ घातल्या होत्या. कल्पक यंत्रविशारदांची ती कर्मभूमी होती. सारागोझा तेथील वातावरण पाहून थक्क झाला. आपल्या कौशल्याला, मेहनतीला, कल्पकतेला इथे पूर्ण वाव आहे हे त्याला कळून चुकले. मनापासून काम केले तर घसघशीत डॉलर्स हातात पडतील याची खात्री होती. बायको व तीन मुलांचे कुटुंब त्याला चालवायचे होते. मुलांच्या शिक्षणाची तजवीज करायची होती. स्वत:ची व कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची जरुरी होती. मेहनत, कुशलता व कल्पकता दाखवाल तर पैसे देण्यास अ‍ॅपल तयार होती.

सारागोझाने मेहनत केली. कल्पकता दाखविली. कौशल्य तर त्याच्याकडे होतेच. तो झपाटय़ाने बढती मिळवीत गेला. पगार वाढला. अ‍ॅपलमध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘डायग्नोस्टिक टीम’मध्ये त्याचा समावेश झाला. मुले महागडय़ा पण प्रतिष्ठित शाळेत दाखल झाली. बायको मनासारखी खरेदी करू लागली. पोहोण्याचा तलाव दाराशी असलेला बंगला विकत घेतला गेला. घर मनासारखे सजले. सारागोझाचा पगार ५० हजार डॉलर्सवर पोहोचला. शनिवार-रविवारची सुट्टी तो चैनीत उपभोगू लागला. गरिबीतून उच्च मध्यमवर्गात त्याने सुखात प्रवेश केला. शिक्षणाकरता घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. शिक्षणावर केलेला खर्च वाया जात नाही हे लक्षात ठेवा, असे तो सर्वाना सांगू लागला. ते १९९५ साल होते.

सारागोझाकडे अभियांत्रिकीचे शिक्षण होते. या क्षेत्रात तो सतत स्वत:ला अद्ययावत करीत होता. अ‍ॅपलच्या बॉसना जे काही हवे ते तयार करून देत होता. नवीन उत्पादने अधिकाधिक निर्दोष कशी होतील यावर लक्ष केंद्रित करीत होता. हे खूपच महत्त्वाचे काम होते. अ‍ॅपलच्या यशात या कामाचा वाटा मोलाचा होता. अभ्यास, शिस्त, मेहनत, कंपनीसाठी समर्पण या गुणांत तो कोठेही कमी नव्हता. मात्र जगाच्या अर्थकारणात काय बदल होत आहेत याची त्याला कल्पना नव्हती. भांडवलशाहीचे खरे रूप उमगले नव्हते. ज्या तंत्रज्ञानाशी तो मस्तीत खेळत होता त्याचा अर्थव्यवस्थेला बसणारा हिसका त्याला समजत नव्हता. आपले आयुष्य आता स्थिर झाले अशा खुषीत तो असताना आजूबाजूच्या वातावरणात महत्त्वाचे बदल होत होते. उच्चशिक्षित असूनही सारागोझाच्या ते लक्षात आले नव्हते. कुणी लक्षात आणून दिले असते तरी त्याने ते मानले नसते.

अमेरिकेत उत्पादन करण्यापेक्षा परदेशात उत्पादन करणे अधिक फायद्याचे आहे हे याच काळात अ‍ॅपल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. नव्या उत्पादनांचे आरेखन अमेरिकेत करता येईल. त्यासाठी अगदी थोडे कल्पक अभियंते लागतील. मात्र उत्पादनासाठी लागणारी कामगारांची साखळी येथे ठेवण्याची गरज काय, असा सवाल उठला. आयफोन, आयपॅड, संगणक बनविण्यासाठी लागणारे अनेक सुटे भाग जगात इतरत्र तयार करून मिळणार होते. त्याचा उत्पादन खर्चही खूप कमी होता. अ‍ॅपलचे फक्त डिझाईन अमेरिकेत बनवावे, इतर सर्व कामे अन्य देशांतून करून घ्यावीत असा निर्णय झाला. टिमोथी कूक या अ‍ॅपलच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच अ‍ॅपलचे जवळपास ९०टक्के भाग परदेशात तयार होऊ लागले. सेमीकंडक्टर जर्मनी व तैवानमधून, मेमरी कार्डस् जपान व कोरियातून, डिस्प्ले पॅनेल्स व सर्कीटस् कोरिया व तैवानमधून, चीप्स युरोपातून तयार होऊ लागल्या. या सर्वाची जोडणी करणे हे अतिशय महत्त्वाचे काम करण्यासाठी चीन पुढे सरसावला. ही जोडणी करण्यासाठी अचूकता व वेग या दोन्हींची गरज होती. मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अर्धकुशल कामगार हवे होते. अल्प वेतनावर कित्येक तास काम करणारे कामगार ही अ‍ॅपलची गरज होती. त्यातून अ‍ॅपलचा नफा कित्येक पटींत वाढत होता. अ‍ॅपलची ही गरज भागविण्यास चीन तयार होता. कारण चीनकडे बेकार हातांची कमी नव्हती.

अ‍ॅपलच नव्हे तर अन्य कंपन्यांचीही हीच गरज होती. जगातील श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हायचे आहे व त्यासाठी त्यांना लागणारे कुशल व अर्धकुशल मनुष्यबळ आपण पुरवू शकतो हे चीनच्या राज्यकर्त्यांनी ओळखले. ‘फॅक्सकॉन सिटी’ ही वसाहत त्यातून उभी राहिली. तेथे रोज अडीच लाख कामगार काम करतात. आयफोनच्या विक्रमी उत्पादनासाठी अ‍ॅपलला दोन लाख जुळारी हवे होते. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आठ हजार अभियंत्यांची गरज होती. अमेरिकेत स्वस्त मनुष्यबळ नव्हते. समाज श्रीमंत झाल्यामुळे अर्धकुशल काम करण्याची कोणाची तयारी नव्हती. अ‍ॅपलला हवी असलेली यंत्रणा उभी करण्यास अमेरिकेत वर्ष-सव्वा वर्ष लागले असते. चीनने ती पंधरा दिवसांत उभी करून दिली. चीन सरकारने सर्व सहाय्य केले. आठ हजार कर्मचाऱ्यांनी बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करून ९६ तासांत जुळणी यंत्रणा उभी केली व दरदिवशी दहा हजार आयफोनची जुळणी होऊ लागली. हा राक्षसी वेग पाहून अ‍ॅपल थक्क झाली व चीनला कंत्राट मिळाले. आश्चर्य म्हणजे मागणीनुसार कामगार वाढविणे व कमी करणे हे कम्युनिस्ट चीनमध्ये सहजशक्य आहे. भांडवलदारी अमेरिकेत नाही. आज अ‍ॅपलचे सात कोटी आयफोन, तीन कोटी आयपॅडस् व सहा कोटी अन्य उत्पादने जगात खपतात. त्या सर्वाची जुळणी चीनमध्ये होते. 

तंत्रज्ञान व जागतिक अर्थकारण यांच्या संयोगातून होत असलेले बदल सारागोझाला समजू  शकले नाहीत. एक दिवस त्याला वरिष्ठांचे बोलवणे आले. ज्या कामासाठी अमेरिकेत २२ डॉलर्स दिले जातात तेच काम सिंगापूरमध्ये पाच डॉलर्समध्ये कसे होते हे त्याला ‘समजावून’ सांगण्यात आले. त्याच्या सहकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. माणसे कमी होत गेली. शनिवार, रविवारची सुट्टी संपली. काम १२ तासांवर गेले. तरीही सारागोझा मेहनत करीत राहिला. कुटुंबाचे सुख व मुलांचे शिक्षण त्याच्या डोळ्यासमोर होते. परंतु वय वाढत होते. तंत्रज्ञानाच्या नव्या लाटेत त्याची कुशलता निरुपयोगी ठरत होती. शेवटी तो दिवस आला. २००४ मध्ये त्यालाही कमी करण्यात आले. सारागोझा कुटुंबाची आर्थिक चौकट ढासळली. त्यानंतर तो अन्य ठिकाणी कामे करीत राहिला. पण त्याला मागणी नव्हती. नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या तरुणांसमोर त्याचा टिकाव लागणे शक्य नव्हते. 

अ‍ॅपलमध्ये तासाला ३०० डॉलर्स कमविणारा सारागोझा आता तासाला केवळ १० डॉलर्सवर काम करतो आहे. त्याचेच काम करणारा चीनमधील अभियंता तासाला २० डॉलर्स मिळवीत आहे. चिनी अभियंत्यासाठी ही चैन असली तरी नोकरी टिकण्याची शाश्वती नाही व अन्य कोणतेही फायदे नाहीत. सारागोझाची मिळकत घसरत असताना अ‍ॅपलची बरकत १०८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मिशिगन, न्यूजर्सी, मॅसेच्युसेट या अमेरिकेतील तीन मोठय़ा राज्यांच्या एकत्रित अर्थसंकल्पाहून मोठे बजेट अ‍ॅपलने शेअर बाजारात मांडले. शेअरचे भाव ४५ डॉलर्सवरून ४२७ डॉलर्सवर चढले. समभागधारक मालामाल झाले. अ‍ॅपलमधील अतिवरिष्ठ व्यवस्थापकांना दोन अब्ज डॉलर्सचा बोनस मिळाला. ही सर्व भरभराट घडवून आणणाऱ्या टिमोथी कुकचा पगार दीड कोटी डॉलर्सवर पोहोचला. एरिक सारागोझासमोर मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची तजवीज कशी करावी ही समस्या उभी राहिली. मुलांना दर्जेदार शिक्षण हवे होते, पण ते महाग होते. सारोगोझा कुटुंब उच्च मध्यमवर्गातून पुन्हा गरिबीत ढकलले गेले. शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा या गुणांवर अर्थकारणाने मात केली.

मुंबईतील गिरणगावात तीस वर्षांपूर्वी असेच झाले. औद्योगिक क्षेत्रातील बदल कामगार समजू शकले नाहीत. ते समजून घ्यावेत असे त्यांच्या नेत्यांना वाटले नाही. अमेरिकेची मागणी लक्षात घेऊन चीनमधील राज्यकर्त्यांनी जे केले ते भारतालाही करता आले असते. पण तेही आपण केले नाही. परंतु हा प्रश्न अमेरिका, चीन, भारत यातील रोजगारापुरता मर्यादित नाही, तर भांडवलशाहीच्या स्वरूपाशी निगडित आहे. तंत्रज्ञानात बदल पूर्वीही होत होते. या बदलामुळेच अमेरिकेतील शेतकरी हा प्रथम कामगार झाला. अर्धकुशलतेकडून कुशल होत गेला. मात्र हे बदल सावकाश होत होते. यामुळे मध्यमवर्गाच्या जीवनाला स्थिरता येत होती. आता बदल झपाटय़ाने होतात व त्यामुळे अनेक कुशल कामगारही प्रवाहाच्या बाहेर क्षणार्धात फेकले जातात. निष्णात व कल्पक कामगार आणि ढोर मेहनत करणारे अर्धकुशल अशा दोन टोकांमध्ये जगातील रोजगार सध्या विभागला गेला आहे. पण प्रत्येकजण या दोन टोकांत सामावला जात नाही. जगात सर्वसाधारण आयुष्य जगणारे सारागोझासारखेच बहुसंख्य असतात. फक्त पैसा वा फक्त काम एवढेच त्यांचे जीवन नसते. आरोग्य, शिक्षण व थोडा कमी चालेल, पण निश्चितपणे मिळणारा पैसा इतकी माफक अपेक्षा त्यांची असते. मात्र या सुशिक्षित, सर्वसाधारण मध्यमवर्गाच्या अपेक्षा नवे अर्थकारण पूर्ण करू शकत नाही. अशा ‘सर्वसाधारण’ बहुसंख्यांनी करायचे काय ही समस्या सध्या अमेरिकेला भेडसावत आहे. चीनलाही पुढील काही वर्षांत ती सतावू लागेल, कारण अन्य देशांत स्वस्त मनुष्यबळ मिळाले की रोजगार तिकडे वळतील. १९९१ मध्ये एरिक सारागोझा जी मौज अनुभवीत होता ती आज चीनच्या शान्झेनमधील अभियंता अनुभवीत असला तरी तोही त्याच दिशेने पुढे सरकत आहे आणि नव्या अर्थव्यवस्थेच्या चाकावर बसलेला भारतीयही त्या ठिकाणापासून फार दूर नाही. एरिक सारागोझा किंवा चीनमधील कष्टाळू कामगार या दोघांच्या आशाआकांक्षांशी अ‍ॅपलला काहीही देणे-घेणे नाही. सुशिक्षित, मध्यमवयीन बेरोजगारांचे करायचे काय हा आमचा प्रश्न नाही, असे अ‍ॅपलने स्वच्छ सांगून टाकले. अ‍ॅपलला फक्त गुलाम हवे आहेत. भरपूर नफा कमावून देणारे गुलाम.! मग ते देशात मिळोत वा परदेशात.
अमेरिकेत फोफावलेल्या या ‘अ‍ॅपल’वृत्तीला माणसाळावे कसे या विवंचनेत सध्या ओबामा आहेत.

(मुख्य संदर्भ : ‘हाऊ द यूएस लॉस्ट ऑन आयफोन वर्क’ हे न्यूयॉर्क टाइम्समधील वार्तापत्र.)

साभार : लोकसत्ता  

Thursday, 29 December 2011

स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली सत्र प्रारंभ होताना स्टॅनफोर्ड विद्यापिठात केलेले भाषण.





(अनुवाद उदय कुलकर्णी)


जगातील एका सर्वोत्तम विद्यापिठाच्या सत्राचा प्रारंभ होत असताना मी आज इथे उपस्थित आहे हा माझा सन्मान आहे. खरं सागांयचे तर कॉलेज पदवीच्या इतक्या जवळ जाण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगायच्या आहेत. होय, फक्त तीन गोष्टी, त्यापलिकडे काही नाही. फक्त तीन गोष्टी.

पहिली गोष्ट आहे घटनांचे अर्थ शोधण्याची धडपड करण्याची.

रीड कॉलेजमधून पहिल्या ६ महिन्यानंतरच मी ड्रॉप आऊट झालो. पण नंतर १८ महिने मी तिथेच ड्रॉप-ईन म्हणून राहिलो व मगच पूर्णपणे कॉलेजला राम राम ठोकला. 

माझ्या जन्माआधीपासून याची सुरवात झाली होती. माझी जन्मदात्री आई एक तरूण, अविवाहीत कॉलेज विद्यार्थिनी होती. तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. ती स्वत: पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती, त्यामुळे तिला अगदी ठामपणे वाटत होते मला कोणा पदवीप्राप्त व्यक्तीनेच दत्तक घ्यावे. माझा जन्म झाल्याबरोबर एक वकील व त्याची पत्नी मला दत्तक घेतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  फक्त माझा जन्म झाला आणि त्या जोडप्याने अगदी शेवटच्या घटकेला ठरवले, नाही त्यांना मुलगी हवी आहे.  प्रतीक्षायादीवर जे पुढील जोडपे होते त्यांना मग भर मध्यरात्री फोन करण्यात आला व विचारण्यात आले, “आमच्याकडे एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे; तुम्हाला हवा आहे का?” ते म्हणाल, “अर्थातच, हवा आहे.” त्यांनी मला दत्तक घेतले.   माझ्या जन्मदात्या आईच्या नंतर लक्षात आले मला दत्तक घेणारी माझी आई कॉलेज पदवीधर नाही तर वडिलांचे तर शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नाही.  जन्मदात्या आईने दत्तकपत्राच्या करारावर सही करायला नकार दिला. काही महिन्यानंतर माझ्या दत्तक माता-पित्यानीं मला कॉलेजमध्ये पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले तेव्हाच माझ्या जन्मदात्या आईने मला दत्तक द्यायचे मान्य केले. 

आणि १७ वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये दाखल झालोच.  पण मूर्खपणे, मी स्टॅनफोर्डइतक्याच एका महागड्या कॉलेजची निवड केली.   कामगारवर्गातील माझ्या आई-वडिलांची सगळी बचत माझ्या कॉलेज फीसाठीच खर्च व्हायला लागली.  सहा महिन्यानंतर त्या शिक्षणात मला काही अर्थ दिसेना. आयुष्यात पुढे काय करायचे मला माहित नव्हते आणि कॉलेज शिक्षणाचा काय उपयोग होईल तेही कळत नव्हते.  आणि तरीही मी माझ्या पालकांची आयुष्यभराची सर्व कमाई त्यावर खर्च करत होती. त्यामुळे मी ठरवले आपण ड्रॉप आऊट होऊ आणि होईल सगळे काही ठीक. खरे तर त्यावेळेस ही खूप चिंता करण्यासारखी स्थिती होती. पण आता मागे वळून बघताना वाटतं, मी घेतलेला हा एक अगदी उत्तम निर्णय होता.   ड्रॉप आऊट झाल्याबरोबर मला स्वारस्य नसलेल्या वर्गांना उपस्थित राहणे बंद केले आणि ज्यात मला इंटरेस्ट वाटत होता अशा वर्गांना उपस्थित राहू लागलो. 

अर्थात नंतरचे दिवस खूप सुखाचे व सरळ सोपे नव्हते.   वसतीगृहात खोली नसल्याने मला मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपावे लागे.   कोकच्या बाटल्या परत करून जे डिपॉजीट म्हणून ठेवलेले पैसे परत मिळत त्यातून मी माझा जेवणाचा खर्च भागवत असे.  आठवड्यातून एकदा तरी भरपेट जेवण मिळावे म्हणून मी दर रविवारी रात्री गावातील हरे कृष्ण मंदिरात जात असे, तेही ७ मैल चालत. पण या अडचणी असूनही मला ही स्थिती जास्त भावत होती.  माझी जिज्ञासा आणि अंत:प्रेरणा जो मार्ग मला दाखवत होते, त्याच दिशेने मी जात होतो. आणि त्या प्रवासात जे माझ्या हाती लागले ते नंतर अतिशय अनमोल ठरले. एक उदाहरण देतो: 

रीड कॉलेजमध्ये तेव्हा कॅलिग्राफीचे एकदम उत्तम शिक्षण मिळायचे.  कॉलेज परिसरातील प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हातानी लिहिलेल्या सुंदर कॅलिग्राफीने सजलेले असायचे. ड्रॉप आऊट असल्याने मला आधीच्या विषयांच्या वर्गांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती.   मी मग कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहायचे ठरवले.   इथे मला सेरीफ व सॅन सेरीफ टाईपफेसेस म्हणजे काय ते कळले (टीप: अक्षरांच्या टोकांवर रेष देऊन ते ठळक करणे म्हणजे सेरीफ व तसे न करणे म्हणजे सॅन सेरीफ. उदा: मराठी लिहिताना अक्षरांच्या डोक्यावर रेष न काढणे सॅन सेरीफ म्हणता येईल.) तसेच वेगवेगळ्या अक्षरांसाठी मध्ये जागा सोडताना ती कशी कमी जास्त करायची ते कळले. खूप चांगली टायपोग्राफी खूप चांगली कशामुळे होते ते मला कळले. कॅलिग्राफी जणू माझ्यावर मोहिनी घातली.   ते शिकणे छान होते, त्याला ऐतिहासिक संदर्भ होता कलात्मकदृष्ट्या ते इतके तरल होते, विज्ञानाची तत्वांत त्याला जखडता आले नसते. 

यापैकी कशाचाच माझ्या आयुष्यात उपयोग होईल अशी शक्यता नव्हती. पण नंतर दहा वर्षांनी आम्ही आमचा पहिला मॅकिनटॉश संगणक डिझाईन करायला घेतला तेव्हा हे माझ्या उपयोगी पडले. हे सर्व आम्ही आमच्या मॅकमध्ये घेतले.   सुंदर टायपोग्राफी असलेला हा पहिलाच संगणक होता.   जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मॅकमध्ये अनेक टाईपफेस आलेच नसते किंवा प्रमाणबध्द अंतर राखून असलेले फॉन्टही त्यात नसते.  आणि विंडोजने मॅकची फक्त कॉपी केली. बहुधा स्वत:हून अशी सोय करायचे त्यांना सुचले नसते, म्हणजे जगातील कोणत्याच संगणकात ही छान सोय मिळाली नसती. जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मी कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहिलो नसतो आणि पर्सनल कॉम्पुटरमध्ये आज जी टायपोग्राफीची सुंदर सोय आहे ती मिळालीच नसती. अर्थात मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा यामुळे भविष्यात असा फायदा होईल असा अर्थ लावणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे बघताना मात्र ते सुस्पष्ट होते. 

हा माझा मुद्दा पुन्हा स्पष्ट करतो, पुढे आयुष्यात काय घडेल, त्याचा विचार करत आपण आपल्या आयुष्यात आज घडणार्‍या घटनांची सुसंगती लावू नाही शकत. पण मागे ज्या घटना घडून गेल्या त्या आधारे आपल्या आजच्या आयुष्याचा अर्थ लावू शकता. म्हणजे ज्या घटना घडत आहेत, त्याचा तुमचे भविष्य घडवण्यासाठी पुढे उपयोग होईल असा विश्वास तुमच्यात हवा. तुमची जिद्द, नियती, आयुष्य, कर्म कशावर तरी तुमचा विश्वास हवा. हा दृष्टीकोन असल्यामुळे निराशा कधी माझ्या वाट्याला आली नाही, आणि हा दृष्टीकोन असल्यानेच माझ्या आयुष्यात चांगले, सकारात्मक बदल झाले. 

माझी दुसरी गोष्ट आहे ज्याची आवड आहे तेच आयुष्यात करायला मिळण्याबाबत आणि गमावण्याबाबत. 

मला काय करायची आवड आहे, हे आयुष्यात खुप लवकर मला कळले हे माझे भाग्य.   मी केवळ २० वर्षांचा असताना, माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये वॉझ व मी मिळून अ‍ॅपल कंपनी सुरू केली. आम्ही प्रचंड मेहनत केली आणि १० वर्षात एका गॅरेजमधून फक्त आम्हा दोघांच्या बळावर चालणारी ही कंपनी एक मोठी कंपनी बनली – चक्क ४००० कर्मचारी असणारी व २ बिलियन डॉलरची कंपनी. आमची सर्वोत्कृष्ट निर्मिती – मॅकिनटॉश- एका वर्षाआधी आम्ही बाजारात आणला होता आणि मी ३० वर्षांचा झालो होता. आणि माझी हकालपट्टी करण्यात आली.  जी कंपनी तुम्ही सुरू केली, त्यातून तुमची हकालपट्टी कशी होऊ शकते?  सांगतो. अ‍ॅपल जशी वाढायला लागली, आम्ही एका व्यक्तीची नेमणूक केली.  मला वाटले माणुस बुध्दीमान आहे, आम्ही दोघे मिळून कंपनी आणखी मोठी करू. पहिल्या वर्षी सर्व चांगले सुरू होते. पण कंपनीची पुढे वाटचाल कशी असावी या विषयी आमच्या धारणेत नंतर खूप मतभेद होत गेले आणि शेवटी तर ते विकोपाला गेले. संचालक मंडळात त्याच्या बाजूने बहुमत झाले आणि ३०व्या वर्षी मला माझ्याच कंपनीतून बाहेर पडावे लागले. अगदी जाहिरपणे.  माझ्या जाणत्या वयातील आयुष्याचा पूर्ण फोकसच माझ्यापासून हिरावला गेला आणि मी उध्वस्त झालो. 

काही महिने तर काय करावे हेही मला सुचत नव्हते.  उद्योजकांच्या माझ्या आधीच्या पिढीला मी तोंडघशी पाडले आहे, अशी माझ्या मनात अपराधी भावना होती.  मशाल माझ्या हातात दिली जात असतानाच्या क्षणी मी अवसानघात केला आहे असे वाटत होते.   डेव्हीड पॅकार्ड व बॉब नोयसी यांना मी भेटलो व माझ्या या घोळाबद्दल माफी मागायचा प्रयत्न केला.  मी अगदी प्रसिध्द व्यक्ती होतो आणि मी सिलिकॉन व्हॅलीपासून दूर पळून जाण्याचाही विचार केला.  पण हळू हळू मला एक गोष्ट उमजत गेली.   मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते. अ‍ॅपलमधील घडामोडीमुळे त्यात जरासुध्दा बदल झाला नव्हता. मला नकार मिळाला होता, पण माझे प्रेम कायम होते. हा विचार सुचल्यावर मग मी ठरवले पुन्हा पहिल्यापासून सुरवात करायची.   त्या वेळेस माझ्या लक्षात आले नाही, पण अ‍ॅपलमधून हकालपट्टी होणे ही माझ्यासाठी सर्वात उत्तम घटना होती. यशस्वी असण्याचा बोझ माझ्या छातीवरून हटला गेला. नवीन सुरवात करताना कशाचीच खात्री नसते आणि अपयशाच्या भीतीचा दबाव नसतो. एक मुक्तपणा मला अनुभवायला मिळाला. माझ्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील कालखंडाचा लाभ मला त्यामुळे मिळाला. 

पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट (NeXT) नावाची कंपनी सुरू केली, पिक्सर नावाची आणखी एक दुसरी कंपनी सुरू केली. आणि एका विलक्षण स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी नंतर माझी पत्नी झाली. पिक्सरने बनवली, जगातील पहिली कॉम्पुटर अनिमेटेड फिचर फिल्म, टॉय स्टोरी, आणि जगातील सर्वात यशस्वी अनिमेशन स्टुडीओ पिक्सरचा आहे. 

या नंतर काही नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या, अ‍ॅपलने नेक्स्ट विकत घेतली. मी अ‍ॅपलमध्ये परतलो. नेक्स्टमध्ये जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले होते, तेच अ‍ॅपलच्या पुनश्च: भरभराटीसाठी कामात आले.  आणि माझी पत्नी लोरीन व मी, आमचे एक आनंदी कुटुंब आहे. 

अ‍ॅपलमधून माझी हकालपट्टी नसती तर यातले काही घडलेच नसते याची मला खात्री आहे. ते एक कटू औषध होते, पण रुग्णाला त्याचीच गरज होती. कधी कधी आयुष्य तुमच्या टाळक्यात एक वीट हाणते. पण विश्वास गमावू नका. मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते आणि त्यामुळेच मी हार न मानता, पुढे जात राहू शकलो या बद्दल मी ठाम आहे. काम हा तुमच्या आयुष्याचा एक फार मोठा भाग असतो.  आणि खूप उत्तम काम करायचे असेल तर, तुम्ही जे काम करत आहात त्याच्या प्रेमात असणे हाच एक मार्ग आहे.  हे तुमचे असे प्रेयस तुम्हाला अजून मिळाले नसेल तर त्याचा शोध घेत रहा.   तडजोड करू नका.   नातेसंबंधातील प्रेम मिळाले आहे हे जसे तुमच्या ह्यदयातील आवाज तुम्हाला सांगतो, तसेच कामाच्या बाबतीतही ती अनुभूती मिळेल. आणि चांगले नातेसंबंध जसे काळाच्या ओघात अधिकाधिक परिपक्व होत जातात तसे कामाच्या बाबतीतही होईल. त्यामुळे तुमच्या आवडीच्या कामाचा शोध घेत राहा. 

माझी तिसरी गोष्ट आहे, मृत्यूबाबत. 

मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा एक सुभाषित वाचले होते, ते असे, “प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यचा जणू शेवटचा दिवस आहे, असे जगलात तर, एक दिवस तुमचा विचार अगदी तंतोतंत खरा ठरणार.” या वाक्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्यानंतर मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशात बघून स्वत:ला विचारतो, “आज जरा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर आज मी जे करणार आहे तेच केले असते का?” आणि सलग अनेक दिवस या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे मिळत गेले तर माझ्या लक्षात येते, काही बदल करण्याची गरज आहे. 

आयुष्यात महत्वाचे मोठे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, मी लवकरच मरणार आहे याचे भान, मला साहाय्यकारी ठरले. कारण मृत्यू समोर असताना फक्त खरोखरच्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्या उरतात, बाकी इतर सर्व, इतरांच्या अपेक्षा, तुमचा गर्व, अभिमान, अपयशाची भीती सगळे गळून पडते. आपण कमावलेले गमावून बसू या भीतीने आपण नवे काही करायचा धोका घ्यायला बघत नाही. या दुष्टचक्रात अडकून बसायचे नसेल तर आपण मरणार आहोत याचे भान ठेवणे. शेवटी तुम्ही सर्व गमावणारच आहात, मग तुमच्या ह्यदयाच्या हाकेला प्रतिसाद द्या.

साधारण एका वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे याचे निदान झाले. सकाळी ०७:३० वाजता स्कॅन केले तेव्हा स्पष्टपणे दिसले माझ्या स्वादुपिंडात ट्यूमर आहे. स्वादुपिंड म्हणजे काय तेही मला माहित नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले, हा नक्कीच एक असाध्य प्रकारचा कॅन्सर आहे आणि मी फारतर फक्त सहा महिने जगू शकेन. माझ्या डॉक्टरांनी सांगितले, घरी जावून, मी माझी कामे मार्गे लावावीत, अर्थात ते सांगत होते, मी मरण्याची तयारी करावी. जे तुमच्या मुलांना कधीतरी दहा वर्षांनतर सांगावे लागले असे वाटत होते, ते सांगायला फार थोडा अवधी आहे. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करणे. निरोप घेणे. 

त्या निदानामुळे सर्व दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो, मनात खळबळ माजली होती. त्याच दिवशी संध्याकाळी माझि बायोप्सी करण्यात आली. माझ्या घशातून, पोटात, आंतड्यात एंडोस्कोप घालण्यात आला, माझ्या स्वादुपिंडात एक सुई घालून ट्युमरच्या काही पेशी काढून घेण्यात आल्या. मी तर गुंगीत होतो. पण माझी पत्नी तिथे हजर होती. तिने मला सांगितले, डॉक्टरांनी त्या पेशी मायक्रोस्कोपमधून बघितल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा स्वादुपिंडाचा एक दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर, ज्याच्यावर इलाज आहे, असा कॅन्सर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात, आली व आता मी ठीक आहे. 

मृत्यूच्या जास्तीत जास्त जवळ मी इतकाच गेलो आहे आणि आणखी दशके तरी यापेक्षा जास्त जवळ जावे लागणार नाही अशी मला आशा आहे. या अनुभवातून गेल्यानंतर मी तुम्हाला आता खात्रीने सांगू शकतो: 

कोणाचीही मरायची इच्छा नसते. अगदी ज्यांची स्वर्गात जायची इच्छा आहे, त्यांचीही त्यासाठी मरण्याची तयारी नसते. आणि तरीही मृत्यू हे असे अंतिम सत्य आहे ज्याचा आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा लागतो. तो कोणालाच चुकत नाही. आणि ते योग्यच आहे, कारण मृत्यू हा आयुष्याने लावलेला सर्वात सुंदर शोध आहे. आयुष्यात बदल घडविणारा हा एक दुत आहे. नव्याला वाव देण्यासाठी तो जूने मार्गातून दुर करतो. सध्या हे नवे तुम्ही आहात, पण हळू हळू तुम्ही जुने होणार व तुम्हाला दुर केले जाणार. नाट्यपूर्ण वाटत असले तरी हेच सत्य आहे. 

तुमच्याकडे असलेला वेळ मर्यादीत आहे, आणि त्यामुळे दुसर्‍याचे आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. एका सापळ्यात अडकू नका – हा सापळा असतो, दुसर्‍यांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचा. दुसरे लोक काय विचार करतात, त्याप्रमाणे आयुष्य जगणे हा एक सापळा आहे, त्यात अडकू नका. दुसर्‍यांच्या मता मतांचा जो कोलाहल, त्याच्या गोंगाटापुढे, तुमच्या आतल्या आवाजाला दबू देऊ नका. आणि सर्वात महत्वाचे, तुमचे ह्यदय आणि तुमची अंत:प्रेरण यांनी सुचवलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवा. इतर सर्व गौण आहे. 

मी तरूण होतो तेव्हा “द होल अर्थ कॅटलॉग” नावाचे एक नियतकालीक प्रकाशित व्हायचे. माझ्या पिढीचे ते जणू बायबल होते. स्टीवर्ट ब्रॅन्ड नावाची व्यक्ती त्याची निर्मीती करायची. त्याच्या जादूई स्पर्शाने तो ते खूप छान बनवायचा. ही १९६०च्या दशकाच्या शेवटीची बाब आहे. तेव्हा पर्सनल कॉम्पुटर आणि डेस्कटॉप पब्लिशींग नव्हते. त्यामुळे ते प्रकाशित केले जायचे, टाईपरायटर, कात्र्या आणि पोलराईड कॅमेरा यांच्या साहाय्याने. गुगल येण्याआधी ३५ वर्षे जणू ते पुस्तक स्वरूपातील गुगल होते: माहितीने ओतप्रोत भरलेले, छान असायचे. 

स्टीवर्ट आणि त्याच्या सहकार्‍यांनी द होल अर्थ कॅटलॉगचे अनेक अंक प्रकाशित केले. मग त्याची उपयुक्तता कमी झाल्यावर १९७०च्या दशकाच्या मध्ये त्याचा शेवटचा अंक काढला. त्यावेळेस मी तुमच्याच वयाचा होतो. या शेवटच्या अंकाच्या मागील पृष्ठावर एक फोटो होता. एका गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे एक सकाळचे दृश्य. तुम्ही साहसी असाल तर अशा ठिकाणी प्रवासास जाल, तेव्हाचे दृश्य. त्या फोटोखाली लिहिले होते, “असंतुष्ट रहा, चक्रम रहा – स्टे हंग्री, स्टे फूलिश.” हा त्यांचा निरोपाचा संदेश होता - स्टे हंग्री, स्टे फूलिश. आणि मी स्वस्त:साठी नेहमी तीच अपेक्षा केली आहे. आणि आता पदवी मिळवून तुम्ही एक नवी सुरवात करणार आहात, तेव्हा मी तुमच्यासाठीही तीच अपेक्षा करतो.

स्टे हंग्री, स्टे फूलिश. 

धन्यवाद. 

स्टीव्ह जॉब्ज, सीईओ अ‍ॅपल कॉम्पुटर
Related Posts with Thumbnails