कोणतीही मेहनत करायला तयार असणार्या मराठी उद्योजकासाठी, काहीतरी नविन करून दाखवण्याची जिद्द बाळगणार्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारं असं एक पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे. सध्याच्या काळात समाजप्रबोधन करायला कुणालाच वेळ नाही, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्तिंना तर नाहीच नाही. पण आपल्या व्यस्त दिनचर्येतून मुद्दामहून वेळ काढून मराठी समाजासाठी मनोरंजनापेक्षा मनोअंजनाचे काम करणारे लेख गेल्या दोन वर्षात कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार सातत्याने लिहित आहेत. त्याच लेखांचं संपादन करुन प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक साकार झालं आहे.
मराठी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ताजसारख्या प्रतिष्ठीत आणि पंचतारांकीत हॉटेल मध्ये होतो हेच मुळी उत्साहवर्धक आहे. मराठी उद्योग क्षेत्रातले बहुतेक मान्यवर उद्योगपती, प्रसारमाध्यमांचे मराठी प्रमुख यावेळी उपस्थित होते या वरून या पुस्तकाचं उद्योग क्षेत्रातील स्थान आपल्या लक्षात येईल. मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झाला.. हे या वेळी श्री. पोतदारानी सप्रमाण सिद्ध केलं. ‘मराठी माणूस चाकरमानी आहे’ हे कुणी ठरवलं? तसा सर्वे कुणी आणि कधी केलाय? आपण मराठी माणसाचा प्रामाणिकपणा हा कमकुवतपणा का समजतो? प्रामाणिकपणा हा ब्रॅन्ड होवू शकत नाही का? किती मराठी माणसं जागतिक पातळीवर उद्योगांचं, बॅंकांचं यशस्वी नेतृत्व करताहेत याची जंत्रीच त्यानी यावेळी सादर केली. मराठी माणूसच असा आहे की जो आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाबरोबर एखादातरी छंद जोपासतो आहे. हा छंदच त्याला उद्योजकतेकडे घेऊन जाईल असं श्री. पोतदारांच म्हणणं आहे.
या पुस्तकात असलेले लेख जेव्हा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले तेव्हा त्या लेखांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अभूतपुर्व असा प्रतिसाद लाभला होता. “तूमचा लेख वाचून आयुष्यात पुन्हा उभं राहायची संधी मिळाली” हा एक प्रातिनिधीक अभिप्राय. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणार्या धडपडणार्या व्यक्तिंसाठी तर हे पुस्तक म्हणजे सातत्याने चेतना निर्माण करणारा अखंड झराच आहे. या पुस्तकातून मराठी समाजापुढे मांडलेले विचार हे मार्गदर्शक तर आहेतच पण वर्षानुवर्ष मराठी मनाला मानसिक गरिबीत ठेवणार्या विचाराला नक्कीच छेद देणारे आहेत.
भारतीय चित्रपटउद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांना हे पुस्तक समर्पित केलं आहे, या वरून नितीन पोतदारांची पुस्तक लिहिण्यामागची तळमळ दिसून येते. यशासाठी राईटॅ टर्न घ्यायचा असेल तर हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा. तुर्तास एवढच.
0 comments:
Post a Comment