दसर्यादिवशीच ‘सिमोलंघन’ करून ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या
प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं
तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली.
खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही
निवडक लिखाण ‘स्वप्न पंख’ च्या वाचकांसाठी
क्रमश: देत आहे.
तुम्हाला व्हिडीओ प्लेअर आठवतो? तसा वॉकमनही
तुमच्या स्मृतीतून दूर गेला असेल म्हणा! वॉकमनच्या आधी ट्रान्झिस्टर आला आणि संगीत
नावाची गोष्ट एकदम सुटसुटीत झाली. एरवी मोठय़ा रेडिओसमोर बसून हवे ते केंद्र
लावायचे आणि तेथून जे ऐकू येईल, ते ऐकायचे किंवा गाण्याच्या मैफलीला जायचे
आणि ऐकलेले सारे मेंदूत साठवून ठेवायचे. पुन्हा ऐकायचे तर ते ध्वनिमुद्रित
करण्याची स्वस्त आणि सोपी सुविधा नव्हती. तेव्हा स्पूलवर ध्वनिमुद्रण व्हायचे आणि
ते ऐकण्यासाठी स्पूल रेकॉर्डर आवश्यक असे. त्यापूर्वीच उपलब्ध असलेला
रेकॉर्डप्लेअर ही केवढी प्रचंड गोष्ट वाटायची. इराण्याच्या हॉटेलमध्ये नाणं टाकलं
की आपोआप निवडलेली रेकॉर्ड टर्निग टेबलवर यायची आणि वाजायला लागायची. आपल्यासाठी
केवढा महान शोध होता तो! रेडिओ आणि रेकॉर्डप्लेअरमुळे संगीत नावाची गोष्ट जगात फार
सहजपणे पसरू लागली. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत स्टिव्ह जॉब्सने या संगीताला
पंख जोडले आणि त्यात इतकं वारं भरलं की सारे जग एका नव्या सांगीतिक दुनियेत
पोहोचलं. स्टिव्ह जॉब्सला संगीत किती आवडायचं आणि त्याला त्यामधलं किती कळायचं, माहीत नाही; पण त्यानं
जगातल्या सगळ्याच देशांमधल्या संगीतावर इतके महान उपकार केले आहेत की साऱ्या जगानं
त्याच्या ऋणात राहायला हवं. स्टीव्हनं निर्माण केलेल्या तंत्रज्ञानानं जगातलं सगळं
संगीत एकमेकांत मिसळू लागलं आणि एका नव्या जागतिक संगीताच्या निर्मितीला चालना
मिळू लागली.
स्टिव्ह जॉब्सनं नेमकं काय केलं? ‘आयपॉड’ नावाचं
यंत्र तयार केलं, तेव्हा त्याच्या मनात संगीत अधिक सुटसुटीत
व्हायला हवं, असंच
काहीतरी असलं पाहिजे. त्याला हेही माहीत होतं, की सारं जग
अशा उपकरणाची वाट पाहात होतं. तेव्हाच्या, म्हणजे अगदी
दहा वर्षांपूर्वीच्या जगातल्या माणसांना संगीत इथंतिथं नेता येण्याची सोय नव्हती.
म्हणजे वॉकमन, सीडी प्लेअर
या उपकरणांची क्षमता फारच स्वल्प होती. गावाला जाताना कॅसेट्ससाठी किंवा
सीडीज्साठी वेगळा बॉक्स न्यायला लागे. त्यातून हवे ते ऐकण्यासाठी शोधाशोधही फार
करावी लागे. संगणकाच्या क्रांतीनंतर आलेल्या इंटरनेटच्या क्रांतीने जग फारच जवळ
आलं. पण संगीताच्या बाबतीत या इंटरनेटचा फारसा उपयोग होत नव्हता. कारण संगीत इकडून
तिकडं जाऊ शकत नव्हतं. इटलीतलं संगीत ऐकायचं असेल, तर ते तिथून
‘फिजिकली’च आयात
करावं लागायचं. ईमेलमधून संगीत पाठवायचं, तर त्याचा
आकार इतका मोठा असायचा की ते पोचता पोचायचं नाही. (आता मागे वळून पाहताना मजा
वाटते, की २००१
मध्ये आपल्या घरी ऐटीत आणलेल्या संगणकाची जेवढी हार्डडिस्क होती, तेवढय़ाच
साठवणूक क्षमतेचा आयपॉड स्टिव्हनं तेव्हा तयार केला होता.) आयपॉडची संगीत
साठवण्याची क्षमता साधारण तेवढीच म्हणजे आठ जीबी एवढी होती. काडेपेटीएवढय़ा यंत्रात
सुमारे दीडदोन हजार गाणी साठवण्याची ही क्षमता ऐकणाऱ्यासाठी अतिप्रचंड म्हणावी
एवढी होती. तेव्हा एक्स्टर्नल डिस्क अस्तित्वात नव्हती. अशा काळात संगणकावर
असलेलं संगीत कप्पे करून या आयपॉडमध्ये सहज साठवता येत होतं, बदलता येत
होतं आणि असं करताना संगीताच्या श्रवणानंदात तसूभरही फरक पडत नव्हता. (आठवा..
त्याच त्या कॅसेटवर पुन्हापुन्हा रेकॉर्डिग केल्यावर काय व्हायचं ते. सीडी तर
पुसताही यायची नाही!) स्टिव्हनं सलग काही तास संगीत ऐकण्याची एक नवी प्रणाली
अस्तित्वात आणली होती.
भारतात १९०६ मध्ये जेव्हा ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान इंग्रजांनी आणलं, तेव्हा कोलकात्याला एक प्रचंड मोठा स्टुडिओ उभा करण्यात आला. या तंत्राच्या आधारे मेणाच्या तबकडीवर आवाज ध्वनिमुद्रित करता येत होता. पण त्याची वेळेची क्षमता फक्त तीन मिनिटेच होती. तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफली आठ-नऊ तास चालायच्या आणि कलाकार आपल्या पोतडीतले सगळे दागिने उलगडून दाखवण्यासाठी एकच राग दोन दोन तासही आळवायचा. अशा कलावंतांना जेव्हा त्यांचं गाणं तीन मिनिटांत संपवायला सांगितलं, तेव्हा त्यांनी संगीताच्या ‘इभ्रती’पायी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्याही काळात अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्या भविष्यवेधी कलावंतानं ते आव्हान स्वीकारलं आणि आपलं सगळं गाणं मोठय़ा ताकदीनं तीन मिनिटांत सादर करून दाखवलं. पण तेव्हाच्या सगळ्या बुजुर्गानी या रेकॉर्डिगला विरोध केला. एवढंच नाही, तर अशी दंतकथाही पसरवली की, त्या माईकसमोर बसून गायला लागलं, की तो माईक सापासारखा गळ्यात जातो आणि आपला कंठ काढून घेतो. मग आपला गळाच बंद होतो आणि पर्यायानं गाणंही.
तीन मिनिटांची तबकडी आठ मिनिटांची झाली आणि मग पुन्हा एकदा कलाकारांसाठी नवे आव्हान उभं ठाकलं. ऐन बहरात असलेल्या संगीत नाटकातील पदांना त्यामुळे इतिहासाच्या कोनाडय़ात टिकून राहणं सोपं झालं. बडा ख्याल म्हणतात, तो आठ मिनिटांत मावणं शक्यच नव्हतं. मग छोटा ख्याल आला. पन्नासच्या दशकांत वीस मिनिटांची लाँग प्लेईंग रेकॉर्ड तयार झाली, तेव्हा भारतीय अभिजात संगीताच्या प्रांतात पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व यांच्यासारखे प्रतिभाशाली आणि नवोन्मेषी कलावंत आपली सारी कलात्मक शक्ती पणाला लावत होते. तास दोन तासाचा ख्याल वीस मिनिटात मांडायचा आणि तरीही त्यात सौंदर्यदृष्टय़ा कुठेही उणे होऊ द्यायचे नाही, अशी ती कसरत होती. एका अर्थानं ते गाणं ‘कॉम्प्रेस’ करायचं होतं. त्या गाण्याची अभिजातता हरवू न देता त्यातील दीर्घ आनंदाची अनुभूती देण्याचा तो चमत्कार भारतीय संगीतात तेव्हा झाला, म्हणूनच नंतरच्या काळात आजपर्यंत संगीत तंत्राच्या आधारेही टिकू शकलं.
वीस मिनिटांच्या रेकॉर्डपाठोपाठ आलेल्या कॅसेटने संगीताचं विश्व
आणखीच बदललं. एका बाजूला पंचेचाळीस मिनिटं मावू शकेल, एवढं ध्वनिमुद्रण
शक्य होऊ लागलं. सीडी आल्यानंतर हाच कालावधी सत्तर मिनिटांपर्यंत वाढला. डीव्हीडी
आणि एमपीथ्रीने आणखीनच क्रांती केली आणि काही तास संगीत सलगपणे ऐकण्याची सोय झाली.
तंत्रानं एवढी प्रगती केली, तरीही संगीत हँडी झालेलं नव्हतं. ते इकडून
तिकडं प्रवाहीही झालं नव्हतं. आजच्यासारखं संगीत इकडून तिकडे सहज जात नसतानाचा काळ
होता तो. जगात कुठं काय चाललं आहे, कोणता कलावंत काय नवं करतो आहे आणि संगीतात
काय बदल होत आहेत, ते सहजपणे समजून येणंही शक्य नव्हतं.
स्टीव्ह जॉब्सने जे केलं, ते यासाठी महत्त्वाचं आहे, की त्यामुळे
‘जागतिक
संगीत’ नावाची नवी
संकल्पना उदयाला येऊ शकली. ‘ नव्या मनुतिल, नव्या दमाचा
शूर शिपाई आहे, कोण मला
वठणीला आणू शकतो ते मी पाहे’ हा केशवसुतांचा दुर्दम्य आशावाद
स्टीव्हच्या ठायी होता. त्यामुळे जगाला बांधून ठेवू शकेल, असं एक नवं
संगीत स्टीव्हच्या या नव्या तंत्रज्ञानाने निर्माण होऊ लागलं आहे. भारतीय संगीतात
काय चाललं आहे आणि जगातल्या सगळ्याच भागात काय काय चाललं आहे, ते क्षणात
समजून घेण्याची कल्पना त्याला का सुचली असेल, याची कल्पना
येणे शक्य नाही. त्याचा दृष्टिकोन व्यावसायिकही असेल, पण ‘आय टय़ून’ नावाच्या
इंटरनेटवरील दुकानात हे सगळं संगीत विकण्याची त्याची कल्पना अफलातून होती. सीडी, कॅसेट खरेदी
करण्यासाठी दुकानात जाऊन शोधाशोध करणाऱ्यांना एका क्लिकवर ते संगीत उपलब्ध होऊ
लागलं आणि जगाच्या संगीताच्या क्षेत्रात स्वरांबाबतची एक नवी ‘आधुनिक
जाणीव’ निर्माण
झाली. (बॉन जोव्ही या संगीतकाराला मात्र दुकानात जाऊन सीडीचे जॅकेट पाहून खरेदी
करण्याच्या कल्पनेला स्टीव्हनं सुरुंग लावून संगीत खरेदीचा आनंद हिरावून घेतला असं
वाटतं)
संगीताच्या क्षेत्रातील हा नवआधुनिकतावाद इतका वेगवान आहे, की त्याला सामोरे जाताना छाती दडपून जाते. रविशंकर असोत की झाकीर हुसेन, विलायत खाँ असोत की अली अकबर; या कलावंतांनी भारतीय संगीत जगात प्रत्यक्षात नेलं. स्टिव्हनं ते संगणकाच्या एका बटनावर आणून ठेवलं. जगाच्या सगळ्या भागात राहणाऱ्या संगीतप्रेमींना इतर संगीत ऐकणं त्यामुळे शक्य झालं आणि त्यामुळे त्यांच्या चवीतही बदल झाला. हा बदल नव्या जागतिक संगीताच्या निर्मितीमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच ए. आर. रहमानला मिळालेल्या ऑस्कर अॅवॉर्डचा स्टिव्ह जॉब्स हाही वाटेकरी होतो, हे आपल्या लक्षात येत नाही.
संगीताच्या क्षेत्रातील हा नवआधुनिकतावाद इतका वेगवान आहे, की त्याला सामोरे जाताना छाती दडपून जाते. रविशंकर असोत की झाकीर हुसेन, विलायत खाँ असोत की अली अकबर; या कलावंतांनी भारतीय संगीत जगात प्रत्यक्षात नेलं. स्टिव्हनं ते संगणकाच्या एका बटनावर आणून ठेवलं. जगाच्या सगळ्या भागात राहणाऱ्या संगीतप्रेमींना इतर संगीत ऐकणं त्यामुळे शक्य झालं आणि त्यामुळे त्यांच्या चवीतही बदल झाला. हा बदल नव्या जागतिक संगीताच्या निर्मितीमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळेच ए. आर. रहमानला मिळालेल्या ऑस्कर अॅवॉर्डचा स्टिव्ह जॉब्स हाही वाटेकरी होतो, हे आपल्या लक्षात येत नाही.
संगणक जेव्हा प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा
मॅक्स मॅथ्यू या शास्त्रज्ञाने संगीताचे संगणकीकरण केले. संगीताचे हे डिजिटलायझेशन
नंतरच्या काळात स्टिव्ह जॉब्ससाठी फार महत्त्वाचं ठरलं. त्याच्या आयपॉड या
उत्पादनाचं नावही याच मॅथ्यू याने संगीत दिलेल्या ‘२००१ ए
स्पेस ओडिसी’ या
चित्रपटातून घेतलं आहे. जॉब्सनं संगीताच्या बाजारपेठेचं स्वरूपच पालटवलं. ती खऱ्या
अर्थाने जागतिक झाली. कोणालाही आपले संगीत त्याच्या आयटय़ून या इंटरनेटवरील दुकानात
विकण्यासाठी ठेवता यायला लागलं आणि ते जगातील कुणालाही घरबसल्या विकत घेता येऊ
लागलं. त्याच्या आयपॉडमध्ये साठवता येऊ लागलं. सलग सोळा तास चालणारी बॅटरी हे
स्टिव्हच्या उत्पादनांचं आणखी एक वैशिष्टय़. संगीत असं जगभर इकडून तिकडे झेपावू
लागल्यानं जगातील अनेकांना अन्य भागातील संगीताची जाणीव झाली. स्टिव्ह जॉब्सनं
जगाला आणि जगातील अनेक प्रकारच्या संगीताला एकत्र आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग
केला. त्यानं त्याचं मार्केटिंग केलं. स्टिव्हनं आणखी एक महान काम केलं. ते म्हणजे
फ्री डाऊनलोडिंगला विकतच्या डाऊनलोडिंगचा सशक्त पर्याय उभा केला. कल्पनेचं
मार्केटिंग नीट केलं की काय होतं, याचा एक आदर्श त्याने निर्माण केला. फार
लांबच्या कशाला, अगदी शेजारी पाकिस्तानातील गायकांच्या चाली
ढापून त्यावर आपली गाणी करणाऱ्या भारतीय संगीतकारांच्या हे लक्षात आलं नाही की, ते संगीत
अगदी नजीकच्या भविष्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळीकडे सहजपणे पोहोचू शकणार
आहे. जगात ‘वर्ल्ड
म्युझिक’ अशी
संकल्पना आहेच. संगीताशी तसा संबंध नसलेल्या स्टीव्हने ‘ग्लोबल
म्युझिक’ या आणखी एका
कल्पनेचा जन्म दिला. संगीतामधील अनेक शैलींचा संकर घडवून आणणारे हे जागतिक संगीत
ही स्टिव्ह जॉब्सची देणगी आहे. कदाचित यामुळे संगीताला जगात आणखी उज्ज्वल भविष्य
लाभेल. यापुढील सगळ्या कल्पनांचा उगम असलेलं ‘स्टिव्ह
जॉब्स’ हे गाणं यापुढेही
असंच वाजत राहील.
0 comments:
Post a Comment