Sunday 8 January, 2012

करिअरिस्ट मी : बँकर



आयसीआयसीआय  बँकेच्या संचालिका चंदा कोचर यांची लोकसत्ता मध्ये आलेली स्फुर्तीदायी मुलाखत खास स्वप्नपंखच्या वाचकांसाठी. 

स्त्रिया आज विविध क्षेत्रात प्रगती करीत आहेत. प्रगतीच्या या प्रवासात स्त्रिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यातूनच आजची सक्षम स्त्री घडते आहे. या स्त्रीचे दर्शन घडविणाऱ्या करिअरिस्ट मीया सदराची सुरुवात जागतिक पातळीवर पॉवरफुल ठरलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या संचालिका चंदा कोचर यांच्या या मुलाखतीने..

एखाद्या सप्ततारांकित हॉटेलपेक्षा अधिक प्रशस्त असं आवार.. नजरेच्या एका टप्प्यात न सामावणारी, मुंबईच्या वांद्रा-कुर्ला संकुलातील आयसीआयसीआय बॅंकेची भव्य-दिव्य इमारत.. प्रवेश करतानाच मनावर त्याचं जाणवेल न जाणवेल असं दडपण होतंच.
त्यातच भेटायचं होतंफोर्बस्, फॉर्चूनने जाहीर केलेल्या जगातल्या एका पॉवरफुलस्त्रीलाबँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण चंदा कोचरना. दहाव्या मजल्यावरच्या त्यांच्या चेंबरमध्ये प्रवेश करताच नजरेस पडतं ते  त्यांचं प्रभावी, करारी व्यक्तिमत्त्व, गुलाबी रंगाच्या उंची-रेशमी साडीवर नेमकेच दागिने.. चर्येवर एक मधाळ हसू.. मध्यम चणीच्या या कर्तबगार स्त्रीने आयसीआयसीआय बँकेची सारी आर्थिक गणितं ढवळून टाकलीएत.. ५१.५१ अब्ज रुपये करोत्तर नफा असलेली आयसीआयसीआय बँक ही भारतातील दुसरी मोठी बँक आहे.  म्हणूनच बॅंक र चंदा कोचर यांच्याशी गप्पा हा एक सुखद अनुभव ठरतो.
* चंदा जी, आयसीआयसीआय बँकेत तुमच्या सेवेला पंचवीस वर्षांचा काळ लोटलाय.. या प्रदीर्घ प्रवासाविषयी तुमचे अनुभव.. तुमच्या भावना काय आहेत ?
- वेल.. पंचवीस र्वष म्हणजे  मोठा काळ आहे. माझा या संस्थेतला प्रवास खूप रोमांचक, रम्य आणि रमणीय ठरला, असं मी निश्चितपणे म्हणेन. संस्थेचा कायापालट हा माझंदेखील काया-वाचा-मने रूपांतर घडवत गेला.. संस्था घडत गेली आणि त्याबरोबर मलाही घडवलं. मी बँकेची केवळ कर्मचारी न राहता बँकेच्या विकासात मला सहभाग घेता आला. संस्थेने वेळोवेळी कात टाकली. त्यात मला योगदान देता आलं. या क्षणांमुळेच मला आत्तापर्यंतचा हा प्रवास अतिशय रंजक वाटलाय.  नोकरीतील प्रत्येक क्षण असोशीने जगलेय. म्हणूनच ती कधी नोकरी नाही वाटली.
याच बँकेत मी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले. १९८४ मध्ये. एक वर्षांच्या कालावधीनंतर कन्फर्म होणार होते. पण १ एप्रिलऐवजी १ जानेवारी रोजीच मला कन्फर्म करण्यात आलं. तो क्षण मला आनंदाश्रू देऊन गेला. इथेच मी एकेक पायरी वर चढत गेले. आज मी बॅंकेची संचालिकाआहे.
* या प्रवासाचं ओझं तुम्हाला जाणवलं नाही.. असं आपण म्हणालात. तरीही, या प्रवासाच्या टप्प्यांवर आलेले काही कटू-गोड अनुभव. काही आव्हानं, आपणांकडून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तुमच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआयमधील महत्त्वाचे बदल किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे संस्थेने कात टाकली तर ते टप्पे कोणते?- अडीच दशकं.. दोन तपापेक्षा अधिक काळ हा प्रदीर्घ टप्पा आहे, मला तो खुपला नाही, आलेले अनुभव मी माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडले. त्यात कटू कमी आणि गोड अनुभव अधिक होते असं मी म्हणेन. पण करिअरची वाटचाल म्हणा किंवा जीवनाची वाटचाल म्हणा निर्विघ्न नसते. अडी-अडचणी येतात. पण त्यांचा बाऊ कधी वाटला नाही आजतागायत.
काही महत्त्वाचे बदल म्हणाल तर.. आयसीआयसीआयने अनेक नवे उपक्रम सुरू केलेत. कॉर्पोरेट बँकिंग ते रिटेल बँकिंग हा मोठा टप्पा होता तेव्हा आमच्यासाठी. रिटेल बँकिंग हा आमच्यासाठीच नव्हे तर देशासाठीदेखील पहिलंवहिलं पाऊल होतं.
त्यानंतर बँकेने इंटरनॅशनल एक्स्पान्शन केलं तेव्हा.. मूल जेव्हा प्रथम चालायला लागतं.. जेव्हा त्याचं अडखळणं, ठेचकाळणं, पडणं, पुन्हा उठून उभं राहणं. या जशा सहजसुलभ क्रिया घडतात, तसं काहीसं आमचं चाललेलं होतं. विकासाच्या या टप्प्यात अनेक चुका होत होत्या. तरीही संस्थेचा विकास आणि देशाचा विकास हे जागतिकीकरणाच्या अनुषंगाने चाललेलं होतं. प्रत्येक चुकांमधून शिकत गेलो. बँकेच्या प्रत्येक विभागाचे कामकाज त्यातील नवे अपेक्षित बदल हे शिकून घेता आले मला त्या निमित्ताने. आनंदाचा भाग हा की, यातले बरेचसे उपक्रम माझ्या नेतृत्वात घडलेत. बँकेचा विकास दर वर्षांकाठी पाच ते सहा टक्के या ठरावीक चाकोरीत न अडकता आयसीआयसीआयने सतत नवे उपक्रम-नवे व्यवसाय घडवलेत. अर्थात टर्नओव्हर वाढता राहिलाच..
* बँकिंग व्यवसायात यायचं हा निर्णय नेमका कधी घेतला?
- पुढे नेमकं काय करायचं याचं चित्र सुस्पष्ट नव्हतं. माझा जन्म जोधपूरचा. शालेय शिक्षण जयपूरला झालं. त्या नंतरच्या कालावधीत महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी मुंबईत मिळाली. जयहिंद कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यापाठोपाठ एमबीए, कॉस्ट अकाऊंटिंगमधली पदवी घेतली त्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टीटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून  मॅनेजमेंट स्टडीजमध्ये  मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर आयसीआयसीआय बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आयसीआयसीआयमध्ये मी निष्ठेने, याच संस्थेसाठी समर्पित होऊन काम करीत राहिले. बघता-बघता पंचवीस वर्षांचा काळ उलटला. आधीपासून भविष्याच्या योजना आखल्या नव्हत्या. पण खूप काही घडत गेलं..
चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआयची प्रगती
*
मार्च २००९ बँकेच्या ठेवींमध्ये बचत खात्यांचे प्रमाण हे २८.७ टक्के होते, मार्च २०११ अखेर ४५ टक्क्यांवर गेले. वितरीत कर्जावरील खर्च तरतुदीचे प्रमाण दोन टक्क्यांवरून ०.८ टक्क्यांवर आले.
*
नक्त अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) चे प्रमाण मार्च २०१० अखेर १.८७ टक्के होते, ते मार्च २०११ अखेर ०.९४ टक्क्यंवर आले.
*
बँकेने एकूण करोत्तर नफ्यात ३१ मार्च २०११ अखेर आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३०.५ टक्क्यांनी वाढ नोंदविली.
*
जगभरात १९ देशांमध्ये अस्तित्त्व पसरलेल्या या बँकेच्या भारतात २,५५२ शाखा आणि ७,४४० एटीएम असा विस्तार आहे.
*
बँक ऑफ राजस्थान या खासगी बँकचे मनुष्यबळ व तंत्रज्ञानासह   आयसीआयसीआय बँकेत सम्मीलीकरण.
* पुरुषप्रधान संस्कृतीत एका स्त्रीच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा समाजाचा कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन कसा जाणवतो?
alt- वी डोन्ट पे अटेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॅन ऑर वुमन. नियुक्त केलेली व्यक्ती जबाबदारी पार पाडण्यास कितपत योग्य आहे, कितपत कार्यक्षम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा-निकष माझ्यासाठी आणि आयसीआयसीआय संस्थेत अंतिम मानला जातो. माझं नेतृत्व बॉसच्या अनुषंगाने माझे सहकारी आनंदाने मानताहेत.  मी  फक्त बॉस आहे. स्त्री बॉस किंवा पुरुष बॉस असा फरक ना कुणी केला ना मी करवून दिला. त्यातूनच संस्थेचा विकास घडत गेलाय. दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी लागणारी तमाम योग्यता, दृष्टी त्या कर्मचाऱ्याकडे असणं हाच कळीचा मुद्दा आहे. स्त्री कर्मचाऱ्याने संस्थेत स्त्रीत्वाच्या मुद्दय़ावर कुठल्याही विशेषाधिकाराची अपेक्षा करू नये. कार्यक्षम-की अकार्यक्षम फक्त हाच निकष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असू शकतो. त्यांच्या कार्यालयीन कामासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवणं हे माझं कर्तव्य आहे. मी कर्मचारी असताना माझा हाच दृष्टिकोन होता व आता माझ्या नेतृत्वातदेखील माझी तत्त्वं हीच कायम आहेत.
* स्त्रीचं नेतृत्व संस्थेच्या कामकाजात कितपत फरक करु शकतो, असं तुम्हाला वाटतं?
- मला वाटतं, स्त्रीकडे समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची विलक्षण स्त्री-सुलभ हातोटी असते. मानवीय संवेदना, सहानुभूती, शाश्वत मूल्यं याची जन्मजात देणगी विधात्याने स्त्रीला दिलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा काही प्रश्नांचा ऊहापोह त्या मानवीय मूल्यांच्या आधारे करतात.  त्यांचा तो विशेष गुण असल्याने बॉसच्या रूपात स्त्री अधिक कार्यक्षम-कणखर-खंबीर असू शकते. याशिवाय एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची त्यांची वैशिष्टय़ं तर वेळोवेळी सिद्ध झालीएत.
* तुमच्या नेतृत्वात आयसीआयसीआयने आर्थिक उलाढाल-प्रगती केलीये हे सर्वश्रुत आहे. यावर तुम्ही काय म्हणाल?
- वी (आयसीआयसीआय) ऑलवेज एन्टीसिपेट चेंज. जागतिकीकरणाची प्रक्रिया विश्वभर मोठय़ा झपाटय़ाने होते आहे. तेव्हा त्याचे पडसाद सर्वत्र उमटणारच. आयसीआयसीआय ही प्रथम कॉर्पोरेट फायनान्स कंपनी ठरली. २००० सालात आम्ही आयसीआयसीआय ही ग्राहकाभिमुख बँक सुरू केली. या कालावधीतदेखील संस्थेच्या आर्थिक उलाढालीचा आलेख उंचावत गेला. जागतिकीकरणाचे वारे सर्वत्र वाहत असताना आयसीआयसीआयदेखील ग्लोबल संस्था झाली. एकूण अठरा देशांमध्ये बँकेने आपल्या शाखा सुरू केल्यात. २००८ च्या सुमारास बँकेने आपल्या साऱ्या शाखांचं (कन्सॉलिडेशन-एकत्रीकरण) केलं. या काळात काही क्रेडिट लॉसेस-आर्थिक नुकसानही सोसावं लागलं.
* बँकेचं नेतृत्व करत असतानाच बँकेबाबत फार मोठय़ा प्रमाणावर अफवांचं पेव फुटलं होतं. त्या परिस्थितीला तुम्ही कसं तोंड दिलंत, कसा सामना केलात आपल्या अनेक ठेवीदारांचा?
- मोठा अवघड काळ होता तो. आम्ही (आयसीआयसीआय बँक) जेव्हा रिटेल बँकिंगला आरंभ केला तेव्हा अनेक अडचणी आल्या. त्यानंतर बिकट प्रसंग आला तो आयसीआयसीआय बँकेवर दिवाळखोरीवरची अफवा उठली तेव्हा.. या अफवेने आम्ही हवालदिल झालो. पण आमच्यापेक्षा अधिक तणावग्रस्त झालेत ते बँकेचे हजारो निष्ठावान ग्राहक. दररोज ग्राहक मोठय़ा संख्येने एटीएममधून आपापले पैसे काढून आपली खाती रिकामी करू लागले होते. आमच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं असलं तरी त्या क्षणी मला व सहकाऱ्यांना खंबीर राहणं अतिशय गरजेचं होतं. आमच्या मनाची अजिबात घालमेल होऊ दिली नाही. त्वरित अ‍ॅक्शन प्लान घेतला. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तमाम एटीएम्समध्ये तातडीने पैसे भरले. प्रत्येक बँकेत गर्दी करणाऱ्या ग्राहकांच्या तमाम शंका-कुशंकांना समाधानकारक उत्तरं दिली जाताहेत ना, याची खातरजमा केली. आपल्या टीम मेंबर्सचाही आत्मविश्वास जागृत केला. कुणाचंही मनोधैर्य खचून जाणार नाही, याकडेही तेवढंच लक्ष दिलं.
* एकूणच कामाचा व्याप व व्याप्ती यामुळे तुमच्यावर खूप तणाव येत असेल, नाही? तुमची दररोजची दैनंदिनी काय? कुटुंबाला कितपत वेळ देता येतो?
- रविवारखेरीज माझा प्रत्येक दिवस सकाळी सहा- साडेसहाला सुरू होतो. सकाळचा वेळ कुटुंबासमवेत पती, मुलगा-मुलगी यांच्यासमवेत रोजच्या घडामोडी, चहा-ब्रेकफास्टमध्ये जातो. त्यानंतर मी माझं आटोपून बँकेत येते. इथे आल्यानंतर मात्र संध्याकाळी ठरावीक वेळी निघू शकत नाही. घर आणि ऑफिस याखेरीज अन्य दैनंदिनी काहीही नाही. मुलं लहान असताना माझ्या आईने व सासू-सासऱ्यांनी खूप सहकार्य दिलं. ऑफिस कामानिमित्त मी जेव्हा मुंबईबाहेर- कधी देशाबाहेर जात असे तेव्हा माझ्या आईने व सासू-सासऱ्यांनी मुलांची जबाबदारी तत्परतेने निभावली. एवढंच काय, पण माझ्या घरातील कामाला असणाऱ्यांची मोलाची मदत सतत मिळतेच आणि म्हणूनच या सगळ्यांच्या भिस्तीवर माझं करिअर-माझं काम सुखेनैव चालत आलंय. सगळ्यांचीच मी कृतज्ञ आहे. मुलं लहान असताना मी त्यांचा शक्य तितका होमवर्क घेत असे. मुलं मोठी होत गेली. आपापल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडताहेत. स्वयंपाक घरात जाणं मला अजिबात शक्य होत नाही. आणि जेवढा वेळ मिळतो तो कुटुंबाबरोबर घालवावा, स्वयंपाक घरात कशाला, या मताची मी आहे. पण माझी मुलगी मात्र छान स्वयंपाक करते. रोज वेगवेगळे पदार्थ करुन बघणं तिचा छंदच झालाय. तिही इंजिनीअर झालीय आणि  इंजिनीअर फ र्म जॉइन केलीय.
* चंदा जी, आजच्या काळात विशेषत: करिअर करणाऱ्या नोकरदार स्त्रीने सुपरवुमन असणं गरजेचं आहे का? सुपरवुमन बनण्याच्या हव्यासात तिच्यावर तणाव येतोय , असं नाही वाटत तुम्हाला?
- करिअरिस्टिक वुमनकडून सुपरवुमनच्या अपेक्षा होतात हे खरंय. मला वाटतं तिने सुपरवुमन होणं ही आजच्या काळाची गरज आहे. घरातील पतीने किंवा वडिलांनी कितीही मदत घरात केली तरी स्त्रीच्या ठोस मदतीखेरीज घराला घरपण येत नाही. पण सुपरवुमन होणं ही स्त्रीची अपरिहार्यता असू नये. घरातील सदस्यांनी जर तिला स्वत:हून प्रेमाचा-मदतीचा हात पुढे केला तर बऱ्याच गोष्टी सहज शक्य होतील. दुसरी एक गोष्ट मला प्रकर्षांने जाणवतेय- हल्ली नोकरदार, करिअर करणाऱ्या महिलांना कामाचा तणाव येतो. असं वरचेवर ऐकण्यात येतंय. अतिश्रमाने मानसिक-शारीरिक थकव्याने तिला तणाव येतो, अशी कारणं सांगण्यात येतात. मला असं वाटतं, तणाव हा शरीराचा नसून मनाचा असतो. इटस् ओन्ली अ स्टेट ऑफ माइंड. मुळात स्त्रीचं मन सशक्त असायला हवं.  कोणीतंही काम हे माझ्यावर लादलेलं आहे, ही भावना जेव्हा येते तेव्हा साहजिकच त्याचं ओझं व्हायला लागतं. पण आवड म्हणून किंवा हे माझं काम आहे, या नजरेने त्या कामाकडे पाहिलंत तर तेच काम तणावरहीत होऊन जातं. नोकरदार महिला जर ऑर्गनाइज्ड पद्धतीने आपलं काम करू लागल्या तर त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडणार नाही. त्यासाठी शिस्त-व्यवस्थापनाची गरज आहे.
* घर सांभाळणं की बँक सांभाळणं तुम्हाला सोपं वाटलं इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये?
- व्वा.. छान प्रश्न आहे तुमचा. एनी वे, काहीही अशक्य नाहीये या जगात. इच्छा तिथे मार्ग. घर आणि करिअरच काय पण.. देशदेखील सांभाळतातच महिला. नथिंग इज इम्पॉसिबल. घर आणि बँक दोन्ही समर्थपणे सांभाळू शकले मी. अर्थात एकमेकां साहय़ करू, अवघे धरू सुपंथ हे देखील आवश्यक आहेच.
* आजही खूपशा सुशिक्षित महिला आर्थिक व्यवहार करताना घरातील पुरुषवर्गावर अवलंबून राहताना दिसतात. आर्थिक नियोजन करणं हे स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक जमतं का? तुम्हाला काय वाटतं?
- स्त्रियांना आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येतात. फक्त ही ज्याची-त्याची वैयक्तिक क्षमता असू शकते. एखाद्या स्त्रीला आर्थिक व्यवहार जमत नसतील, पण तिच्याकडे अन्य गुण असतील. खेडोपाडी महिला स्वत: आपले आर्थिक व्यवहार करताना दिसतात. स्त्री आणि पुरुष दोघंही तेवढंच सक्षम आहेत असं मला वाटतं.
* स्टेटस् मॅनेजमेंट -फिटनेससाठी तुमचा मंत्र कोणता? तणावमुक्तीसाठी काय करता?
- सुदैव म्हणा किंवा दुर्दैव. फिटनेससाठी व्यायाम करणं जमत नाही वेळेअभावी. प्रवासात मिळणारा वेळेचा उपयोग मी चक्क राहिलेली झोप पूर्ण करण्यासाठी वापरते. पॉवर नॅप हेच माझे रिलॅक्सेशन. तीच तणावमुक्ती. व्यायामासाठी वेगळा वेळ मिळत नाही. तणाव न येण्यासाठी अत्यावश्यक असतं  ते मनाचं खंबीर होणं.
* उच्चपदस्थ करिअर करणाऱ्यांना घरी आल्यावर कार्यालयीन कामातून स्विच ऑफ होणं शक्य आहे का? तुमचा अनुभव?
- आजच्या इंटरनेटच्या युगात मोबाइल, संगणकयुगात हे शक्य नाही. माझ्या कामांत तरी साध्य होत नाही. घरी आल्यावर मोबाइल स्विच ऑफ केला तरी आयसीआयसीआय बँकेचे व्यवहार जगभर कुठे न कुठे सतत चाललेले असतात. आपल्याकडे संध्याकाळी बँका बंद झाल्या तरी त्या अमेरिकेत उघडतात. तेव्हा, त्यामुळे जबाबदारीच्या पदावर काम करताना स्विच ऑफ होण्याचा पर्याय मला शक्य नाहीये. तशी माझी अपेक्षाही नाही.
* आजच्या काळात स्त्रियांना स्मार्ट सेव्हिंगचे काही गुरुमंत्र द्याल  का?
- सॉरी टू से. माझं सारं जग आयसीआयसीआयभोवती एकवटलंय. त्यामुळे मी म्हणेन- स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करताना ती फक्त माझ्या बँकेत करावी. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किंवा आयसीआयसीआयच्या शेअर्समध्ये. असो. गमतीचा भाग सोडला तर मी म्हणेन, पैसे विविध ठिकाणी गुंतवावेत. काहींमध्ये फिक्स्ड रिटर्न्‍स मिळावेत. तर काही गुंतवणुकीत महिन्याला व्याज मिळावे. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की, आपल्या गुंतवणुकीवर लक्ष असावं. जिथे अधिक आणि सुरक्षित ठेव राहील. व्याज-परतावा मिळेल याकडे लक्ष राहायला हवं.
* भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? दहा वर्षांनंतर भारताचं स्थान त्यात कुठे असेल?
- मला भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. आपल्याकडे आर्थिक मंदी जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानाने कमी आहे. आपल्या देशात करोडोंच्या संख्येने युवा आहेत. त्यांच्याकडे पर्चेसिंग-स्पेंन्डिंग पॉवर आहे. जी वाढतेय. आपल्याकडे आपली अशी मूलभूत तत्त्वं आहेत, ज्याच्या जोरावर आपण फार पुढे जाऊ. आपल्याला ९ ते १० टक्के विकास दर अपेक्षित आहे. जो, प्रत्यक्षात ६ ते ७ टक्के आहे. मिड टर्ममध्ये आपल्याला काही आव्हानं आहेत. चलनवाढ हे देखील एक आव्हानच आहे. हाय रेन्ट ऑफ इन्टरेस्टदेखील एक आव्हान आहे. आपल्या आव्हानांचा सामना करीत पुढे जाणं देशाला फार कठीण नाही.
मुलाखतीच्या शेवटी स्त्रियांनायुवावर्गाला काय सांगाल?
- स्त्रियांनी त्यांच्यात आत्मविश्वास जागता ठेवला पाहिजे. मनातली मरगळ झटकत- आत्मविश्वास कायम ठेवायला हवंय. जगात स्त्रियांना अशक्य असं काहीही नाही. जग जिंकणं हे त्यांच्याच हातात आहे.युवकांनी त्यांना मिळालेल्या संधीची सुवर्णसंधी मानत जीवनाचं सोनं करावं. नव्या पिढीला विकास-शिक्षण-नोकऱ्या-करिअर यांची दारं सताड उघडी आहेत. फक्त डोकावून पाहा. मार्ग तुमचाच आहे.
चंदा कोचर यांच्या चेंबरमधून बाहेर पडत असताना आमच्याबरोबर होता त्यांनी उलगडलेला त्यांचा बॅंकेतला पंचवीस वर्षांचा जीवनपट. त्यांनी म्हटल्याप्रमाणे बॅंकेचं नावच आयसीआयसीआय आहे, म्हणजे आमचं तुमच्याकडे लक्ष आहे. चंदा कोचर हे व्यक्तिमत्व अनुभवतांना त्याचं प्रत्यंतर सातत्याने येत रहातं. त्यांच्या कर्तृत्वाचं वलय त्यांचीच साक्ष देत होतं.

1 comments:

AIEEE said...

Thank you for the sensible critique. Me & my neighbour were preparing to do some research about that. We got a good book on that matter from our local library and most books where not as influensive as your information. I am very glad to see such informat
Aieee exam

Post a Comment

Related Posts with Thumbnails