Tuesday, 31 January, 2012

अ‍ॅपलचे गुलाम


फक्त आणि फक्त श्रीमंतीच्या मागे लागल्याने आजूबाजूच्या परिस्थितीचं भानही हरवून बसल्यावर काय होतं आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या तंत्रज्ञानामुळे जीवनही किती अशाश्वत बनलय त्याचा डोळ्यात अंजन घालणारा  लोकसत्ता मधील लेख खास स्वप्नपंखच्या वाचकांसाठी.    

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, ३१ जानेवारी २०१२altजागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या रेटय़ापुढे कुशल कामगारदेखील निरुपयोगी ठरू लागले आहेत. तीस वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरणी कामगारांना जे अनुभवले ते वास्तव सध्या अमेरिकेतील अभियंत्यांच्या वाटय़ाला आले आहे.. एरिक सारागोझा रोमांचित अवस्थेत अ‍ॅपलच्या आवारात शिरला होता. खूप मेहनत करून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्यासाठी बराच खर्च आला होता. कर्ज डोक्यावर होते. सात-आठ वर्षांचा नोकरीचा अनुभव गाठीशी धरून तो अ‍ॅपलमध्ये आला. हा त्याचा ड्रीम जॉबहोता. स्टीव्ह जॉब्सच्या अ‍ॅपल कंपनीचे त्यावेळी नाव झाले नसले तरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंपनीचा दबदबा होता. कल्पकतेला अभियांत्रिकी कौशल्याची जोड देत अजोड यंत्रकृती अ‍ॅपलमध्ये तयार होऊ घातल्या होत्या. कल्पक यंत्रविशारदांची ती कर्मभूमी होती. सारागोझा तेथील वातावरण पाहून थक्क झाला. आपल्या कौशल्याला, मेहनतीला, कल्पकतेला इथे पूर्ण वाव आहे हे त्याला कळून चुकले. मनापासून काम केले तर घसघशीत डॉलर्स हातात पडतील याची खात्री होती. बायको व तीन मुलांचे कुटुंब त्याला चालवायचे होते. मुलांच्या शिक्षणाची तजवीज करायची होती. स्वत:ची व कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची जरुरी होती. मेहनत, कुशलता व कल्पकता दाखवाल तर पैसे देण्यास अ‍ॅपल तयार होती.

सारागोझाने मेहनत केली. कल्पकता दाखविली. कौशल्य तर त्याच्याकडे होतेच. तो झपाटय़ाने बढती मिळवीत गेला. पगार वाढला. अ‍ॅपलमध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या डायग्नोस्टिक टीममध्ये त्याचा समावेश झाला. मुले महागडय़ा पण प्रतिष्ठित शाळेत दाखल झाली. बायको मनासारखी खरेदी करू लागली. पोहोण्याचा तलाव दाराशी असलेला बंगला विकत घेतला गेला. घर मनासारखे सजले. सारागोझाचा पगार ५० हजार डॉलर्सवर पोहोचला. शनिवार-रविवारची सुट्टी तो चैनीत उपभोगू लागला. गरिबीतून उच्च मध्यमवर्गात त्याने सुखात प्रवेश केला. शिक्षणाकरता घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. शिक्षणावर केलेला खर्च वाया जात नाही हे लक्षात ठेवा, असे तो सर्वाना सांगू लागला. ते १९९५ साल होते.

सारागोझाकडे अभियांत्रिकीचे शिक्षण होते. या क्षेत्रात तो सतत स्वत:ला अद्ययावत करीत होता. अ‍ॅपलच्या बॉसना जे काही हवे ते तयार करून देत होता. नवीन उत्पादने अधिकाधिक निर्दोष कशी होतील यावर लक्ष केंद्रित करीत होता. हे खूपच महत्त्वाचे काम होते. अ‍ॅपलच्या यशात या कामाचा वाटा मोलाचा होता. अभ्यास, शिस्त, मेहनत, कंपनीसाठी समर्पण या गुणांत तो कोठेही कमी नव्हता. मात्र जगाच्या अर्थकारणात काय बदल होत आहेत याची त्याला कल्पना नव्हती. भांडवलशाहीचे खरे रूप उमगले नव्हते. ज्या तंत्रज्ञानाशी तो मस्तीत खेळत होता त्याचा अर्थव्यवस्थेला बसणारा हिसका त्याला समजत नव्हता. आपले आयुष्य आता स्थिर झाले अशा खुषीत तो असताना आजूबाजूच्या वातावरणात महत्त्वाचे बदल होत होते. उच्चशिक्षित असूनही सारागोझाच्या ते लक्षात आले नव्हते. कुणी लक्षात आणून दिले असते तरी त्याने ते मानले नसते.

अमेरिकेत उत्पादन करण्यापेक्षा परदेशात उत्पादन करणे अधिक फायद्याचे आहे हे याच काळात अ‍ॅपल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. नव्या उत्पादनांचे आरेखन अमेरिकेत करता येईल. त्यासाठी अगदी थोडे कल्पक अभियंते लागतील. मात्र उत्पादनासाठी लागणारी कामगारांची साखळी येथे ठेवण्याची गरज काय, असा सवाल उठला. आयफोन, आयपॅड, संगणक बनविण्यासाठी लागणारे अनेक सुटे भाग जगात इतरत्र तयार करून मिळणार होते. त्याचा उत्पादन खर्चही खूप कमी होता. अ‍ॅपलचे फक्त डिझाईन अमेरिकेत बनवावे, इतर सर्व कामे अन्य देशांतून करून घ्यावीत असा निर्णय झाला. टिमोथी कूक या अ‍ॅपलच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होताच अ‍ॅपलचे जवळपास ९०टक्के भाग परदेशात तयार होऊ लागले. सेमीकंडक्टर जर्मनी व तैवानमधून, मेमरी कार्डस् जपान व कोरियातून, डिस्प्ले पॅनेल्स व सर्कीटस् कोरिया व तैवानमधून, चीप्स युरोपातून तयार होऊ लागल्या. या सर्वाची जोडणी करणे हे अतिशय महत्त्वाचे काम करण्यासाठी चीन पुढे सरसावला. ही जोडणी करण्यासाठी अचूकता व वेग या दोन्हींची गरज होती. मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अर्धकुशल कामगार हवे होते. अल्प वेतनावर कित्येक तास काम करणारे कामगार ही अ‍ॅपलची गरज होती. त्यातून अ‍ॅपलचा नफा कित्येक पटींत वाढत होता. अ‍ॅपलची ही गरज भागविण्यास चीन तयार होता. कारण चीनकडे बेकार हातांची कमी नव्हती.

अ‍ॅपलच नव्हे तर अन्य कंपन्यांचीही हीच गरज होती. जगातील श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हायचे आहे व त्यासाठी त्यांना लागणारे कुशल व अर्धकुशल मनुष्यबळ आपण पुरवू शकतो हे चीनच्या राज्यकर्त्यांनी ओळखले. फॅक्सकॉन सिटीही वसाहत त्यातून उभी राहिली. तेथे रोज अडीच लाख कामगार काम करतात. आयफोनच्या विक्रमी उत्पादनासाठी अ‍ॅपलला दोन लाख जुळारी हवे होते. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आठ हजार अभियंत्यांची गरज होती. अमेरिकेत स्वस्त मनुष्यबळ नव्हते. समाज श्रीमंत झाल्यामुळे अर्धकुशल काम करण्याची कोणाची तयारी नव्हती. अ‍ॅपलला हवी असलेली यंत्रणा उभी करण्यास अमेरिकेत वर्ष-सव्वा वर्ष लागले असते. चीनने ती पंधरा दिवसांत उभी करून दिली. चीन सरकारने सर्व सहाय्य केले. आठ हजार कर्मचाऱ्यांनी बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करून ९६ तासांत जुळणी यंत्रणा उभी केली व दरदिवशी दहा हजार आयफोनची जुळणी होऊ लागली. हा राक्षसी वेग पाहून अ‍ॅपल थक्क झाली व चीनला कंत्राट मिळाले. आश्चर्य म्हणजे मागणीनुसार कामगार वाढविणे व कमी करणे हे कम्युनिस्ट चीनमध्ये सहजशक्य आहे. भांडवलदारी अमेरिकेत नाही. आज अ‍ॅपलचे सात कोटी आयफोन, तीन कोटी आयपॅडस् व सहा कोटी अन्य उत्पादने जगात खपतात. त्या सर्वाची जुळणी चीनमध्ये होते. 

तंत्रज्ञान व जागतिक अर्थकारण यांच्या संयोगातून होत असलेले बदल सारागोझाला समजू  शकले नाहीत. एक दिवस त्याला वरिष्ठांचे बोलवणे आले. ज्या कामासाठी अमेरिकेत २२ डॉलर्स दिले जातात तेच काम सिंगापूरमध्ये पाच डॉलर्समध्ये कसे होते हे त्याला समजावूनसांगण्यात आले. त्याच्या सहकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. माणसे कमी होत गेली. शनिवार, रविवारची सुट्टी संपली. काम १२ तासांवर गेले. तरीही सारागोझा मेहनत करीत राहिला. कुटुंबाचे सुख व मुलांचे शिक्षण त्याच्या डोळ्यासमोर होते. परंतु वय वाढत होते. तंत्रज्ञानाच्या नव्या लाटेत त्याची कुशलता निरुपयोगी ठरत होती. शेवटी तो दिवस आला. २००४ मध्ये त्यालाही कमी करण्यात आले. सारागोझा कुटुंबाची आर्थिक चौकट ढासळली. त्यानंतर तो अन्य ठिकाणी कामे करीत राहिला. पण त्याला मागणी नव्हती. नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या तरुणांसमोर त्याचा टिकाव लागणे शक्य नव्हते. 

अ‍ॅपलमध्ये तासाला ३०० डॉलर्स कमविणारा सारागोझा आता तासाला केवळ १० डॉलर्सवर काम करतो आहे. त्याचेच काम करणारा चीनमधील अभियंता तासाला २० डॉलर्स मिळवीत आहे. चिनी अभियंत्यासाठी ही चैन असली तरी नोकरी टिकण्याची शाश्वती नाही व अन्य कोणतेही फायदे नाहीत. सारागोझाची मिळकत घसरत असताना अ‍ॅपलची बरकत १०८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. मिशिगन, न्यूजर्सी, मॅसेच्युसेट या अमेरिकेतील तीन मोठय़ा राज्यांच्या एकत्रित अर्थसंकल्पाहून मोठे बजेट अ‍ॅपलने शेअर बाजारात मांडले. शेअरचे भाव ४५ डॉलर्सवरून ४२७ डॉलर्सवर चढले. समभागधारक मालामाल झाले. अ‍ॅपलमधील अतिवरिष्ठ व्यवस्थापकांना दोन अब्ज डॉलर्सचा बोनस मिळाला. ही सर्व भरभराट घडवून आणणाऱ्या टिमोथी कुकचा पगार दीड कोटी डॉलर्सवर पोहोचला. एरिक सारागोझासमोर मात्र मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची तजवीज कशी करावी ही समस्या उभी राहिली. मुलांना दर्जेदार शिक्षण हवे होते, पण ते महाग होते. सारोगोझा कुटुंब उच्च मध्यमवर्गातून पुन्हा गरिबीत ढकलले गेले. शिक्षण, मेहनत, प्रामाणिकपणा या गुणांवर अर्थकारणाने मात केली.

मुंबईतील गिरणगावात तीस वर्षांपूर्वी असेच झाले. औद्योगिक क्षेत्रातील बदल कामगार समजू शकले नाहीत. ते समजून घ्यावेत असे त्यांच्या नेत्यांना वाटले नाही. अमेरिकेची मागणी लक्षात घेऊन चीनमधील राज्यकर्त्यांनी जे केले ते भारतालाही करता आले असते. पण तेही आपण केले नाही. परंतु हा प्रश्न अमेरिका, चीन, भारत यातील रोजगारापुरता मर्यादित नाही, तर भांडवलशाहीच्या स्वरूपाशी निगडित आहे. तंत्रज्ञानात बदल पूर्वीही होत होते. या बदलामुळेच अमेरिकेतील शेतकरी हा प्रथम कामगार झाला. अर्धकुशलतेकडून कुशल होत गेला. मात्र हे बदल सावकाश होत होते. यामुळे मध्यमवर्गाच्या जीवनाला स्थिरता येत होती. आता बदल झपाटय़ाने होतात व त्यामुळे अनेक कुशल कामगारही प्रवाहाच्या बाहेर क्षणार्धात फेकले जातात. निष्णात व कल्पक कामगार आणि ढोर मेहनत करणारे अर्धकुशल अशा दोन टोकांमध्ये जगातील रोजगार सध्या विभागला गेला आहे. पण प्रत्येकजण या दोन टोकांत सामावला जात नाही. जगात सर्वसाधारण आयुष्य जगणारे सारागोझासारखेच बहुसंख्य असतात. फक्त पैसा वा फक्त काम एवढेच त्यांचे जीवन नसते. आरोग्य, शिक्षण व थोडा कमी चालेल, पण निश्चितपणे मिळणारा पैसा इतकी माफक अपेक्षा त्यांची असते. मात्र या सुशिक्षित, सर्वसाधारण मध्यमवर्गाच्या अपेक्षा नवे अर्थकारण पूर्ण करू शकत नाही. अशा सर्वसाधारणबहुसंख्यांनी करायचे काय ही समस्या सध्या अमेरिकेला भेडसावत आहे. चीनलाही पुढील काही वर्षांत ती सतावू लागेल, कारण अन्य देशांत स्वस्त मनुष्यबळ मिळाले की रोजगार तिकडे वळतील. १९९१ मध्ये एरिक सारागोझा जी मौज अनुभवीत होता ती आज चीनच्या शान्झेनमधील अभियंता अनुभवीत असला तरी तोही त्याच दिशेने पुढे सरकत आहे आणि नव्या अर्थव्यवस्थेच्या चाकावर बसलेला भारतीयही त्या ठिकाणापासून फार दूर नाही. एरिक सारागोझा किंवा चीनमधील कष्टाळू कामगार या दोघांच्या आशाआकांक्षांशी अ‍ॅपलला काहीही देणे-घेणे नाही. सुशिक्षित, मध्यमवयीन बेरोजगारांचे करायचे काय हा आमचा प्रश्न नाही, असे अ‍ॅपलने स्वच्छ सांगून टाकले. अ‍ॅपलला फक्त गुलाम हवे आहेत. भरपूर नफा कमावून देणारे गुलाम.! मग ते देशात मिळोत वा परदेशात.
अमेरिकेत फोफावलेल्या या अ‍ॅपलवृत्तीला माणसाळावे कसे या विवंचनेत सध्या ओबामा आहेत.

(मुख्य संदर्भ : हाऊ द यूएस लॉस्ट ऑन आयफोन वर्कहे न्यूयॉर्क टाइम्समधील वार्तापत्र.)

साभार : लोकसत्ता  

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails