Friday, 3 February, 2012

कोल्हाटय़ाची पोरसमाजाने नाकारलं, खेळणं बनवलं, तमाशाच्या फडात वास्तव्य असं मनाविरुद्धचं जीवन जगावं लागत असताना केवळ नशिबाला दोष देत न बसता प्राप्त परिस्थितीशी टक्कर देत आपलं जीवन खर्‍या अर्थाने जगणं बनवणार्‍या मर्दानीची  कहाणी खास स्वप्नपंखच्या वाचकांसाठी.

लोकसत्ता च्या सौजन्याने
आरती कदम , शनिवार , ७ जानेवारी २०१२
chaturang@expressindia.com
ती एक कोल्हाटय़ाची पोर, तमाशात नाचणं हा पिढीजात व्यवसाय. भविष्य ठरून गेलेलं.. पण नशिबाने दिलेलं देणं गुमान न पत्करता तिने तमाशा सोडला नि सधन शेतकरी झाली. शेती, दुग्धव्यवसाय करतेय, बोलेरो, ट्रॅक्टर, ट्रक, बस सगळं काही चालवतेय, स्वत:चं आयुष्य सुकर करतानाच तिने बचत गटाच्या माध्यमातून गावातल्या स्त्रियांनाही आत्मनिर्भतेचं देणं दिलंय, आज कोरडगावमध्ये स्त्रियांचे १०० पेक्षा जास्त लघुउद्योग उभे आहेत. या समर्थ स्त्रीची, शिवकन्या कचरेची ही प्रेरककथा ..
alt
 तमाशाचा फड नेहमीप्रमाणे खच्चून भरलेला. एक एक गाणं रंगात येत होतं. टाळ्या, शिटय़ा आणि फेटे उडवणं .. गाण्यांना मनापासून दाद मिळत होती.. कार्यक्रम संपत आला तसं एकाच्या लक्षात आलं पोस्टरवर ढोलकीवादक म्हणून शिवकन्येचं नाव आहे, फोटो आहे, पण ती तर दिसलीच नाही.. झालं, आरडाओरडा सुरू झाला. शिवकन्येला बोलवा. बाईला ढोलकी वाजवताना पाहायची आहे. शिवकन्या तेव्हा आठ महिन्यांची गर्भवती होती. नि सकाळपासून वेदना सुरू झाल्या होत्या. फडावर उभं राहणं अशक्य होतं. पण हे सांगणार कसं आणि कुणाला? थातुरमातुर उत्तरं देऊन पाहिली पण तमाशाला आलेल्या ५००-५५० जणांची जोरदार मागणी. आमच्याकडून २० रुपये घेतलेत, आता बाई ढोलकी वाजवताना दाखवाच.. शिवकन्येकडे पर्याय नव्हता. नुकतीच ती डॉक्टरांकडे जाऊन आली होती. तशीच फेटा बांधून उभी राहिली..  तिची ढोलकीवर थाप पडली.. आणि  पुन्हा एकदा टाळ्या, शिटय़ा आणि फेटे उडवणं ..
पण या घटनेने तिच्या मनात निवृतीचं बीज रोवलं गेलं. बस झाला तमाशा..  तिला मुलगा झाला. त्याचा दुसराच दिवस, नगरला एक मोठं संमेलन होतं.  नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांचा, हरिभाऊ बढे-नगरकरांचा तमाशाचा फड लागला होता. त्यांचा फड म्हणजे शिवकन्याची ढोलकी हे समीकरण सगळ्यांनाच पाठ झालं होतं. शिवकन्या तर एक दिवसाच्या बाळाला घेऊन बसलेली, पण कलासक्त मनाला त्याची कुठे पर्वा होती. एक तरी तोडा वाजवाच म्हणून मागणी वाढत चाललेली. जोर जास्तच वाढला तेव्हा तिला उठावंच लागलं. बाळाला स्टेजवर एका बाजूला ठेवलं नि.. पुन्हा एकदा तिच्या ढोलकीवरची थाप आसमंतात घुमू लागली. पण ही दुसरी घटना. तिच्या निवृत्तीच्या विचारांना ठाम करून गेली. तेव्हा शिवकन्या होती फक्त २२ वर्षांची. खरं तर तमाशातून निवृत्त व्हायचं वय नव्हतंच. पण तिचा निर्णय पक्का झाला. आता बस झालं तमाशात नाचणं, वाजवणं. आता स्वत:चा घर-संसार. स्त्री म्हणून सन्मान हवा होता. खूप पुरुष पाहिले, सगळ्या स्तरांतले. खूप चांगले-वाईट अनुभव घेतले..  ‘‘ताई, मी हे अनुभव सांगत बसले ना तर रात्र पुरायची नाय तुम्हाला,’’ शिवकन्या मला म्हणाली. 
‘‘
आम्हा कोल्हाटय़ाच्या, तमाशात नाचणाऱ्या पोरींची लग्न होत नसतात ताई. आम्ही कायम ठेवलेल्या. मला ही एक जण भेटला. पुण्यातला पाटील. माझ्यापेक्षा वयाने दुप्पट, पण मनाने चांगला होता. त्याचं कुटुंब होतं, मुलं-बाळं होती, पण माझ्यावर मन जडलं. मग त्याच्याच बरोबर राहायचं ठरवलं. आज दोन मुलं आहेत मला. तो त्याच्या संसारात सुखी आहे. मी माझ्या मुलांमध्ये, त्यांच्या कधीमधी येण्यात सुखी आहे.. १६ एकर शेती आहे. गाई, बल, शेळ्या आहेत. दुधाचा व्यवसाय आहे. नि बचत गटात २८० जणी आहेत माझ्या. एक स्त्री म्हणून मला सन्मान मिळवायचा होता. माझ्या गावाचं नाव पेपरमध्ये छापून आणायचं होतं मला.. ’’मी चकित होऊन तिचा सारा भूतकाळ ऐकत होते. नगर जिल्हय़ातलं पाथर्डी तालुक्यातलं कोरडगाव. देशमुख, काकडे या उच्चवर्गीयांचं प्राबल्य असलेलं. तिथे कोल्हाटय़ाच्या समाजाला काय मान असणार. एक काळ असा होता तिच्या घरावरून कुणी जात नव्हतं. तर तिच्याशी संबंध म्हणजे, अहो पापम्. कला बघायला सगळ्याच थरांतले लोक यायचे पण बाकी व्यवहार दुरूनच. पण शिवकन्याचं पाणीच वेगळं. ती म्हणते, ‘‘माझा जन्मच तमाशात झाला म्हणता येईल. लहानपणापासून तमाशातच वाढले. पण आजी स्वातंत्र्यसनिक होती. सूतकताईमध्ये बक्षिसं मिळवायची. तिनेच मला बेरीज-वजाबाकी शिकवली. मला शाळेत घातलं. वर्गात पण मी टॉमबॉयच होते. मॉनेटर असायची. गुरुजी माझ्यावर वर्ग सोडून निघून जायचे. ब्राह्मण, मराठा, पाटील सगळ्या माझ्या मत्रिणी होत्या. वर्षभर शाळा, पण परीक्षा आली की आम्हाला नेमकं तमाशाबरोबर गावोगावी जावं लागायचं. मग काय नापास व्हायची. सहा वेळा चौथीला बसले. शेवटी सोडली शाळा नि पूर्ण वेळ तमाशा सुरू झाला.. ’’ 
‘‘
पाच वर्षांची होते तेव्हापासून फडावर नाचायला- गायला लागले. सगळं शिकले. काय केलं नाही मी, लावण्या, नाटकं, ऑस्र्केस्ट्रा, फिल्मी डान्स अगदी सगळं काही. सगळे म्हणायचे, आता सिनेमात जा. मीच दुर्लक्ष करायची. पण सतत नवीन काही तरी शिकायचं असायचं मला. आमच्या तमाशातल्या ढोलकीवाल्याचं बघून वाजवायला शिकले. अचानक एके दिवशी तो आलाच नाही. तमाशा ढोलकीशिवाय कसा होणार? मग आजीने सांगितलं, ही वाजवील, मी ढोलकी घेऊन उभी राहिले, धोतरं, डोक्याला मुंडासं..  आणि जे वाजवलं. त्यानंतर ढोलकी माझ्याच हातात आली. खूप फिरलो. गावोगावी भटकलो. अनेक बरेवाईट अनुभव घेतले. आणि ठरवलं आता माझा संसारच बरा. तुम्हाला खोटं वाटेल ताई, मी अजून तमाशात असते ना, अब्जाधीश झाले असते. पण सगळ्यांचाच उबग आला, ’’ शिवकन्या मनापासून बोलत होती.

altतिच्या घरी आम्ही पोचलो. शेतकऱ्याचं घर असतं अगदी तसंच. घरभर कसली कसली पोती. माणसांचा राबता, कोंबडय़ा, शेळ्या, अगदी कुत्र्यांचाही मुक्त वावर. पण एका गोष्टीने मन वेधून घेतलं. आतल्या खोलीत चक्क कॉम्प्युटर होता. मी विचारलं, ‘‘येतं का तुला?’’ हसली, म्हणाली, ‘‘थोडं थोडं. नाव लिहायला येतं आता.’’ मला गंमत वाटली, कौतुक वाटलं, पण जास्त अभिमान वाटला. काय बाई आहे ही. कुठून कुठे प्रवास झालाय हिचा नि तरीही किती आशावादी आहे. आज शिवकन्या फक्त २८ वर्षांची आहे. सकाळी ती टिपिकल आई असते. मुलांना उठवून त्यांची तयारी करून त्यांना शाळेत पाठवलं की, हिचा दिवस सुरू होतो.. थेट शेतात. आधी दुधाच्या व्यवसायाची व्यवस्था लावायची नि मग हंगामाप्रमाणे शेतीची कामं करायची. सुरुवातीला तिच्याकडे फक्त दोन गाई होत्या, आता १० आहेत. ७० ते ८० लिटर दूध एकटय़ा तिच्याकडून जातं दूध वितरणाला. 
तिच्या शेतात पोहोचलो. समोर पसरलेली तिची शेती. मजुरांची खुरपणी सुरू होती. शेतातच विहीर. एवढय़ात पाठीमागून ट्रॅक्टरचा आवाज. नजर मागे गेली तर ही मस्त मजेत धाड धाड ट्रॅक्टर चालवत आली. तिचं ते रूप कुठल्याही स्त्रीला कौतुक करायला लावणारं. ‘‘हे काहीच नाही जेपीसी चालवते. बचत गटाच्या सहयोगिनीने सांगितलं. हो, सुरुवात सायकल, १४व्या वर्षी चार चाकी आणि १८व्या वर्षांपासून ट्रक. सोळा बाय बाराची लक्झरी बसही चालवते गरज पडली तर. कधीही कोठेही. आता तर बचत गटांच्या कार्यक्रमांना आपल्या सगळ्या सदस्यांना ट्रकमध्ये बसवते नि घेऊन येते. एवढंच नाही, तिची स्वत:ची महेंद्र बोलेरोही आहे, शेतीची कामं करायला नगरला जावं लागतं, मग काय बोलेरोअसतेच सोबतीला.’’  तिच्याही स्वरात कौतुक होतंच. ‘‘काय चालवायचं शिल्लक ठेवलेलं नाही हिने, म्हणूनच मुलीला पायलट बनवणार आहे,’’ ती सांगते. 
इतकी वर्षे तमाशा हेच आयुष्य असणारी शिवकन्या शेतकरी झाली खरी, पण त्याच्यातलं तिचं ज्ञान अपुरंच होतं. नवऱ्याने नऊ एकर शेत आणि टू व्हीलर घेऊन दिली खरी, पण आणि तेव्हा या क्षेत्रात अगदीच नवीन होती. गावातल्या भेदाभेदीमुळे तिला कुणाकडे मदतही मागता येत नव्हती. गावात कुणी अधिकारी आले तरच माहिती मिळायची. हार मानणं शिवकन्येला माहीतच नव्हतंच. तिने बल हाती घेतले. स्वत: नांगरणी केली, औषध फवारणी केली. पाणी शेंदलं. शेतात कपाशी लावली खरी पण अपुऱ्या माहितीमुळे नऊ एकरांसाठीचं बी फक्त पाच एकरांत लावलं गेलं. फक्त दोन क्िंक्टल कापूस निघाला. नुकसान झालं, पण मोठा अनुभव गाठीशी आला. पुढल्या वर्षी नीट माहिती घेतली. शेतातली चार एकर जमीन पडीक निघाली, मग तिथे विहीर खोदली. कापसाबरोबर ज्वारी, बाजरी, गहू लावला. आज ती दर एकरी दोन क्िंक्टल कापूस घेते. याच दरम्यान शासकीय योजनांची माहिती मिळत होती. पण सगळे गावातले पुरुष त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी योजनांचा लाभ घेत होते. त्याच वेळी गावात दीपा भालसिंग नावाच्या कृषी अधिकारी आल्या आणि त्यांनी शिवकन्येला या योजनांचा लाभ दिला. त्यातूनच तिने शेततळं घेतलं. बागायती शेती घेतली. मग आंबा, चिकू यांचं पीक घ्यायला सुरुवात केली. आज तिची एक हेक्टर जागेत फळबाग आहे. यासाठी सगळी महत्त्वाची कामं शिवकन्याच करते, अगदी बियाणं निवडण्यापासून शेतमजुराच्या निवडीपर्यंत. आज त्या नऊ एकरांचे सोळा एकर झालेत. आणि दुधदुभतंही तेवढंच. तिच्या दोन बहिणींना तिने तमाशाचं वारंही लागू दिलेलं नाही. दोघींही कॉम्पुटरचं शिक्षण घेताहेत. एकीचं बीसीएस पूर्णही झालंय. लवकरच त्यांची चांगली स्थळं बघून संसार सुरू करून द्यायचा आहे तिला. आपलं जे झालं, कोलाटय़ाच्या, तमाशात नाचणाऱ्या मुलीचं जे होतं ते आपल्या बहिणींच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत ती होऊ देणार नाहीए..  
एका बाजूला तिचा शेतकी व्यवसाय जोरात सुरू होत होता, त्याच वेळी बचत गटाचं पीकआलं. प्रत्येक गावा गावात माविम (महिला आíथक विकास मंडळ) शासकीय योजना राबवत होतं. माविमच्या सहयोगिनी दहा दहा जणींचा गट करून गावात मायक्रो फायनान्सचा प्रयोग यशस्वी करत आहेत. महिलांना उद्योगासाठी घरातून बाहेर काढणं, त्यांना बचतीचं महत्त्व पटवून सांगणं आणि त्यातून व्यवसाय उभारणं कठीण होतं पण  अशक्य नव्हतं. बचत गटाचं लोण पसरू लागलं. हळूहळू स्त्रिया घरातून बाहेर पडू लागल्या. शिवकन्येनेही आपल्या कोलाटय़ाच्या स्त्रियांचा दहा जणींचा गट तयार केला. गावात देशमुख मंडळींच्या स्त्रिया होत्या. त्यांच्या दृष्टीने तमाशातल्या बायका म्हणजे संकटाला आमंत्रण. घरातल्या पुरुषांनी सक्त ताकीद देऊन ठेवलेली. त्यांना तुमच्यात घ्यायचं नाही. त्यांच्याशी संबंधच नको. पुरुषांना भीती होती, त्या आपल्या बायकांना फूस लावतील आणि बायकांना भीती त्या आपल्या नवऱ्यांना फूस लावतील. त्यामुळे या कोल्हाटय़ाच्या १० जणी बचत गटांच्या बठकींना हजर राहत, पण बाजूला एका कोपऱ्यात बसत. पण शिवकन्या प्रेमळ नि गप्पिष्ट. तिने हळूहळू सगळ्यांची मनं जिंकत नेली. ती आपलं वाईट करणार नाही हा विश्वास गावातल्या बायकांना आला. हळूहळू ही कोल्हाटय़ाची पोर सर्वाची ताई झाली. सुरुवातीला महिना ५० रुपयेच बचत करणाऱ्या महिलांना बचतीचं महत्त्व कळायला लागलं नि शंभर रुपये बचत होऊ लागली. हळूहळू गावातल्या स्त्रियांची आणि पर्यायाने १०-१० जणींच्या गटांची संख्या वाढू लागली. त्यात शिवकन्येचा वाटा मोठा होता. साहजिकच अध्यक्षपदाची माळ तिच्या गळ्यात पडली. गावातल्या महिलांनी एकमताने तिला निवडून दिलं. एक कोल्हाटय़ाची पोर, शिवकन्याताई झाली, बचत गटाची अध्यक्ष झाली. आज तिच्या अध्यक्षतेखाली १३ बचत गट आणि २८५ महिला आहेत. त्यांचे पसे दर महिना बँकेत भरणे, तो व्यवहार चोख ठेवणं, बायकांना छोटय़ा व्यवसायांसाठी बँकांचं कर्ज देणं, गरज पडल्यास अंतर्गत कर्ज देणं. यातून आज गावात सुमारे शंभर छोटे मोठे व्यवसाय उभे राहिले आहेत.
मलाही कुतूहल होतच. शिवकन्या आणि बचत गटातल्या इतर महिलांबरोबर मीही गावाचा दौरा केला. आज गावातल्या ३० टक्के स्त्रियांनी दुग्धव्यवसाय, तेलाचा व्यवसाय, पिठाची गिरणी, बांगडय़ांचा, साडय़ांचा व्यवसाय, टेलिरगचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येकीने कौतुकाने आपला व्यवसाय दाखवला. पूर्वी आम्हाला काहीच महत्त्व नव्हतं ना घरात ना गावात, पण आता या व्यवसायामुळे आम्ही कमवू लागलो आहोत. हातात स्वत:चे पैसे आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास येतो आहे. मुलांना चांगलं शिक्षण, अन्न देतो आहे, हे सांगतानाही या स्त्रियांचे चेहरे फुलले होते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पतिदेवांच्या डोळ्यांत आणि बोलण्यातही त्यांच्याविषयीचं कौतुक स्पष्टपणे दिसत होतं.
शिवकन्येने एकीला गटात पसे नसताना दुसऱ्या गटांशी, बँकेशी बोलून मुलीच्या लग्नासाठी आठ हजाराचं कर्ज घेऊन दिलं. एकीच्या मुलाच्या शिक्षणासाठी १० हजार दिले, आज तो मुलगा नोकरी करतो आहे. पूर्वी गावात कुणालाही पसे हवे असले की सावकारच पसे द्यायचा. कितीही व्याज लावायचा. शिवकन्येने ते थांबवलं. आज या स्त्रियांना दोन टक्केव्याजाने कर्ज मिळतंय. त्यामुळे शोषण थांबलंय. एकूणच गावात उत्साह आणि स्त्रियांमध्ये प्रचंड ऊर्जा जाणवत होती. आपण काही तरी करू शकतो, हा आत्मविश्वास सगळ्या आसंमतात भरून राहिला होता. पण एवढय़ावरच थांबली तर ती शिवकन्या कसली? तिला स्वत:साठी चिलिंग प्लांट लावायचा आहे. मोठा दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे. आणि येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या महिलांना समितीवर आणायचं आहे. 
गावातल्या सभागृहात डोकीवर पदर घेऊन बसलेल्या स्त्रियांसमोर तिचं घणाघाती भाषण सुरू होतं.. छोटय़ा-मोठय़ा उद्योगाचं महत्त्व सांगत असतानाच अनेकींचे व्यक्तिगत प्रश्नही कुशलतेने सोडवणारी शिवकन्या. तिच्यात मला एक समर्थ स्त्रीचं दर्शन घडत होतं, जणू ती  मला सांगत होती, उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे...

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails