Monday, 29 November 2010

स्वप्नांपलीकडची दिवाळी!


बदलता भारत , बदलते विश्व या सदरात मालदीवमधले भारताचे उच्चायुक्त श्री. ज्ञानेश्वर मुळे दर पंधरा दिवसानी भारतीय मनाला उभारी आणणारे लेख लिहित असतात. मालदीवला उच्चायुक्त म्हणून गेल्यापासून त्यांनी मालदीवसाठी आणि आपल्या भारतदेशासाठी भारीव अशी कामगीरी केली आहे. एखादा सरकारी अधिकारी आपल्याच देशात नव्हे तर पदेशातही जावून किती उत्तम काम  करू शकतो याचं हे खुप चांगलं उदाहरणर आहे. त्यांनी स्वप्न पाहिली आणि आता ती सत्यात येताना आपण पहात आहोत. स्वप्न सत्यात येतानाचा हा प्रवास खास 'स्वप्नपंख' च्या वाचकांसाठी  लोकसत्ताच्या सौजन्याने.   



स्वप्नांना मी ‘उमलू नकाच केव्हा’ असे कधीच सांगत नाही. अपूर्णतेची गोडी कवितेत ठीक आहे, प्रत्यक्षात पूर्णतेकडची झेप महत्त्वाची. जपानी कुंभार आपली मडकी विश्वास बसू नये इतकी परिपूर्ण बनवितात आणि मग ती ओली असतानाच एखाद्या ठिकाणी बोटाने हलकेच दाबून तिला अपूर्णतेची गोडी चिकटवितात. स्वप्नांची बाग सतत फुलवत ठेवणं, तिला अधिकाधिक संपन्न बनविणं महत्त्वाचं आहे. मीही सतत नव-नव्या स्वप्नांच्या शोधात असतो आणि भविष्यासाठी मी स्वप्नांचा एक गुच्छ तयार ठेवला आहे. त्यात मालदीवमधल्या साहित्य संमेलनापासून मला भारतात लवकरच सुरू करायच्या शैक्षणिक संस्थेपर्यंत अगणित स्वप्नांचा समावेश आहे.
मकरंद चुरी यांनी ऑगस्टमध्ये मालदीवच्या कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या ई-मेलचा शेवट असा केला आहे, ‘प्रवास तर सुरू झाला आहे; पण रस्ता खूप दूरचा आहे! मला या वाक्याची गंमत वाटली आणि मकरंद चुरींचा आतापर्यंतचा मालदीवमधला प्रवास आठवला. फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांचा पहिला मेल आला. ७ फेब्रुवारीच्या ‘लोकसत्ता’तील ‘आपण सगळेच मालदिवी आहोत’ या माझ्या लेखावर त्यांची दीर्घ प्रतिक्रिया होती. तिचा सारांश असा- ‘तुमचे अनेक लेख पूर्वी वाचलेत; पण हा लेख मला, पत्नी अंजलीला व मुलगी सायलीला खूपच प्रभावित करून गेला. तुमच्या लेखांतून तुम्ही आम्हाला थेट मालदीवला नेलंत. तुमचा लेख वाचताना अंजलीच्या आणि माझ्या डोक्यात एक विचार आला तिथल्या तुम्ही उल्लेखिलेल्या एक हजार बेटांवर फळझाडं लावली तर? तिथल्या लोकांना पीक व पैसा दोन्ही मिळेल. शिवाय काही दुर्लभ भाज्या ज्यांची पंचतारांकित हॉटेल्सना गरज असते त्यांचेही पीक घेऊ. तिथून निर्यात करता येईल. ऑरगॅनिक भाज्या केल्याने कार्बन क्रेडिटही मालदीवला मिळेल. वाळूच्या जमिनीत अस्कारागससारख्या भाज्या फार चांगल्या येतात. फार छान स्कोप आहे या सर्व गोष्टींना.
चुरींनी त्या मेलमध्ये त्यांची स्वत:ची पाश्र्वभूमी सांगितली होती. भारतात २०-२५ वर्षांपूर्वी पंचतारांकित हॉटेलांना लागणाऱ्या भाज्या व फळे आयात केली जात असत. चुरींनी आधुनिक शेतीचे तंत्र वापरून शेतकऱ्यांना सामील करून अशा उंची भाज्या व फळांच्या उत्पादनाचे काम सुरू केले आणि आज भारतात अशा हॉटेलांसाठी फळे व भाज्या आयात करण्याची गरज संपली. एका अर्थाने चुरी व त्यांचे कुटुंबीय ‘क्रांतिकारक’ आहेत. त्यांना दिलेल्या उत्तरात मी त्यांना मालदीवला भेट देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते व अंजली दोघे आले. येताना मालदीवमधल्या कृषी उत्पादनाची स्वत:च्या अभ्यासावर आधारित अशी संकल्पना घेऊन आले. स्वत:बरोबर काही बिया, काही रोपटी, काही भाज्या व फळेही घेऊन आले. त्यांच्यासाठी मी काही शेतकरी (होऊ घातलेले) शोधून ठेवले होते. त्यांनी मालदीवमध्ये केलेले प्रयोग असे होते. मीधू आणि हुळुदू या जोड बेटांवरील शेतकऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक शेती पीकपद्धती यांचा अभ्यास केला. पाणी, माती व हवामानाचा अभ्यास करून काही भाज्या व फळांची रोपे लावली. शेतकऱ्यांना बिया देऊन त्यांना पिकाची निगराणी, पाणी आणि उत्पादन यांच्यातील बारकावे समजावून सांगितले. उत्पादनं बाजारापर्यंत कशी पोहोचविता येतील याचे रिसॉर्टवरील लोकांना बोलावून त्यांच्यासमोर मार्गदर्शन केले. रिसॉर्टवरील आचाऱ्यांना त्यांच्या गरजा काय असतात ते शेतकऱ्यांना सांगायला लावले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले तर सगळे किती सहज शक्य आहे हे पटवून दिले.
एका आठवडय़ात चुरी दाम्पत्याने केलेले काम शब्दांपलीकडचे होते. कर्तृत्ववान माणसे कामाने बोलतात याचं प्रात्यक्षिकच त्यांनी दिलं. त्यांना आता मालदीव सरकारच्या वतीनं कृषी विशेषज्ज्ञ म्हणून पाचारण केले जाईल. मी एक सरकारी अधिकारी आणि ते दोघे शेतीतज्ज्ञ असले तरी आमच्या तिघांच्या डोळ्यातील स्वप्न एकच आहे. भारतीय मदतीनं मालदीवमध्ये मळे फुलवायचे. तिथल्या चमचमत्या वाळूवर हिरव्या पिकांचे गालिचे पडू देत आणि तिथल्या झाडांना फळांचा भार असह्य होऊ देत! स्वप्नांचे आणि स्वप्नपूर्तीचे मला वेड आहे. प्रत्येक नवीन भेटणाऱ्या व्यक्तीत मला स्वप्नांच्या नवीन शक्यता दिसतात. माणसांबरोबरच नवे विचार, नव्या कल्पना, नव्या घटना खरं तर प्रत्येक नवा दिवस स्वप्नांचे सूपभर मोती माझ्यावर उधळतो आणि कोणते वेचू, कोणते नको, अशा गोंधळात जीव हरखून जातो. हातात आलेल्या स्वप्नांचा पाठलाग हेच माझे जीवन आहे.
मालदीवला यायच्या आधी मालदीवविषयी बरेच वाचले. त्या वाचनात इतकी नवनवीन स्वप्नं सजवली, की इथे येताना स्वप्नांची एक प्रचंड सूटकेसच बरोबर घेऊन आलो आणि गेली दीड र्वष संधी मिळेल तसं स्वप्नांचं हे बी पेरायचं काम करतो आहे. प्रत्येक स्वप्नाचं बीज वेगळ्या पद्धतीनं रुजतं, त्याला वेगळी खतं आणि वेगवेगळी निगरानी लागते. प्रत्येक रोप वेगळं. त्याची वाढण्याची तऱ्हा वेगळी आणि त्यामुळं मनाला मिळणाऱ्या समाधानातील विविधताही वेगळी. आता मालदीवला येऊन बरोबर दीड र्वष झालं. वेगवेगळ्या टप्प्यात असणारी ही स्वप्नपूर्ती पाहताना एका वेगळ्याच नशेचा अनुभव मी घेतो आहे.
एप्रिल २००९ मध्ये मालदीवला येण्याआधी नागरी विमान खात्याच्या सचिवांना मी भेटलो होतो. चर्चेत ते म्हणाले, की माले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाच्या स्पर्धेत जीएमआर या भारतीय कंपनीला अपात्र ठरविण्यात आलं होतं. झालं! ते वाक्य आणि तो विषय तिथंच संपायला हरकत नव्हती; पण माझ्या मनाच्या खिडकीतून एक छोटे स्वप्न डोकावून पाहू लागले, मी लगेच जीएमआरच्या दिल्ली कार्यालयाशी संपर्क साधला. रवींद्रन आणि नायर यांच्याकडून अयशस्वी प्रयत्नांची माहिती घेतली. मालदीवला रुजू होताच काही आठवडय़ात स्थानिक मंत्री, अधिकारी वगैरेंशी चर्चा केली. जीएमआरसारख्या कंपनीला अपात्र ठरविण्यामागच्या तर्काला मी आव्हान दिलं आणि जीएमआरला मालदीवमध्ये संधी देणं मालदीवच्या हिताचं आहे, हे मनात रुजविलं. वारंवार प्रयत्न केल्याने, एकदा तरी जीएमआरशी चर्चा करून नेमकं कसं पुढं जाता येईल यावर चिार करण्यासाठी त्यांची मान्यता मिळविली. त्यानंतर मी जीएमआरशी संपर्क साधला आणि त्यांना मालदीवला प्रतिनिधी मंडळ पाठविण्याची विनंती केली; पण आता जीएमआरला प्रकल्पात रुची नव्हती. माझ्या मनात भारतीय कंपनीने मालदीवमध्ये बांधलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न रुजलेले होते; पण जीएमआरच्या इच्छेचे रोप केव्हाच कोमेजून गेले होते. विमानतळ बांधून ते चालविण्याचा अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या भारतात नाहीत. जीएमआरने दिल्ली व हैद्राबाद (आणि नंतर इस्तंबुल) ही विमानतळे बांधली असली तरी विमानतळावरील वाहतूक हाताळण्याचा त्यांचा अनुभव अपुरा होता म्हणून त्यांना अपात्र घोषित केले होते. या समस्येवर तोडगा काढायचा माझा प्रयत्न होता. मालदीव सरकारबरोबरील माझ्या अथक चर्चेचा परिणाम म्हणून अतिउत्तरेकडील हानीमाधू हे विमानतळ भारतीय कंपनीला देण्याचे त्या सरकारने तत्त्वत: मान्य केले होते; पण मी अनेकवार प्रयत्न करूनही आणि त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाद्वारे प्रयत्न करूनही जीएमआरकडून प्रतिसादच नव्हता.
असेच चार-पाच महिने गेले. माझी अस्वस्थता वाढू लागली. मी सरळ विमान वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना फोन करून एकदा तरी जीएमआरला मालदीवला येऊ द्या, त्यानंतर काय करायचे ते त्यांना ठरवू दे, असा निर्वाणीचा इशारा दिला. माझ्या या प्रयत्नांची दया येऊन सचिवांनी ‘मी त्यांना पाठवितो’ असे आश्वासन दिले. त्यानंतर काही आठवडय़ांनी संध्याकाळी माझा फोन खणखणला. नाव दिसत नव्हते. ‘मी श्रीपती, सीईओ, जीएमआर हैदराबाद..’ सचिवांनी आपले आश्वासन पूर्ण केले होते.
२ ऑक्टोबर २००९ ला श्रीपती मालदीवला आले. गांधी जयंतीच्या दिवशी. मी माझ्या कार्यालयाच्या भिंतीवरचा मालदीवचा नकाशा त्यांना दाखविला. कुठे कुठे भारतीय गुंतवणुकीने बांधली गेलेली विमानतळे पाहणे माझे स्वप्न आहे ते सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांना उत्तरेकडचा हानीमाधू विमानतळ दाखवला. श्रीपतींनी जेव्हा तिथला समुद्र, तिथली धावपट्टी, त्या सुंदर बेटावरची झाडी आणि फिकट सोनेरी वाळू पाहिली तेव्हा ते बोलले, ‘आता माझ्या डोळ्यांनी मी तुमचे स्वप्न पाहतोय’ हानीमाधूला भारतातून विमानसेवा सुरू झाली तर दोन देशांतील अंतर एका तासाऐवजी पंचवीस मिनिटे होईल या माझ्या विचारामागचा अर्थ त्यांना कळला.
त्यानंतरच्या एका महिन्यात प्रचंड धावपळ झाली. ५ नोव्हेंबर २००९ ला (माझ्या वाढदिवसानिमित्त) जीएमआर व मालदीव सरकार यांच्यात पहिला समझोता झाला. त्यानंतर काही महिन्यात राजधानी मालेजवळच्या विमानतळाचे दरवाजेही उघडले. २८ जून २०१० ला मालदीव सरकार आणि जीएमआर यांच्यात माले विमानतळासाठी करार झाला. एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ, आर्थिक व व्यापारी केंद्र यांचे बांधकाम व व्यवस्थापन २५ वर्षांसाठी जीएमआर करील. माले प्रकल्पाचे काम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुरूही झाले. माझे छोटे स्वप्न.. त्यातून छोटी धडपड आणि त्यातून जन्मली मालदीवमधली सगळ्यात मोठी गुंतवणूक आणि मालदीवच्या इतिहासातील सगळ्यात भव्य प्रकल्प. कधी कधी सहज विचार येतो.. जीएमआरचा पाठपुरावा मी सहा-सात महिने केला, तो मध्येच सोडला असता तर..
या प्रकल्पात मला थोडाफार त्रासही झाला. मालदीवमध्ये या प्रकल्पावर राजकीय टीका,  संसदीय गदारोळ, वृत्तपत्रीय हल्ले आणि न्यायालयातील प्रकरणे यांच्याबरोबरच धमक्याही वाटय़ाला आल्या; पण आम्ही शांतपणे या प्रक्रियेला तोंड दिले. या प्रकल्पाचं आपल्या देशासाठी असणारं महत्त्व समजायलाही काही र्वष लागतील; पण स्वप्नपूर्तीच्या आनंदाला मात्र सुरुवात झाली आहे.
गेल्या दीड वर्षांत विविध रंगांच्या विविध आकारांच्या अनेक स्वप्नांना मी मूर्त रूप दिले आहे. मालदीवमधील सन २००८ साली झालेल्या लोकशाहीच्या आगमनाचा ‘स्वप्नं बघण्याची सुवर्णसंधी’ असा अर्थ घेतला. स्वप्नं बघण्यासाठी आणि स्वप्नं जगण्यासाठी माणसाचा जन्म असतो; पण स्वप्नांनाही सुपीक जमीन लागते आणि कसणारे हात. 
गेल्या दीड वर्षांत मी जी स्वप्नं जगलो त्यांची यादी करणं कठीण आहे. प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रात मी स्वप्नांची पखरण करून टाकली. आर्थिक क्षेत्रात विमानतळांबरोबरच शालेय व्यवस्थापन, संगणक प्रशिक्षण, विद्यापीठ स्थापना, प्रवासी रिसॉर्ट, अक्षय ऊर्जा, गृहबांधणी अशा जवळजवळ सगळ्या क्षेत्रात भारतीय प्रकल्पांची लागवड केली आहे. एनआयआयटी, टाटा उद्योग, श्रीराम, जीएमआर, सुझलॉन वगैरे नामवंत तशाच अनेक नवनवीन कंपन्यांनाही मालदीव प्रवेशात यश आले. 
सांस्कृतिक क्षेत्रातही दोन वर्षांपूर्वी केवळ अशक्य मानले गेले असते असे अनेक पुढाकार घेतले. मालदीवमध्ये भारतीय समारंभात ‘दीप प्रज्वलन’ नव्हते, त्याची सुरुवात केली (कुराण पठणही होतेच होते आणि अजूनही आहे) सुरुवातीला शंभर टक्के मुस्लीम देशात दीप प्रज्वलन हा ‘संवेदनशील’ विषय ठरला. शेवटी एका मालदिवी अभ्यासकाकडून, दीप प्रज्वलन हा भारताच्याच नव्हे तर मालदीवच्या परंपरेचा भाग आहे, असे सिद्ध करविले. आता राष्ट्राध्यक्षांपासून सगळेच दीप प्रज्वलन आनंदाने करतात. होळीपासून दिवाळीपर्यंत सगळे उत्सव आम्ही आता पहिल्यांदाच साजरे करताहोत. लवकरच भारतीय सांस्कृतिक केंद्रही इथे उघडले जाईल आणि सतारीचा झंकार, तबल्याची थिरक, रागमाला, योग, भारतीय भाषा, भारतीय सिनेमा सगळ्यांचा या देशाला परिचय होईल.
फक्त आर्थिक गुंतवणूकच नव्हे तर सांस्कृतिक गुंतवणूकही वाढते आहे. पर्यटन क्षेत्रातही भारतीय गुंतवणूक येत आहे. ‘मेक माय ट्रीपने’ मुंबई ते (मालदीवचे अति दक्षिणेचे) ग्यान विमानतळ, अशी चार्टर विमानसेवा तीन दिवसांच्या पॅकेजसह माफक दरात सुरू केली आहे. बेंगळुरूहून पाच दिवसांऐवजी आता दररोज विमानसेवा उपलब्ध आहे. या देशातील पहिली साहित्यिक संस्था आम्ही सुरू केली. इथल्या भारतीयांसाठी मोफत हिंदी, तमीळ, मल्याळी व दिवेहीचे वर्ग सुरू केले. प्रत्येक नोंदणीकृत भारतीयासाठी माफक दरात विम्याची योजना अंमलात आणली. अडचणीत असलेल्या मजुरांसाठी आसरा, आर्थिक मदत आणि भारतात परत पाठविण्याच्या ‘कल्याण’ योजनांचा प्रारंभ केला. या देशातील तुरुंगात खितपत पडलेल्या प्रत्येक भारतीय कैद्याला स्वतंत्र भेटलो, त्यांची कहाणी ऐकली आणि सोळापैकी चार जणांची सुटका करविली. बाकीच्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 
उच्चायुक्त कार्यालय, भारतीय आणि स्थानिक लोकांना आपलेसे वाटेल, असे वातावरण तयार केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार केले. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला संधी मिळावी म्हणून भारतीय समुदायासाठी अनेक कार्यक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक समारंभ यांचे नियमित आयोजन सुरू केले. या सर्व उपक्रमांद्वारे मरगळलेल्या भारतीय समाजात नवे चैतन्य आणले आणि भारत-मालदीव संबंध एका नव्या वरच्या पातळीवर पोहोचविले. स्वप्नांची सतत पेरणी, निगराणी आणि मळणी यांच्यामुळे आनंदाचे कोठार धनधान्याने भरून वाहते आहे.
स्वप्नांना मी ‘उमलू नकाच केव्हा’ असे कधीच सांगत नाही. अपूर्णतेची गोडी कवितेत ठीक आहे, प्रत्यक्षात पूर्णतेकडची झेप महत्त्वाची. जपानी कुंभार आपली मडकी विश्वास बसू नये इतकी परिपूर्ण बनवितात आणि मग ती ओली असतानाच एखाद्या ठिकाणी बोटाने हलकेच दाबून तिला अपूर्णतेची गोडी चिकटवितात. स्वप्नांची बाग सतत फुलवत ठेवणं, तिला अधिकाधिक संपन्न बनविणं महत्त्वाचं आहे. मीही सतत नव-नव्या स्वप्नांच्या शोधात असतो आणि भविष्यासाठी मी स्वप्नांचा एक गुच्छ तयार ठेवला आहे. त्यात मालदीवमधल्या साहित्य संमेलनापासून मला भारतात लवकरच सुरू करायच्या शैक्षणिक संस्थेपर्यंत अगणित स्वप्नांचा समावेश आहे.
दिवाळीत आपण नाचतो, बागडतो, फटाके उडवितो, फराळ खातो, मिठाई वाटतो. मला फुलबाज्या, भुईनळे आणि आतषबाजी फार आवडते; पण आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी करू नयेत. या तिन्ही गोष्टी आवडतात; पण प्रदूषणही वाढवितात. त्यामुळे स्वप्नं, नवीन स्वप्नं आणि नित्यनूतन स्वप्नं हीच आतषबाजी आता आनंद देते आणि आतषबाजीनंतर? स्वप्नपूर्तीचा फराळ! स्वप्नपूर्तीची मेजवानी! स्वप्नापलीकडची दिवाळी!

ज्ञानेश्वर मुळे -
लोकसत्ता
रविवार, २८ नोव्हेंबर २०१०
dmulay@hotmail.com 

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails