Wednesday, 30 November, 2011

ए फॉर अ‍ॅपल


आपला उद्योग हा कलाविष्कारच आहे आणि आपले उत्पादन ही कलाकृती आहे, असे स्टीव जॉब्स याचे मत आहे आणि आतापर्यंतची त्याची वाटचाल त्याच्या मताची पुष्टी करते. जॉब्सने अ‍ॅपल ही कंपनी काढली त्याला जेमतेम ३५ वर्षे झाली. या कंपनीचे कोणतेही उत्पादन प्रचलित या शब्दात बसत नाही. काळाचा वेध घेणारी तंत्रदृष्टी, तंत्रप्रतिभा आणि भविष्याला आकार देण्याची जिद्द असली की काय करता येते, याचे अ‍ॅपलचे प्रत्येक उत्पादन हे उदाहरण आहे. ग्राहकाच्या व्यवहारात आपल्या उत्पादनाची गरज निर्माण करणे हे मार्केटिंगचे कौशल्य मानले जाते. त्या अर्थाने जॉब्स हा या क्षणी जगातला सगळय़ात कल्पक मार्केटिंग मॅनेजर म्हणायला हवा. ज्या वेगाने त्याने आपल्या उत्पादनांव्दारे साऱ्या बाजारपेठेलाच आकार दिला, त्याला तोड नाही. जॉब्स बाजारात उतरायच्या आधीही संगणक होते आणि मोबाइल फोनही होते. पण या दोन्हींची मूलभूत व्याख्याच त्याने बदलली आणि आपली उत्पादने जवळपास ७५ देशांतल्या उच्चभ्रूंच्या चर्चेचा विषय करून दाखवली. वस्तुत: अ‍ॅपलचे मॅकिंतोश संगणक ज्या वेळी आले, त्यावेळी मायक्रोसॉफ्टस्ने बाजारपेठ जवळपास काबीज केल्यासारखीच स्थिती होती. बिल गेट्सचा उदय व्हायच्या आधी संगणक डॉस या कंटाळवाण्या प्रणालीवर चालत असत. एक साधी आज्ञा देण्यासाठी त्यावेळी ढीगभर बटणे आणि शब्द जुळवावे लागायचे. आणि परत आपण जे करत आहोत ते दृश्य स्वरूपात कसे असेल याचाही अंदाज डॉसच्या काळात नव्हता. ही परिस्थिती बदलली बिल गेट्स याने. साध्या बटणदाब्या कॅमेऱ्यांनी जी क्रांती केली ती संगणकाच्या क्षेत्रात गेट्स याने केली. हॉटशॉट टाइपचे कॅमेरे आल्यावर प्रत्येकालाच छायाचित्रकार झाल्यासारखे वाटू लागले आणि गेट्सच्या विंडोजमुळे अर्धशिक्षितालाही संगणक वापराचा आनंद घेता आला. त्या अर्थाने गेट्स याचे उत्पादन आणि औद्योगिक विचारधारा ही जनसामान्यांसाठी होती. तिच्यात होती फक्त सोय. पण सोय आणि सौंदर्य फार काळ सुखाने नांदत नाहीत. सोय सौंदर्याला मारक ठरते. तसेच बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट यांचे झाले. या पाश्र्वभूमीवर जॉब्स अ‍ॅपल घेऊन बाजारात उतरला. त्याचे मॅकिंतोश या नावचे संगणक दिसायला पीसीसारखेच  होते. पण त्याची कार्यशैली विंडोजपेक्षा कमालीची वेगळी होती. कमीत कमी बटणांचा वापर, ग्राहकाला चुकायची संधीच न देणारी गोळीबंद बांधणी, हे जॉब्सच्या उत्पादनांचे वैशिष्टय़ त्यावेळी पहिल्यांदा वापरणाऱ्यांच्या लक्षात आले. त्या वेळी संगणकात माहिती साठवण्यासाठी आणि ती इकडून तिकडे नेण्या-आणण्यासाठी चपटय़ा, काळय़ा अशा फ्लॉपीज् वापराव्या लागायच्या. विंडोजचा वापर करणाऱ्या पीसीवर त्याच्यासाठी बटणे असायची आणि त्याच्या आधारेच फ्लॉपीज् काढता वा घालता यायच्या. जॉब्सच्या मॅकने या बटणांना रजा दिली. संगणकाच्या पडद्यावरच फ्लॉपीज् काढण्या-घालण्यासाठी आदेश द्यावा लागायचा. वरकरणी ही बाब छोटीशी वाटत असली तरी या साध्या सुधारणेमुळे संगणकातील अनेक समस्या त्यावेळी टळल्या होत्या. आज डेस्कटॉप कुटुंबातील संगणक अनेकांना नकोसे वाटतात. याचे कारण त्यांना जागा फार लागते. संगणकाचा पडदा, स्मरणयंत्रणा आणि आदेशप्रणालीसाठी ते उभे खोके आणि कळफलक अशी किमान तीन गोष्टींसाठी डेस्कटॉप घ्यायचा तर सोय करावी लागते. अ‍ॅपलच्या मॅकने ही अडचण ओळखून आपल्या संगणकात आमूलाग्र बदल केला. त्याच्या मॅकने हार्ड डिस्क नावाचे खोकेच गायब केले आणि कळफलकाला पहिल्यांदा संगणकापासून सोडवले. या दोन बदलांमुळे संगणक इतका सोयीचा झाला की विचारता सोय नाही. कारण तो वापरण्यासाठी टेबलखुर्चीतच बसायची अट दूर झाली. पण हे झाले आहेत त्या उत्पादनांतील सुधारणांबाबत. पण खरा द्रष्टा हा प्रचलित व्यवस्थेला धक्का देऊन नवनिर्मिती करीत असतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे द्रष्टेपण जॉब्सच्या बाबत दिसले ते त्याच्या आयपॉड या उत्पादनाने. गाण्या-बजावण्याच्या क्षेत्रात एके काळी छोटेखानी ट्रान्झिस्टरने जी क्रांती केली असेल त्याचे पुढचे पाऊल या आयपॉडने टाकले. आपल्याला आवडती गाणी आपल्याबरोबर नेता यावीत ही कोणत्याही संगीतप्रेमींची गरज असते. ट्रान्झिस्टरने ती सोय काही प्रमाणात करून दिली आहे. पण रेडिओमध्ये कोणत्या गाण्यानंतर काय लागेल हे सांगता येत नाही. रेल्वे, विमान आदी प्रवासात रेडिओच्या ध्वनिलहरी सापडतीलच असे नाही. आयपॉडने हे दोन्ही टाळले. यातील महत्त्वाचा भाग असा की, आयपॉडला मोठे स्पीकर देण्याचे टाळून कुठेही, कोणाच्याही सोयी-गैरसोयींचा विचार न करता गाण्या- बजावण्याच्या भारतीय सवयीने ध्वनिप्रदूषणात भर घालायची संधीही त्याने दिली नाही. शिवाय याच आयपॉडला छोटा पडदा देऊन जॉब्सच्या आयपॉडने सिनेमा आदी पाहण्याचा आनंद बरोबर घेऊन हिंडायची संधी दिली. त्याच्या आयफोन या मोबाइल उपकरणानेही या खेळाचे नियम नव्याने लिहायची वेळ प्रतिस्पर्धी कंपन्यांवर आणली. दरम्यानच्या काळात त्याचे जुन्या शालेय पाटय़ांसारखे दिसणारे आयपॉड नावाचे उपकरण बाजारात आलेच होते. त्याने संगणकाला एखाद्या वहीच्या आकारात आणले आणि कमालीचे सोयीचे करून टाकले. त्या वहीच्या पडद्यावरच कळफलक वगैरेंची सोय देऊन त्याने आळशांसाठी संगणक न वापरण्याचे कारणच समूळ नष्ट करून टाकले. तर या जॉब्सने बुधवारी आपल्या नव्या उत्पादनांची घोषणा केली. आतापर्यंतच्या अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांना एका समान सॉफ्टवेअरमध्ये गुंतवू शकेल आणि कोठूनही या उपकरणांच्या संपर्कात राहता येऊ शकेल, अशी सोय असलेली आयक्लाउड नावाची नवी प्रणाली त्याने उपलब्ध करून दिली. अ‍ॅपलचा जन्म १९७६ सालचा. यानंतरच्या काळात अन्य कोणत्याही कंपनीप्रमाणे या कंपनीलाही आपली भाग्यरेखा पुसली जाते की काय, असे वाटण्याइतके कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. स्टीवचा सुरुवातीचा भागीदार स्टीव्ह वोझ्निअ‍ॅक हाही वेगळा झाला. वाढता तोटा कंपनीला रसातळाला घेऊन गेला तरी जॉब्सचा आत्मविश्वास कायम होता. त्यात त्यालाही दुर्धर कर्करोगाने गाठले. पण त्याचा आत्मविश्वास इतका दुर्दम्य की, त्यातूनही त्याने नवनव्या उत्पादनांवर काम करणे सुरूच ठेवले. प्रत्येक नवीन उत्पादन हे आपण स्वत: जातीने जगापुढे सादर करायचा करार कर्करोगही मोडू शकलेला नाही. तीन महिन्यांपूर्वी त्याचे आयुष्य आता जेमतेम सहा आठवडेच राहिले आहे, अशा बातम्या आल्या होत्या. त्या स्टीवने तूर्तास तरी खोटय़ा ठरवल्या. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्टीव जॉब्स हा एक पंथ बनला आहे. दरवर्षी आता हा नवीन काय देणार याची उत्सुकता माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असतेच असते. त्याच्याविषयी इतकी कमालीची उत्सुकता आहे की आणखी दीड-दोन वर्षांनी येणार असलेल्या आयस्टीव : द बुक ऑफ जॉब्सनावाच्या त्याच्या पहिल्या अधिकृत चरित्राने अ‍ॅमेझॉन आदी पुस्तकविक्रेत्या वेबसाइटवर आताच नोंदणीचे सर्व विक्रम मोडले आहेत. अल्बर्ट आइन्स्टाइन आणि बेंजामिन फ्रँकलीन यांची गाजलेली चरित्रे लिहिणारा वाल्टर आयझॉकसन हाच त्याचेही चरित्र लिहिणार आहे. अ‍ॅपलच्या यशामुळे अधोरेखित होते ती अशा प्रकारच्या जॉब्सना उत्तेजन देणारी अमेरिका नावाची व्यवस्था. चुकल्यानंतरही चुका करणाऱ्याच्या प्रयत्नांना दाद देणारी आणि पुन्हा उभारी देणारी अशी व्यवस्था जगाच्या पाठीवर अन्यत्र नाही. ती तयार झाली आहे ती स्थलांतरितांच्या योगदानातून. एखाद्या भाषेला मोठे व्हायचे असेल तर अन्य भाषांतील शब्दांना सामावून घेत घेत विस्तार करावा लागतो. तसेच समाजाचेही आहे. विस्ताराची इच्छा असल्यास अन्यांना सामावून घेण्यास विरोध करून चालत नाही. ऑस्ट्रेलिया, अनेक युरोपीय देश मी आणि माझे असे करीत बसले. असे अनेक स्टीव जॉब्स अमेरिकेत अखंड जन्मत असतात, ते या वृत्तीमुळे. आपल्याला यातून शिकण्यासारखे आहे. जॉब्स आता  कर्करोगाने कृश झाला आहे. थकला आहे. थडग्यात   जाताना जगातला सर्वात श्रीमंत माणूस गेला, असे माझ्याबाबत कोणी म्हणावे यात मला आकर्षण नाही. मला इच्छा आहे ती याने काहीतरी सुंदर करून दाखवले, अशा प्रतिक्रियेची, असे   बौद्धधर्म स्वीकारलेला स्टीव म्हणतो. त्याचे काम इतके मोठे की, पुढच्या पिढीस ए फॉर अ‍ॅपलम्हणजे नव्या युगातील या बौद्धाचे अ‍ॅपल’    असेच वाटेल.

(लोकसत्ता मधून साभार)


0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails