Friday, 18 November 2011

जग बदलणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या १० कलाकृती



दसर्‍यादिवशीच सिमोलंघन करून अ‍ॅपलचा निर्माता स्टीव्ह जॉब्स अनंताच्या प्रवासाला निघून गेला. स्टीव्हचं कर्तूत्वच एवढं मोठं आहे की त्याला विसरू म्हटलं तरी विसरता येणार नाही. कारण जगत असताना त्याने जी स्वप्न पाहिली ती सत्यात आणली. खरचं त्याने जग बदललं. गेले काही दिवस स्टीव्ह जॉब्स वर भरभरून लिहून आलं आहे. काही निवडक लिखाण स्वप्न पंख च्या वाचकांसाठी क्रमश: देत आहे. भाग: ७





पर्सनल कम्प्यूटरच्या युगाला चालना देणाऱ्या आणि संगीत, चित्रपट व  मोबाईल फोनमध्ये युझर फ्रेण्डलीक्रांती घडविणाऱ्या स्टिव्ह जॉब्स यांच्या  नावावर एकूण ३१७ उत्पादनांचे पेटंट आहे. आयपॉड आणि त्याच्याशी संबंधित ८५ उत्पादनांची निर्मिती त्यांनी केली आहे. लॅपटॉप,आयपॅड, आयपॉडपासून अ‍ॅपल टीव्हीपर्यंत जॉब्स यांच्या पोतडीतून अतिसुलभ आणि वेगवान उत्पादने तयार होत राहिली आहेत. तंत्रज्ञानात क्रांतिकारी बदल करणारी जॉब्स यांची ही टॉप १० उत्पादने

अ‍ॅपल  टू (१९७७)
१९७७ सालच्या जून महिन्यात अ‍ॅपल टु ने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली क्रांती घडवली. स्टीव्ह जॉब्स आणि  स्टीव्ह वोझ्नियाक यांनी डिझाईन केलेल्या अ‍ॅपल टू ने संगणीकय तंत्रज्ञानाचे सारे चित्रच बदलून टाकले. यानंतर संगणकीय तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली परंतु, अ‍ॅपलचा महिमा कोणालाही मोडीत काढता आला नाही. १-एमएचझेड प्रोसेसर, ४ केबी रॅम, ऑडिओ कॅसेट इंटरफेस आणि डाटा स्टोअरेज, ५.२५ इंचाची फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ही तंत्रज्ञानाची नवी रुपे अ‍ॅपल टु मुळे जगाने पाहिली. यातून अ‍ॅपल टु म्हणजे मास मार्केट पीसी अशी ओळख निर्माण झाली.  

लिसा (१९८३)
अ‍ॅपलचे १९८३ साली आलेले लिसा कंप्युटर हे उत्पादन अपयशी उत्पादनांच्या यादीत गेले. यावर १० हजार अमेरिकन डॉलर्स किंमतीचे लेबल लावण्यात आले होते. नव्या प्रणालीतील कंप्युटिंग सुविधा असलेला लिसा कंप्युटर दुर्दैवाने अपयशी उत्पादनांच्या मालिकेत नोंदला गेला. ग्राफिकल युजर इंटरफेस आधारित असलेला हा पहिलाच मल्टिटास्किंग कंप्युटर होता. स्टीव्ह जॉब्स या तंत्रज्ञानाच्या जादुगाराने घडवलेली ही किमया होती.

मॅकिंतोष  (१९८४)
मूळ मॅकिंतोष कंप्युटरची झलक ऑर्वेल्सच्या चित्रपटांमध्ये १९८४ साली पाहण्यास मिळाली होती. मॅकिन्टोश हा तांत्रिक फेररचना करण्यात आलेला पीसी होता आणि ग्राफिकल युजर इंटरफेस आणि माऊसच्या अशी दोन्ही सुविधा असलेले उत्पादन व्यावसायिक पातळीवर प्रचंड यशस्वी राहिले. १९९०च्या दशकात याचे महत्त्व काही काळ कमी झाले होते परंतु, नंतरच्या काळात याच्या विक्रीने प्रचंड जोर पकडला.

आयमॅक (१९९७)
स्टीव्ह जॉब्स १९९७ साली अ‍ॅपल कंपनीत परतल्यानंतर पहिल्या पिढीचे आय मॅकचे डिझाईन तयार केले. जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाच्या संगमातून घडवलेल्या आय मॅकने अ‍ॅपल कंपनीला उच्चभ्रू आणि सुशिक्षित ग्राहकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवून दिले. डिझायनर जोनाथन आयव्हे आणि स्टीव्ह जॉब्स यांच्या प्रयत्नातून आय मॅकची घडण झाली होती.

आयपॉड (२००१)
आयपॉड एमपी ३ प्लेयर २००१ साली बाजारपेठेत धडकला तेव्हा संगीताच्या दुनियेत नवी क्रांती घडल्याचे मानले गेले. वॉकमन त्या काळात प्रचंड पाप्युलर झाला होता परंतु, वॉकमनपेक्षा वेगळे काही पोर्टेबल संगीत उपकरण असू शकते, याची चुणूक अ‍ॅपलच्या आयपॉडने दाखवली

आय टय़ून्स (२००१)
एमपी ३ प्लेयरची क्रांतिकारी निर्मिती करून स्टीव्ह जॉब्सचे समाधान झाले नव्हते. लोकांसाठी त्याला एक नवे उत्पादन द्यायचे होते. आय टय़ून्स ही त्याचीच झलक होती. म्युझिक फाईल्स वाजवण्यासाठी आय टय़ून्सच्या निमित्ताने सुरुवात झाली परंतु, कालौघात पृथ्वीतलावरील सर्वात मोठे म्युझिक स्टोर्सम्हणून आय टय़ून्सची दखल घेतली गेली. हा जगातील सर्वात लोकप्रिय म्युझिक प्लेयर म्हणून गणला जात आहे.

मॅक बुक प्रो  (२००६)
जानेवारी २००६ मध्ये मॅकबुक प्रो लाँच करण्यात आला. पॉवर बुक जी ४ पासून प्रेरणा घेतलेल्या मॅकबुक प्रो च्या डिझाईनमध्ये पीॅवर पीसी चिप्स ऐवजी इंटेल कोअर दुहेरी प्रोसेसर्स बसवण्यात आले होते.  अ‍ॅपलच्या मशिन्समधील अनेकविध सुविधा आणि तंत्रज्ञानाचे हे सर्वाक सुरेल मिश्रण होते. हा लॅपटॉप जगातील सवरेत्कृष्ट क्सालिसल लॅपटॉप म्हणून आजही गणला जातो.

आयफोन  (२००७)
गेल्या मंगळवारी लाँच करण्यात आलेल्या आयफोन ४ एसच्या वेळी काही निरीक्षक निराश झाले. पहिल्या आयफोनने स्मार्टफोन लँडस्केपची व्याख्या बदलली हे खरे असले तरी आयफोन ४ एसमधील तंत्रज्ञान त्यापेक्षा खूप वेगळे असल्याचे निरीक्षकांचे मत नाही. स्टीव्ह जॉब्सच्या समर्पणाने साध्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे ३.५ इंचाचा टच स्क्रीन आय फोन दिला. परंतु, या प्रॉडक्टने बेस्ट सेलिंगचा उच्चांक नोंदवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

मॅकबुक एअर (२००८)
पहिल्या मॅकबुक एअरला प्रारंभीच्या कालखंडात एवढे महत्त्व नव्हते जेवढे आजच्या युगात आले आहे. स्टीव्ह जॉब्सचे विचार त्या पलीकडचे होते. अ‍ॅपलने २००८च्या सुरुवातीला मॅकबुक एअ लाँच केला. लॅपटॉप आणि पर्सनल कंप्युटरची आणखी क्रांती स्टीव्ह जॉब्सच्या नावे नोंदली गेली.

आयपॅड (२०१०)
जानेवारी २०१० मध्ये आय पॅडचे लाँचिंग झाले त्यावेळी स्टीव्ह जॉब्सच्या तंत्रज्ञानाची किमया नव नव्या शोधांसाठी भुकेली असल्याचे सिद्ध झाले. टॅबलेट कंप्युटिंगची एक फेरी त्याने पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात या उत्पादनाने लोकांच्या मनाची पकड घेतली नाही. मात्र, साध्या आयओएस मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमची भर घालून जॉब्सने अ‍ॅपलच्या व्हरायटीजचा प्रत्यय दिला.

(लोकसत्ता मधून साभार)

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails